November 7, 2024
Explosive novels on the stage of transformation of Marathi novels Pipilika Muktidham
Home » मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी
काय चाललयं अवतीभवती

मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी

मला वाटते मराठी कांदबरीला इथून नव्याने सुरूवात झाली आहे. ही कांदबरी प्रायोगिक आहे. प्रायोगितेची अनेक रुपे त्यात आहेत. मराठीला अशी वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी प्रथम वाचावयास मिळते आहे. मराठीत अशी दुसरी कांदबरी नाही. ही वेगळी कांदबरी आहे.
– प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले

कांदबरी नावाची जी गोष्ट असते ती कांदबरी. हा उपलब्ध वाङ्मय प्रकार सर्वस्पर्शी आहे. सर्वाना आवडणारा प्रकार आहे. अनेकांनी कांदबऱ्या लिहिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी लिहिल्या आहेत, पोलिसांनी लिहिल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी लिहिल्या आहेत. विशेषतः दलित साहित्यात ज्यांनी कांदबरी लेखन केले. ते कार्यकर्त्ये होते. म्हणजे आपणाला असे दिसेल की अव्वल इंग्रजी कालखंडापासून ज्या ज्या लेखकांनी लेखन केले आहे. त्यात फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्ये असणारे लेखक आहेत. त्यांनी वेगवेगळया प्रकारचे लेखन केले आहे.

प्राद्यापकांच्या लिखानात विशिष्ट प्रकारचा दृष्टीकोन

महात्मा फुलेंच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ते एक प्रकारचे कार्यकर्त्येच होते. सामाजिक जीवनात ते सक्रिय काम करायचे. कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील हे पत्रकार होते. म्हणजे पत्रकांरानी लिहिलेल्या कांदबऱ्यांचा स्वतंत्र विचार करावा लागेल. मराठीतील प्राध्यापकांनी फार मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. असे अनेक व्यवसायातून लेखन करणारे लेखक आहेत. त्यातून विशिष्ट प्रकारचा दृष्टीकोन तयार होतो.

पिपिलीका मुक्तीधाममुळे कांदबरीतही बदल

कवी जेव्हा कांदबरी लिहीतो तेव्हा अधिकच सकस लिहीतो. पिपिलीका मुक्तीधामचा लेखक हा एक छुपा कार्यकर्ताच आहे. पिपिलिकाच्या माध्यामातून मानवाच्या मुक्तीचा मार्ग काय आहे. याचा जेव्हा विचार करायला लागतो. तेव्हा ही कांदबरी वेगळया पध्दतीने उत्तर देते. मराठी साहित्यात योगायोगाने जेव्हा जेव्हा बदल झाले तेव्हा तेव्हा मुंगी आलेली आहे. मर्ढेकर हे मराठीतील युगप्रवर्तक कवी आहेत. त्यांनी तू एक मुंगी मी एक मुंगी अशी स्वतंत्र कविता लिहीली आहे. ही कविता खुप मोठी आहे. त्याच्या मध्ये ते असे म्हणतात. असेच होते गाणे आम्ही गांधीजीना मुंगी करून टाकले. कारण आम्ही सामान्य माणसे आहोत. सामान्य माणसेही असामान्यांचे विभाजन करु शकतात. ही मुंगी मराठी कवितेत आली आणि बदल झाला.असाच बदल पिपिलीका मुक्तीधाममुळे कांदबरीतही झाला आहे.

..असे रुपक घेऊन ही कादंबरी

मर्ढेकरांनी कांदबरी लिहीली तिच्याबद्दल आपण बोलत नाही. का बोलत नाही हे मला कळत नाही. मर्ढेकरांनी रात्रींचा दिवस ही कांदबरी एका गोष्टीची मागणी करते. आपण संज्ञाप्रवाह असे नेहमी म्हणतो तो काय आहे. पिपिलीका मुक्तीधाम या कांदबरीतही संज्ञाप्रवाह आहे. तो रुपकात्मक आहे. या कांदबरीत चार मुंग्या आहेत. खरच या मुंग्या आहेत का.? मला सार्त्रची एक गोष्‍ट आठवते की सकाळ झाल्यांनतर आपण सरपटणारे प्राणी झालो आहोत. सरपटणारे प्राणी होणं हे माणसाचे चिन्ह आहे. माणूस असा अनेक रुपामध्ये दिसायला लागतो. तेव्हा त्या ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्या नाहीतच त्या माणसच आहेत. मग त्या संदर्भात असा प्रश्न उपस्थित केला जातो. मुंग्या आहेत मग माणसे का नाहीत?. माणसावर कथा का लिहीली नाही. ही माणसाचीच कथा आहे. मुंग्या ह्या वेगवेगळया रुपामध्ये रुपातंरित होत जातात. वेगवेगळया गोष्टी सांगण्यासाठी ही मुंगी नुसती मुंगीच नाहीतर अनेक प्रकारचे रूपक घेणारे मुंगी आहे. सहजपणे या मुंग्या परिवर्तनीय होऊन जातात. सहजपणे या मुंग्या या रुपातून त्या रूपात आणि त्या रुपातून या रुपात जातात. मला हे फार महत्वाचे वाटते. असे रुपक घेऊन ही कांदबरी आशयाच्या दृष्टीने आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने फारच विस्फोटक झाली आहे.

रुपकात्मकमुळे कादंबरीत वेगळे स्वतंत्र वळण

लेखकाला जे सांगायचे आहे ते जेव्हा खूप व्यापक आणि महत्वाचे असते अशा वेळी तो अशा प्रकारचे रुपक घेतो. या रुपकात्मकमुळे पिपिलीका मुक्तीधाम कांदबरीने मराठी कांदबरीत एक वेगळे स्वतंत्र वळण घेतले आहे. ही कांदबरी जातीय व्यवस्थेची चिकित्सा करते. या दृष्टीने स्वामी विवेकांनदाचे उदाहरण पाहता येते. ते पाश्चात देशात खूप प्रसिध्द होते. त्याचे खूप मोठे मोठे भक्त होते. या संदर्भातील पत्रव्यवहार उपलब्ध आहे. ती पत्रे फार वाचण्यासारखी आहेत. त्यातील एका पत्रामध्ये ते असे म्हणतात इंग्लंडच्या लोकांना जात ही गोष्ट फार आवडते. का बरे ही जात आवडते ? आताच्या दहा वर्षात त्यांनी असा कायदा केला की मी जात मानणार नाही. जात अस्तित्वात नाही. मागच्या शतकात मात्र आवडत होती. त्याला शंभर सव्वाशे वर्ष झाली. ती आवडण्याची कारण असे की लोक आपोआपच विभागलेले असतात. लोक विभागलेले राहणे हे भांडवलदारांसाठी, ठेकेदारासाठी हे फार सोइचे आहे .त्यासाठी वेगवेगळे काही करायला लागत नाही.आणि आपण वेडयासारखे म्हणत राहतो. इंग्रजांनी देशात फूट पाडली. लोकाना विभाजीत केलं वगैरे वगैरे. पहिल्यापासून आम्ही जातीमुळे विभाजीतच होतो. स्वातंत्र्यानंतर थोडस जवळ येण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा आणि एकदा आम्ही विभाजनाच्या वाटेवर निघालो आहोत.

जातीय व्यवस्थेवरच समर्पक भाष्य

पिपिलीकाच्या लेखकाला जे सांगायचे आहे ते हेच आहे. ते आजचे वास्तव आहे. धर्माचे विभाजन, जातीचे विभाजन, सांस्कृतीक विभाजन, आर्थिक विभाजन होत आहे. एका प्रकरणात त्यांनी अस म्हटलं आहे की आम्ही त्या कार्लमार्क्सच्या केसातील मुंग्या झालो आहोत. मार्क्स सांगतो की तुम्ही सर्व एक व्हा. तुमच्याकडे एक होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भारतामध्ये एक होण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे जाती आहेत. जातीय व्यवस्थेवरच समर्पक भाष्य कांदबरीत येते. कांदबरीला स्व:ताचा आवाज आहे.ती जातीय व्यवस्थेवर जशी भाष्य करते तशीच ती शोषण व्यवस्थेवरही भाष्य करते.

मुक्तीच्या अनुषगांने शोध

या कांदबरीत लेखकाने व्यवस्थेचे आकलन केले आहे. काशी, प्रयाग, गया, रामेश्वर या सारख़ी तीर्थक्षेत्रे मुक्तीचे भारलेपण आपणात घेऊन आहेत. ती खरच मुक्तीचीव्दारे आहेत का? मुक्ती म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ही कांदबरी करते. मुक्तीच्या अनुषगांने शोध घेताना ही कांदबरी उत्तरे देत जाते. तत्वाज्ञानाच्या गूढ पातळीवर व्यक्त होते.ही वरवरची कांदबरी नाही.अध्यात्माचे अनेक सुक्ष्म पापुद्रे उलगडत जाते. आपणास तत्वज्ञानाचा साक्षात्कार घडवत जाते. जीवनावर क्रमाक्रमाने भाष्य करत राहते. विश्व हे अनंत आहे. त्याचा धागा पकडण्याचा प्रयत्न लेखकाचा आहे. माणसांच्या मनात देवाविषयी भिती आहे. उत्सुकता आहे. याचे भांडवल करून निर्माण झालेले तत्वज्ञान हे परिपुर्ण कसे नाही यावर ही कांदबरी भाष्य करते.

