September 9, 2025
निवृत्ती जोरी यांचा भावस्पर्शी लेख – गोधडीची मायेची उब आणि तिच्यातली साखरझोप. आई-आजीच्या हाताने शिवलेल्या गोधडीतच खरी स्वप्ने आणि समाधान दडलेले आहे.
Home » साखरझोप…?!
मुक्त संवाद

साखरझोप…?!

आत्ता आत्ता तिचं नाव ‘दुलई’ ठेवलं लोकांनी ! पण गोधडी हेच तिचं नाव तिला खरं शोभून दिसतंय. त्यातल्या त्यात आजीने किंवा आईने मायेने एकेक सुई दोऱ्याने घातलेला टाचा त्या झोपेला आणखी पक्के करून ठेवतो की काय!? यातही मला मोठी दैवी शक्ती वाटते. खरं नसतं तर प्रत्येकाला गोधडीतली साखरझोप आणि मोठमोठी भविष्यात सत्य ठरणारी स्वप्नेच पडली नसती !

निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर,
जि. छत्रपती संभाजीनगर 9423180393, 8668779597.

माणूस पैसेपाण्याने कितीही मोठा झाला आणि ऐशो आरामातलं जीवन जगायला लागला तरी त्याला झोप तितकीच महत्वाची असते. निसर्ग नियमाप्रमाणे माणसाला संपूर्ण दिवसभरातून ढोबळपणाने १/४ झोप असली म्हणजे तो विनासायास आपली दिवसभराची कर्तव्ये पार पाडू शकतो. या जगात मुख्यत्वे करून माणूस गरीब आणि श्रीमंत या दोन प्रकारांत विभागला गेलेला आहे मात्र असं असलं तरी दोघांच्याही प्राथमिक गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या जगात कुठेही जा सारख्याच. भौतिक गरजा मात्र ज्याने त्याने स्वतःच्या चैनबाजीसाठी आपल्या अवकातीनुसार वाढवण्यात. खरं माणूस त्यातच फसला आणि आपण बऱ्याचदा जे म्हणतो ‘भौतिक सुख’ तेच दुःखाचे खरे कारण ठरले. समाजातल्या प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे तो भौतिक जगात प्रवेश करतो आणि त्याला जसं पाहिजे तसं खरेदी करत असतो. त्यांनी आज घेतलेली नवी वस्तू दोन दिवसांनी जुनी होते आणि विज्ञानामुळे पुन्हा नवीन तशाच येणाऱ्या वस्तूंमध्ये खूप काही बदल होत असतात म्हणून तो आपल्या जुन्या वस्तूला कायमच नावे ठेवत आलेला…..

एक गोष्ट मात्र कितीही जुनी झाली तरी तिला कुणी नाव ठेवणार नाही असं मला वाटतं….! भौतिक सुखाकडे पळणारा माणूस खूप काही थकतो, निराश होतो आणि आहे ती परिस्थिती दुःखद अंतकरणाने पत्करून जगत असतो तर दुसरा जो वर्ग तो म्हणजे साधारण आयुष्य जगणारा तो कशाची अपेक्षाही बाळगत नाही आणि सहजासहजी मिळालं तर ते वापर करून संपल्यावर त्याचा बाऊसुद्धा करत नाही म्हणून खऱ्या अर्थाने तो समाधानी म्हणूया. मी तर म्हणेल,ज्यांना संध्याकाळची झोप चांगली लागली आणि दुसऱ्या दिवशी ताजातवाना होऊन जो कुणी सकाळी उठला आणि पुढच्या कामांना आनंदात लागला तो खरा सुखी आणि समाधानी सुद्धा!

कुणाकडूनच फार काही अपेक्षा ठेवली नाही तर मात्र निश्चित माणूस चिंतेपासून दूर आणि सुखाच्या जवळ राहू शकतो म्हणूनच त्याला संध्याकाळची झोप बिनधास्त येते. आजकाल कितीही उंची आणि गरम झोपेचे कपडे पांघरून झोपलं तरी लहानपणच्या गोधडीची सर कशी येईल? आपलं जे सुरुवातीपासून चाललं आहे ते म्हणजे सुखाची झोप येण्यासाठी जास्त चिंता-काळजी – व्याप आणि भौतिक सुखापासून दुःखी झालेला माणूस. या सर्वांना क्षणात विसरायला लावणारी लहानपणापासून आई अन् आजीने तिच्या हातून टाचे घालून शिवलेली गोधडीच खरी चांगली झोप देणारी! आज जे कोणी मोठमोठ्या पदी विराजमान झालेले आहेत त्यांनी मात्र आताची स्वप्ने भूतकाळात असताना त्याच गोधडीत रंगवलेली हे विसरून चालणार नाही. ‘गोधडीतली उबदार झोप’ या जगात कोणी घेतली नाही असा एकही पराक्रमी त्या मनशांती देणाऱ्या झोपेशिवाय निर्माण झालेला नसेल. दिवसभर खेळून अन् काम करून थकल्यावर संध्याकाळचं जेवण झालं म्हणजे एकदा का गोधडीत शिरलं म्हणजे थेट सकाळी डोळे चोळत अगदी सुखा समाधानाने साखरझोपेतून सर्वचजण बाहेर यायचे. आज जर का तेव्हाची आणि आजची झोप बघितली तर नक्कीच गोधडीतल्या झोपेला विनासायास झुकते माप गेल्याशिवाय राहत नाही कारण ती काही ओढून-ताढून आणलेली झोप नव्हती.

आत्ता आत्ता तिचं नाव ‘दुलई’ ठेवलं लोकांनी ! पण गोधडी हेच तिचं नाव तिला खरं शोभून दिसतंय. त्यातल्या त्यात आजीने किंवा आईने मायेने एकेक सुई दोऱ्याने घातलेला टाचा त्या झोपेला आणखी पक्के करून ठेवतो की काय!? यातही मला मोठी दैवी शक्ती वाटते. खरं नसतं तर प्रत्येकाला गोधडीतली साखरझोप आणि मोठमोठी भविष्यात सत्य ठरणारी स्वप्नेच पडली नसती! आजचा उषःकाल म्हणजे उद्याची नांदी याप्रमाणे आज जगात धाडसी वृत्तीने पुढे आलेल्या अनेकांची स्वप्ने आणि महत्त्वकांक्षा तिच्याच सानिध्यात आणि साक्षीने रंगलेल्या आहेत म्हणूनच ना तीच्या मोठेपणाची…ना तिच्या खरेपणाची, ना तिच्या साखर झोपेची सर आजच्या उंची उबदार आणि मऊ कपड्यांना कधीच येऊ शकत नाही…….! त्यामुळेच मला जर कोणी विचारलं सुखा-समाधानाची अन् महत्त्वकांक्षी स्वप्नांचं जन्म ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्या….. आई-आजीने शिवलेली प्रेमळ ‘गोधडी’….! तिलाच या जगात सर्वांनी ‘साखरझोप’ असं नाव ठेवलंय….


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading