June 19, 2024
The best literary invention of the survey
Home » सर्वेक्षणाचा सर्वोत्तम साहित्यिक आविष्कार
मुक्त संवाद

सर्वेक्षणाचा सर्वोत्तम साहित्यिक आविष्कार

शासकीय नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतरही काही प्रासंगिक कामे करावी लागतात. मग ते शाळेतील शिक्षक असो, महाविद्यालयाचे प्राध्यापक असो वा शासकीय कचेरीतील कर्मचारी असो, त्यांच्यावर निर्धास्तपणे विश्वास टाकून शासन निवडणूक किंवा जनगणना अशा स्वरूपाची कामे करून घेत असते. एकदा जबाबदारी स्वीकारली की ती पार पाडताना अनेक अनुभव येत असतात. एका परीने ती तारेवरची कसरतच असते. हे अनुभव घेणाऱ्यांनाच माहीत असते.

शासकीय कर्मचारी असलेले सुनील पांडे या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या लेखकाने तब्बल अकरा दिवस पुण्यामध्ये मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी एक प्रगणक म्हणून यशस्वीरित्या सांभाळली. हे काम करताना आलेले अनेक अनुभव त्यांनी रोजनिशी स्वरूपात लालित्यपूर्ण पण संयत शैलीत ‘ तुमची जात कोणती?’ या पुस्तकाद्वारे मराठी वाचकांसमोर ठेवले आहेत . मराठी भाषेतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोणत्याही भाषेतून अशा प्रकारचा साहित्याविष्कार कोठेही झाला नसेल. त्यांना आलेले सर्व अनुभव हे सत्यघटनेवर आधारित आहेत.

‘ तुमची जात कोणती?’ असा प्रश्न विचारणे हे प्रगणक म्हणून त्यांचे कर्तव्य पण ऐकणाऱ्याने त्याचे उत्तर कशाप्रकारे दिले हे वाचकांनी या पुस्तकांमधून वाचले पाहिजे. मराठी साहित्यविश्वातील अशा प्रकारचे हे एकमेवाद्वितीय पुस्तक आहे. त्यामुळे श्री. सुनील पांडे यांनी आपल्याबरोबरीने ज्या हजारो प्रगणकांनी काम केले त्यांचेही हे पुस्तक लिहून चीज केले आहे असेच म्हणावे लागेल.

या नावीन्यपूर्ण पुस्तकाचे स्वागत मराठी भाषक नक्कीच करतील याचा मला विश्वास वाटतो. श्री. पांडे यांच्या कल्पनेला तमाम साहित्य रसिकांचा सलाम. यापुढे अशीच नवनिर्मिती होत राहो याच मनापासून शुभेच्छा.

डॉ. स्नेहल तावरे

पुस्तकाचे नाव – तुमची जात कोणती?’
लेखक – सुनील पांडे
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
किंमत – २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – ९८१७८२९८९८

लेखकाचे मनोगत

सर्वेक्षणातील अनुभवांच्या नोंदीचे पुस्तक – सुनील पांडे

२३ जानेवारी २०२४ ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रात राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण झाले. एक शासकीय कर्मचारी म्हणून या सर्वेक्षणात प्रगणक म्हणून मला काम करायला मिळाले. सर्वेक्षण करत असताना आलेल्या अनुभवांच्या नोंदी म्हणजे हे पुस्तक.

सर्वेक्षण करताना अनेक नानाविध प्रकारचे कडू गोड अनुभव आले. विविध प्रकारची माणसे मला भेटली. त्यांच्याशी संवाद साधता आला. फक्त शासकीय सेवक म्हणून नव्हे तर लेखक म्हणूनही मला त्यांच्याशी जोडून घेता आले. सर्वेक्षण करताना नागरिकांकडून जसे सहकार्य मिळाले तर काहींनी असहकाराची भूमिका घेतली. आदर जसा मिळाला तसा अनेक ठिकाणी अनादरही झाला. काही ठिकाणी तर मार खाण्याची वेळ आली होती. काहींनी संशयाने पाहिले.

सरकारी कर्मचारी याची खरी किंमत शासकीय कार्यालयात. नागरिक जेव्हा शासकीय कार्यालयात येतो तेव्हा हा शासकीय कर्मचारी देवतुल्य असतो. पण हा कर्मचारी ऑफिसातून बाहेर पडताच त्याची किंमत शून्य. शेवटी किंमत खूर्ची आणि पदाला असते हे तितकेच खरे आहे. सर्वेक्षण करताना अनेक स्तरातील माणसे जवळून अनुभवता आली. गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांच्या घरी जाता आले . अनेक हाय सोसायटीत दरवाजा न उघडता सेफ्टी दरवाज्यातून लोखंडी दरवाजात उभे राहून काहींनी उत्तरे दिली. तर काही घरात आपुलकीने उठबस झाली. चहापाणी झाले. कोणी मला सेल्समन समजले तर कोणी संशयित आरोपी म्हणून पाहिले. जवळ ओळखपत्र असूनही काही ठिकाणी बोगस आयकार्ड म्हणून पाहिले. ‘ फेक आयडी ‘ म्हणून काहींनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना बोलवले. अशा कडू गोड आठवणी म्हणजे हे सर्वेक्षण. तक्रार तशी कुणाबद्दल नाही.

शेवटी कोण कुठला अपरिचित माणूस आपल्या घरी येऊन ” तुमची जात कोणती? ” हा प्रश्न विचारतो तेव्हा सर्वांनाच जात विचारणे रुचेल आणि आवडेल असेही नाही. सर्वेक्षणात जातीचा अभिमान बाळगणारे जसे भेटले तसेच जात धर्म न मानणारे आणि माणूस हीच जात आणि माणूसकी हाच धर्म मानणारेही भेटले. सर्वेक्षण करत असताना रोज त्या त्या दिवसांच्या अनुभवांची नोंद मी डायरीत करुन ठेवत होतो. त्यावेळी पुस्तक करण्याचा असा कोणताही विचार खरे तर माझ्या डोक्यात नव्हता. सर्वेक्षणातील ते दिवस , भेटलेली माणसे आणि त्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या आठवणी कायम माझ्या मनात राहतील.

सर्वेक्षण करण्याची मला जी संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य समजतो. तसा मी माणूसवेडा आहे. माणसात वावरायला आणि त्यांना भेटायला मला अधिक आवडते.संवाद साधायला आवडते. यानिमित्ताने माणूस म्हणून ती व्यक्ती अधिक जाणून घेता येते. सर्वच शासकीय कर्मचारी यांनी सर्वेक्षणाचे काम प्रामाणिकपणे आणि वेळेत पार पाडले. अगदी भूक तहान विसरून. प्रत्येकाचे सर्वेक्षणाचे अनुभव वेगवेगळे असू शकतील. मला जे अनुभव आले ते मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सुनील पांडे, सिंधुप्रभा, मु. पो. नीरा , ता. पुरंदर, जि. पुणे . पिन. ४१२१०२
मो. ९८१७८२९८९८

Related posts

माणूसकी

आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीच साधनेने मनाची मळणी

मूल येथे तीन डिसेंबरला महिला झाडीबोली साहित्य संमेलन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406