July 27, 2024
Microgreens least capitalized industry article by Kalpana Yadav
Home » मायक्रोग्रीन्स कमीत कमी भांडवलात करता येणारा उद्योग
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मायक्रोग्रीन्स कमीत कमी भांडवलात करता येणारा उद्योग

नव्या पिढीसाठी स्मार्ट अन्न म्हणून मायक्रोग्रीन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पचायला हलके आणि विविध भाज्या व वनस्पतीपासून मायक्रोग्रीन्स तयार केले जातात. त्यामध्ये उच्च प्रतिची जीवनसत्वे, खनिजे असतात. पक्व वनस्पतीपेक्षा मायक्रोग्रीन्स जास्त पौष्टीक असतात. तसेच वाढीसाठी कोणत्याही मुलद्रव्यांची गरज भासत नाही तसेच ते वर्षभर घेता येतात. अशा या सुपर फुड संदर्भात हरियाणा कृषी विद्यापीठाच्या कल्पना यादव याचा माहितीपर लेख….


कमी भांडवलात उद्योग उभारू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मायक्रोग्रीन्सची लागवड हा एक उत्तम स्त्रोत आहे. एक – दोन हॉटेल उद्योगाला लागणारे मायक्रोग्रीन्स अगदी सहजरित्या शेतकरी तयार करू शकतात. ग्राहकांच्या मागणीनुसार आठवड्यातून एकदा उत्पादनाचा पुरवठा करून सहजरित्या उद्योग निर्माण करणे शक्य आहे. शेतीमध्ये खराब हवामानामुळे नुकसान होते. ते भरून निघणे कधी कधी कठीण होते. तर योग्य भाव न मिळाल्यानेही मोठे नुकसान होते. अशावेळी मायक्रोग्रीन्सचे घरामध्ये घेतलेले उत्पादन फायदेशीर ठरू शकते. अवघ्या सात ते चौदा दिवसात तयार होत असल्याने कापणीसाठी हंगामभर थांबण्याची गरज भासत नाही. यामुळे कमी कालावधीत कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून याकडे शेतकऱ्यांनी पाहायला हवे. याची लागवड ते वर्षभर करू शकत असल्याने वर्षभर सातत्याने नफा मिळू शकतो.  

सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकस्तरानुसार जीवनशैली बदलत चालली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे. अनेक रोग, जीवनसत्त्वाची कमतरता अशा नव्या समस्या निर्माण होत आहेत. ताजा आणि कीडनाशकांचे अंश नसणाऱ्या भाजीपाल्याची अन्उपलब्धता ही सर्वात मोठी भावी समस्या आहे. शहरामध्ये ताजा भाजीपाला उपलब्ध होणे शक्य नसल्याने जीवनसत्वयुक्त अन्नाचा दुष्काळ अशीच अवस्था यापुढे होणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याबाबत जागरूक राहण्यासाठी जीवनसत्व युक्त अन्न ही जगभराची गरज राहणार आहे. अशावेळी मायक्रोग्रीन्स हे पौष्टीक अन्न पुरविणारा उत्तम स्त्रोत ठरू शकतो. मायक्रोग्रीनमध्ये उच्च पोषक घटक, अष्टपैलुत्व, चवीष्ट आणि डिशसाठी आवश्यक घटक यामुळे गेल्या दशकांमध्ये त्याचे पाकमूल्य वाढले आहे.

मायक्रोग्रीन्स आहेत तरी काय ?

मायक्रोग्रीन्स हे भाजीपाला, औषधी वनस्पतीची बियाण्यातून पहिलीच पालवीची जोडी पूर्ण वाढलेली ताजी रसरशीत अशी रोपे असतात. मायक्रोग्रीन्सची उंची एक ते तीन इंच ( अडीच ते 7.6 सेंटीमीटर ) आणि सात ते 14 दिवसांची वाढलेली रोपे असतात. याचे मुख्यतः तीन भाग पडतात. मध्यम खोड, दोन फुटवे असलेली पाने आणि कोवळ्या पानांची जोडी असे हे भाग असतात. सामान्यता पालक, लाल मोहरी, बकव्हिट, अरुगुला, लाल बीट, कोथिंबीर, राजगिरा, सोनेरी वाटाणा, तुळस, मिरपुड क्रेस, मक्याचे खोड, लाल कोबी, ब्रोकोली किंवा रापिनी, मुळा यांचा यामध्ये समावेश होतो.    मोड म्हणजे मायक्रोग्रीन्स नव्हे. मोडापासून हे वेगळी आहेत. मोड म्हणजे फुटवे फुटलेले बियाणे आणि हे अपरिपक्व मुळे आणि बियाण्यासह ते खाल्लेजातात. बेबी ग्रीन्स यापेक्षाही मायक्रोग्रीन्स वेगळे आहेत. बेबी ग्रीन्सपेक्षा ते लहान असतात. मायक्रोग्रीन हे बेबीग्रीन्स आणि मोड यांच्यामधली स्थितीआहे.  

मायक्रोग्रीन्समध्ये असणारे घटक

  • ए, सी, ई, आणि के ही जीवनसत्वे आढळतात.
  • अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, व्हालाझांथिन, ल्युटीन आणि निओझॅनथिन हे मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • प्रथिने, लोह आणि झिंक यांचे प्रमाण मोडांच्या तुलनेत अधिक असते.
  • नायट्रेट आणि नायट्राईट या पौष्टीक विरोधी घटकांचे प्रमाण मायक्रोग्रीनमध्ये अत्यल्प असते.


मायक्रोग्रीन्सची लागवड कशी करायची ?

घरातील मोकळ्या जागेत किंवा गॅरेजमधील जागेत मायक्रोग्रीन्सचे उत्पादन घेता येऊ शकते. नियत्रित वातावरणात मायक्रोग्रीन्सची लागवड योग्य प्रकारे करता येऊ शकते. तर खुल्या वातावरणातही मायक्रोग्रीन्स घेता येऊ शकतात. येथे कृत्रिम लाईटची गरजही भासत नाही. पण योग्य वातावरणात त्याची वाढ करणे आवश्यक आहे. ग्रीन हाऊसमध्येही मायक्रोग्रीन्स घेता येऊ शकतात पण ते खर्चिक आहे. आर्थिक नफा विचारात घेऊन शेतकऱ्यांनी तसा त्याचा विचार करणे आवश्यक आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ज्येष्ठ इतिहासकार उपिंदरसिंग यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार

झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

कवी प्रकाश होळकर यांना ‘गोमंतदेवी साहित्य पुरस्कार’ जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading