पुस्तकाचे नाव – संशोधन-समीक्षक डॉ स गं मालशे प्रस्तावना खंड
संकलन – श्याम जोशी, अर्चना कर्णिक, अर्णव चव्हाण
प्रकाशक : ग्रंथसखा, बदलापूर मोबाइल – ९३२००३४१५६
डॉ. स. गं. मालशे; लेखक, संपादक, संशोधक, समीक्षक, इतिहासकार, अनुवादक मुलांसाठी विविध देशांच्या लोककथांची भाषांतर करणारे, संस्कृती समन्वयक आणि प्रस्तावनाकार होते. एकूण डॉ. मालशे म्हणजे एक बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते.
अशोक बेंडखळे
आचार्य अत्रे यांच्या बहुचर्चित ‘झेंडूची फुले’ या पुस्तकाला लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली हे खरे असले तरी अन्य अनेक ग्रंथांना त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या. त्यांनी एकूण 47 पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यापैकी अनेक पुस्तके त्यांनी संपादित केली आहेत. त्यामुळे त्या पुस्तकांना त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभल्या.
त्याशिवाय व्यंकटेश माडगूळकर (दहा कथा), प्र. के. अत्रे (कावळ्यांची शाळा, क्रांतिकारकांचे कुलपुरूष, सावरकर गडकरी सर्वस्व, शापित प्रतिभावंत, हशा आणि टाळ्या, अध्यापक अत्रे, मुद्दे आणि गुद्दे) आणि अनंत काणेकर (आवडत्या इसापकथा, देशोदेशीच्या नवलकथा, रूपेरी वाळू आणि तिची भावंडे) यांच्या अकरा पुस्तकांना प्रस्तावना लिहून त्यांनी वाचकांना पुस्तकांचे मर्म उलगडून दाखवले आहे.
सगळ्या प्रस्तावनांना छोट्या परीक्षणात निर्देश करणे शक्य नाही. त्यामुळे प्रमुख प्रस्तावनांचा परामर्श घेतो. कै. ह. ना. आपटे कृत शेक्सपियरच्या रूपांतरांची दोन परीक्षणे या पुस्तकाला त्याचे संपादन करताना डॉ. मालशे यांनी प्रस्तावना लिहिली. शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाची गो. ग. आगरकर तसेच गो. बा. कानिटकर यांनी भाषांतरे केली होती. आगरकरांच्या विकारविलसीत या भाषांतरावर आपटे यांनी टीकात्मक लेख लिहिला. तर कानिटकरांनी हॅम्लेटचे वीरसेन असे केलेल्या भाषांतरावर त्यांनी परीक्षणात्मक लेख लिहिला. मूळ कृतीत फेरफार केल्याबद्दल हरिभाऊ दोन्ही नाटककारांना धारेवर धरतात. हरिभाऊंच्या या टीकेने शेक्सपियरला वेठीला धरण्याच्या प्रकाराला आळा घालण्याचे काम केले, असे मालशे यांचे निरीक्षण असून हरिभाऊंनी उपस्थित केलेले रूपांतर विषयक प्रश्न आणि सांगितलेले निकष आजही मार्गदर्शक आहेत. हे डॉ. मालशे यांनी निदर्शनास आणले आहे. फादर स्टीफन्स यांनी रचलेले मराठी ‘क्रिस्तपुराण’वर लिहिताना त्याच्या निर्मितीची कुळकथा मालशे स्पष्ट करतात. स्टीफन्सचा मूळ हेतू एतद्देशीय हिंदूमध्ये धर्माचा प्रसार करणे, हा असला तरी त्याने मान्य केलेले मराठी भाषेचे श्रेष्ठत्व मराठी मनाला सुखावणारे आहे.
श्री. म. वर्दे मराठी कवितेचा उष:काल किंवा मराठी शाहीर हा महत्वाचा ग्रंथ आहे. त्याविषयी प्रस्तावनेत डॉ. मालशे म्हणतात, विवेचनात वर्दे यांची साहित्यदृष्टी निकोप आहे. समाजहितैषी आहे अणि सौंदर्याचा अचूक वेध घेणारी आहे. शाहीर प्रभाकर, अनंत फंदीहून राम जोशी, परशराम, होनाजी बाळा यांनी एकावर एक कडी केली आहे, असे मत नोंदवून मालशे म्हणतात, वर्दे यांनी या पुस्तकात कृष्णलीलेच्या आणि दुसर्या बाजीरावांसंबंधित तसेच अन्य शृंगारिक लावण्यांची चर्चा केली आहे आणि या ग्रंथाने मराठी समीक्षेत मोलाची भर पडलेली आहे.
शेतकर्याचा आसूड हे महात्मा जोतीराव फुले यांचे गाजलेले पुस्तक. त्याचे संपादन धनंजय कीर आणि स. गं. मालशे यांनी केले. फुल्यांविषयी आणि पुस्तिकेविषयी डॉ. मालशे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, फुल्यांचे व्यक्तित्व जसे मनस्वी तशीच त्यांची शैलीही मनस्वी आहे. ती रांगडी, चढाईखोर, जहरी अनुभवांनी कडवट पीळ पडलेली आणि विलक्षण बोलघेवडी आहे. या पुस्तिकेचा नाविन्यपूर्ण भाग म्हणजे यात चितारलेले शेतकर्यांच्या अवनत स्थितीचे प्रत्ययकारी चित्र, त्या स्थितीची केलेली मूलगामी मीमांसा आणि ती सुधारण्यासाठी सूचवलेली मौलिक उपाययोजना.
व्यंकटेश माडगूळकर म्हणजे ग्रामीण कथेमधले एक लक्षवेधी नाव झाले होते आणि त्यावेळी त्यांचे दहा कथा हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत माडगूळकरांचे वेगळेपण नेमक्या शब्दात डॉ. मालशे सांगतात. ते म्हणतात, माटे मास्तर यांनी अनुभवाचे गाठोडे आणि ठसकेबाज शैली यामुळे. उपेक्षितांचे अंतरंग उलगडले; पण माटे यांच्यावर कडी करणारा बहाद्दूर लेखक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर आहे. माडगूळकरांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचे जे अस्सल स्वरूप दृष्टीस पडते, ते मराठी वाङमयात अपूर्व होते. माडगूळकरांच्या शैलीविषयी त्यांनी मार्मिक विधाने केली आहेत.
डॉ. मालशे म्हणतात, ‘माडगूळकरांची स्वभावचित्रे अवास्तव वाटत नाहीत. वास्तवचित्रे रंगविण्यासाठी जिव्हाळ्याइतकीच अलिप्ततेची आवश्यकता असते आणि ती त्यांच्याकडे उपजत आहे. माडगूळकरांची बालमनाची चित्रे वास्तवाइतकीच चटका लावणारी आहेत. ढंगदार ग्रामीण संवाद लिहिण्यात माडगूळकरांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांची निम्मी यशस्विता ह्या संवादात आहे आणि कथासृष्टीकडे साकल्याने दृष्टिक्षेप टाकल्यास कारूण्याचाच ठसा मनावर उमटतो. जे अनुभवले ते अकृत्रिमपणे निवेदन केले म्हणून यांच्या कथा अमर झाल्या आहेत.’ महात्मा फुले समग्र वाङमय या ग्रंथाचे संपादन मालशे यांनी केले आणि प्रस्तावनेत जोतीरावांविषयी महत्वाचे मूल्यमापन वाचकांसाठी नोंद केले आहे.
ते म्हणतात, ‘एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास जे विचारवंत पुढे आले, त्यात जोतीराव अग्रभागी आहेत. जोतिबांची सत्यशोधक चळवळ हीच भारतातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली पहिली चळवळ आहे. खेडुतांपर्यंत ज्ञानाचे लोण पोहोचवण्यासाठी सामाजिक प्रबोधिनी होती. जोतीरावांची भाषा रांगडी आणि तिखट आहे. पल्लेदार आणि गुंतागुंतीची वाक्ये पेलीत, विशेषणांचे चमकारे ओढीत ती पुढे जाते.’
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि साहित्यसम्राट आचार्य अत्रे या दोन व्यक्ती मालशे यांच्या खास प्रेमाच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या अनेक पुस्तकांची चर्चा इथे होते. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता डॉ. मालशे यांनी संपादित केल्या. त्याविषयी त्यांचे निरीक्षण असे – ‘न्या. रानडे यांच्या निधनावेळची कविता असो, मित्राला पाठवलेला कविताबद्ध तिळगूळ असो वा विवाहाभिनंदन असो, त्यातून त्यांची स्वातंत्र्यलालसा प्रकट होते. एकूण स्वातंत्र्यलालसा हा सावरकरांच्या लेखनीचा स्थायीभाव आहे.’
सावरकरांच्या आत्मचरित्रातील भगूरपर्व आणि नाशिकपर्व या पुस्तकाला जोडलेल्या प्रस्तावनांचा यात समावेश आहे. त्यासंबंधी डॉ. मालशे यांची काही महत्वाची निरीक्षणे आहेत. ते म्हणतात, ‘त्यांची जीवनसृष्टी एकारलेली आहे. तिच्यामध्ये राष्ट्रहिताला अग्रक्रम आहे. सावरकरांना सावरकरपण येताच त्यांची अहंता जागृत होते. एकूण सावरकर म्हणजे देशभक्तीच्या वेडाने झपाटलेले एक झाडच आहे.’ या खंडात आचार्य अत्रेंच्या आठ पुस्तकांवरील प्रस्तावना आहेत. सावरकरांवरील लेखसंग्रहात अत्र्यांनी भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सुभाषचंद्र हे पाया आणि सावरकर हे कळस हे दाखवून दिल्याचे मालशे सांगतात. सावरकरांच्या श्वासात भारताचे प्रेम आणि नि:श्वासात भारताची चिंता भरलेली होती, असे मर्मग्राही वाक्य उद्घृत करतात.
‘गडकरी सर्वस्व’ पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. मालशे गुर्जर-गडकरी, वरेरकर-गडकरी, शंकरराव मुजुमदार-गडकरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोल्हटकर-गडकरी यांच्या चढाओढीच्या संबंधाचे नेमके मर्म अत्रे यांनी उलगडून दाखवल्याचे सांगितले आहे. शापित प्रतिभावंतमध्ये ऑस्कर वाइल्ड यांच्यावर लिखाण करून स्वत:शी वृत्तीसाम्य असलेल्या एका प्रतिभावंताच्या करूण कहाणीचे कथन आचार्य अत्रे यांनी कुतूहलपूर्वक समरसून अगदी वेधकपणे केल्याचे डॉ. मालशे नमूद करतात.
अध्यापक अत्रे हा ग्रंथ शैक्षणिक सिद्धांत आणि व्यवहार यांना बहुतांशी गवसणी घालणारा म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरावा आणि अत्रे यांच्या शिक्षणविषयक मतांची आणि कार्याची पुरेशी ओळख त्यातून घडते, असे दाखवले आहे. मुद्दे आणि गुद्दे, हशा आणि टाळ्या या पुस्तकांमधून अत्रे यांची भाषणे संग्रहित झाली आहेत. त्यात अत्र्यांच्या भूमिकांमधील विसंगती मालशे यांनी दाखवल्या आहेत. आचार्यांनी कुमारांसाठी लिहिलेल्या कथा म्हणजे कावळ्यांची शाळा हा संग्रह. त्याला डॉ. मालशे यांनी संवादवजा अशी अभिनव प्रस्तावना लिहिली आहे.
‘झेंडूची फुले’ या विडंबन कवितांच्या संग्रहाने अत्रे यांना मराठीत आद्य विडंबनकार कवीचा मान मिळाला. त्याला मालशे यांनी विस्तृत अशी 80 पाने प्रस्तावना जोडली. ती प्रस्तावनेचा एक आदर्श नमुना आहे. मराठी विडंबन काव्याचा ऐतिहासिक वेध घेताना डॉ. मालशे माधवराव जोशी, मुकुंदराव पाटील यांजबरोबर थेट संत एकनाथांच्या भारूडांपर्यंत मागे जातात. हे त्यांच्या वाङमयेतिहासावरील प्रभुत्व दाखवणारे आहे. अनंत काणेकरांच्या दोन कुमारांसाठींच्या पुस्तकांचे आणि एका प्रवास वर्णन पुस्तकाचेही मालशे यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. पाचशेहून अधिक पानांचा आणि पुठ्ठा बांधणीचा हा ग्रंथ म्हणजे अभ्यासकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे !
पुस्तकाचे नाव – संशोधन-समीक्षक डॉ स गं मालशे प्रस्तावना खंड
संकलन – श्याम जोशी, अर्चना कर्णिक, अर्णव चव्हाण
प्रकाशक: ग्रंथसखा प्रकाशन, बदलापूर मोबाइल – ९३२००३४१५६