गंधवाला महत्त्वाची व्यक्तीरेखा

कांदबरीचा आवाका व्यापक आहे. तो कवेत घेण्यासाठी वाचकालाही आपली दृष्टी व्यापक करावी लागेल. महाव्दारमध्ये जी एक व्यवस्था रेखाटली होती त्याच्या पुढे जाऊन पिपिलीकामध्ये रेखाटली आहे. यात गंधवाला ही एक व्यक्तीरेखा आहे ती खूप महत्वाची आहे. गोपालन करणाऱ्या लोकांचे चित्रण यात येते त्याअनुषांगाने असणारी आर्थिक गणिते येतात. अशा अनेक समकालीन घटना प्रसंगाच्या माध्यमातून कांदबरीने समकालीन भारत उभा केला आहे. भारतीय जीवनाचे स्तर अनेक पातळयावर रेखाटलेले आहे. तत्वाज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. जैन धर्म असो, खिचन धर्म, मुस्लिम धर्म असो, की बौध्द धर्म असो या सर्व धर्मातील मुंगीचा प्रवास हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

अपुर्णतेची अनेक रुपे

प्रचंड अभ्यास आणि मेहनतीची आवश्यकता त्यासाठी लागते. मानवी जीवन सुसह्य व्हावे म्हणून एक व्यवस्था अस्तित्वात येते. नैतिकता व अनैतिकतेचा सकंल्पना अस्तित्वात येतात.या कांदबरीत अध्यात्माच्या अनेक संकल्पना सुक्ष्म पातळीवर स्पष्ट केल्या आहेत. लेखकाला प्रत्येक व्यवस्थेचे कंगोरे दिसतात. त्यात जमा आणि उणीवाच्या बाजू आहेत. त्यातून मिळालेल्या सार मांडण्याची लेखकाची स्वतंत्र दृष्टी आहे. त्यानुसार प्रत्येक धर्म परिपुर्ण नाही. आहे ती अपूर्णता.अपुर्णतेची अनेक रुपे या कांदबरी दिसतात. आपण निर्माण केलेली प्रस्थापित व्यवस्था कुचकामी आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेतची मागणी ही कादंबरी करते. समर्थपणे तिचे पैलू ती मांडते. या दृष्टीने ही कांदबरी आतापर्यंतच्या कांदबरीच्या इतिहासातील परिवर्तनाच्या वळणावरचा नवा टप्पा आहे. ही कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेची भलावण करीत नाही. उणीवावर बोट ठेवते.

सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब

मला वाटते मराठी कांदबरीला इथून नव्याने सुरूवात झाली आहे. ही कांदबरी प्रायोगिक आहे. प्रायोगितेची अनेक रुपे त्यात आहेत. यात जी मुंगी आहे ती मोर पाळते, मुगूसं पाळते, कावळा पाळते, हत्तीचं पिलू पाळते यातून लेखक सामाजिक वास्तवाची अनेक रुपे रेखाटत जातो. आजच्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब कांदबरीत आहे. ते इतके स्फोटक आहे की ते सांगण्यसाठी लेखकाला प्रतिकांचा, रुपकांचा आधार घ्यावा लागला आहे. अभिव्यक्तीवर आलेली बंधने ही कांदबरी मांडते. त्यातून आशय, शैली, आविष्कार स्फोटकरितीने व्यक्त होत राहतात.

वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी

अतिशय संतुलित आणि समतोलपणे या कांदबरीचे लेखन झाले आहे. कांदबरीच्या प्रायोगिकतेची अधिक चर्चा केली गेली पाहिजे. मराठीला अशी वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी प्रथम वाचावयास मिळते आहे. मराठीत अशी दुसरी कांदबरी नाही. ही वेगळी कांदबरी आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहीणे सोपे असते. परंतु अशी कांदबरी लिहीणे अवघड असते. ऐतिहासिक कांदबरीच्या काळात आपण गेलो की प्रश्न संपतो.परंतु अशी कांदबरी लिहिण्यासाठी प्रचंड प्रतिभेची आवश्यकता असते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading