December 2, 2023
Pratima Ingole Rashatech Novel review
Home » द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’
मुक्त संवाद

द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला येऊनही व्दारका तग धरून उभी राहिल्याचे पाहून वाचकमनाला दिलासाही मिळतो आणि संघर्षरत राहण्याची प्रेरणाही मिळते.

उमेश मोहिते, रावत
मोबा. ७६६६१८६९२८

शासनाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरवांकित झालेल्या ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती प्रतिमा इंगोले यांची ‘राशाटेक’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीतून व्दारका नावाच्या एका सरळमार्गी, पापभिरू, निरक्षर आणि हिंमतवान ग्रामीण स्त्रीच्या कष्टप्रद आयुष्याची जिवाला चटका लावून टाकणारी कर्मकहाणी लेखिका श्रीमती प्रतिमा इंगोले यांनी बारीकसारीक तपशिलांसह समर्थपणे चित्रित केली आहे. गाव- खेड्यातील कष्टकरी आणि शेतकरी वर्गातील कितीतरी स्त्रिया अडीअडचणींना वा संकटांना जराही न डगमगता बारोमास कष्ट करून परिस्थितीशी आणि प्राक्तनाशी झुंज देत जमिनीवर घट्टपणे उभ्या राहतात आणि जगणे सार्थ करतात, याचे प्रातिनिधिक ठरावे असे उदाहरण म्हणजे ‘राशाटेक’ कादंबरीतील नायिका व्दारकाच्या जगण्याची प्रेरक संघर्ष कथा होय.

चार मोठ्या भावांच्या मायेत अगदी लाडाकोडात वाढलेली व्दारका लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिचे दैव पालटते; कारण तिचा नवरा व्यसनी नि बाहेरख्याली असतो. त्याचे गावातल्याच एका कलालणीशी अनैतिक संबंध असतात आणि तो राजरोसपणे तिच्या घरीच राहत असतो. हे सारं कळताच स्वतःचे देव समजून नशिवाला दोष देत शेतात राहते. अशातच शेतात साप चावून तिची आई मरण पावते आणि व्दारकाच्या नशिवाचे फासे उलटे पडतात. तिच्या आईच्या देखतच घरा दाराच्या वाटण्या झालेले चारही भाऊ मग द्वारकासाठी परके होतात आणि दहा दिवस चुलत्याच्या घरी राहण्याची पाळी तिच्यावर येते.

चारही भावांच्या वागण्यात झालेला बदल अनुभवून ती खूपच हादरते नि कष्टी होते. ती परत येते तेव्हा तिच्या नवऱ्याने शेती गहाण ठेवून पैसे उचलले असल्याचे समजताच ती हताश होते; पण ती काही करू शकत नाही, मात्र लोकांच्या शेतात कष्ट करून पोट भरत राहते. पुढे तिचे दिवस भरतात तेव्हा तिच्या माहेरी निरोप देऊनही एकदेखील भाऊ तिला बाळंतपणासाठी न्यायला येत नाही, तेव्हा मोठ्या जाऊबाईंच्या आधाराने ती सासरीच राहते आणि मुलीला जन्म देते. या काळात दोनदा निरोप देऊनही तिचा नवरा काही घरी येत नाही. पण तिच्या या दुर्देवी काळात तिच्या मायाळू सख्या मात्र तिच्या माय माऊली होतात आणि तिच्या सर्व पथ्य- पाण्याकडे स्वतःच्या बहिणीसारखे लक्ष देऊन तिला सांभाळतात. पण व्दारकाची दुर्दैवी कहाणी इथेच संपत नाही, तर लगेच दुसरे संकट तिच्यापुढे उभा ठाकते.

शेती गमावून बसलेला तिचा नवरा तिला तिचे राहते घर गोंधळ करून सोडायला भाग पाडतो कारण आता त्याला स्वतःला ‘त्या’ बाईला घेऊन त्या घरात राहायचे असते. त्याला रोखण्यासाठी तिच्याकडे कुणीच नसल्याने शेवटी एके दिवशी छोटी मुलगी नि सामानाचे गाठोडे घेऊन ती माहेरी येते आणि भावांच्या घरी थोडीशी जागा मागते, पण चारही भाऊ तिचा भ्रमनिरास करतात. शेवटी व्दारका बहिणीचा हक्क नाकारल्याने धान्याच्या राशीची मातीची टेकडी बनली, अशी दंतकथा असलेल्या ‘राशाटेक’ नावाच्या गावाजवळच्या टेकडीवर जाते आणि तिथे झोपडी करून मुलीसह राहू लागते. इथे ही कहाणी संपते..

थोडक्यात लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला येऊनही व्दारका तग धरून उभी राहिल्याचे पाहून वाचकमनाला दिलासाही मिळतो आणि संघर्षरत राहण्याची प्रेरणाही मिळते. खरे तर व्दारकाची ही कहाणी अधिक गुंतागुंत नसलेली आणि सरळ एकरेषीय कथानक असलेली एक कुटुंबकथाच आहे; पण लेखिका प्रतिमा इंगोले यांनी ही कहाणी अगदी सूक्ष्म तपशिलांसह ग्रामीण म्हणी नि वाक्प्रचार आदींचा खुबीने उपयोग करून वऱ्हाडी बोलीत साजिवंत केल्यामुळे वाचनीय आणि प्रत्ययकारी झाली आहे. ओघवती शैली, कसदार आशय, नेमके संवाद, नेटके पात्रचित्रण व चित्रमय भाषेमुळे व्दारका आणि तिचा जगण्यासाठीचा सारा संघर्ष मनात रेंगाळत राहतो आणि वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतो. हेच लेखिका प्रतिमा इंगोले यांचे यश आहे.

पुस्तकाचे नाव – राशाटेक (कादंबरी)
लेखिका – प्रतिमा इंगोले
प्रकाशक – सोनल प्रकाशन, दर्यापूर, जि. अमरावती
पृष्ठे – २०८
मुखपृष्ठ – संगीता धोडपकर
मूल्य – रु. २५०/-

Related posts

स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव

मधुमेहावर तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धती राबवण्यासाठी भारत सज्ज 

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More