- गेली ३० वर्षांहून अधिककाळ संशोधन आणि कृषीज्ञान विस्ताराचे कार्य
- आंबा, काजू, नारळ, कोकम, जांभूळ, फणस याचबरोबर मसाला पिकांमध्ये भरीव संशोधन
- मसाला पिकांच्या विविध १४ जाती विकसित करण्यात योगदान
- शेतकऱ्यांसाठी ४० पेक्षा अधिक संशोधन शिफारसी
फलोद्यान विषयामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन आणि भरीव कामगिरी केल्याबद्दल दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक, डॉ. पराग हळदणकर यांना कानपूर येथे गिरीधारीलाल चढ्ढा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन अॅकॅडमी ऑफ हॉर्टिकल्चरल सायन्सेस या संस्थेमार्फत फलोद्यान विषयामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन आणि भरीव कामगिरी करणाऱ्या संशोधकाला १९९२ पासून दरवर्षी चढ्ढा हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ. हळदणकर यांची निवड करण्यात आली.
डॉ. पराग हळदणकर हे गेली ३० वर्षाहून अधिककाळ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. 1989 मध्ये हळदणकर यांनी कृषी ज्ञानविस्तार अधिकारी म्हणून विद्यापीठात कार्य सुरु केले. त्यानंतर ते प्राध्यापक व उद्यान विद्या विभागाचे प्रमुख होते. मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये ते सहयोगी अधिष्ठाता म्हणून काही काळ कार्यरत होते. सध्या ते संशोधन संचालक या पदावर कार्यरत आहेत.
गेल्या ३० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आंबा, काजू, नारळ, कोकम, जांभूळ, फणस याचबरोबर मसाला पिकांमध्ये भरीव संशोधन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जुन्या आंबा कलमांचे पुनरुज्जीव तंत्रज्ञान, हापूस आंब्यामध्ये लवकर मोहर येण्यासाठी रसायनविरहित पद्धतीचा अवलंब, छाटणी व्यवस्थापन, अभिवृद्धीच्या विविध पद्धती, आंतरपिकांची लागवड यांचा समावेश आहे. उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी फळपिके तसेच मसाला पिकांच्या विविध १४ जाती विकसित केल्या असून ४० पेक्षा अधिक संशोधन शिफारसी शेतकऱ्यांसाठी दिल्या आहेत. या संपूर्ण कार्याची अनेक पातळीवर वेळोवेळी दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये नास-टाटा तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार, आबासाहेब कुबल पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार यांचा समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.