September 13, 2024
Gomprena Globosa Supari Flower article by V N Shinde
Home » सुपारीची फुले…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपारीची फुले…

मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं तर… अनेक विवाह जुळले नसते… झालेले विवाह तुटले नसते… कारण तिला काय हवं किंवा त्याला काय हवं… ते यंत्रानं सांगीतल असतं…

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

सकाळी नजरेस पडली सुपारीची फुले. यांना सुपारीची फुले हे नाव कोठून आणि का आलं माहीत नाही. मात्र इवल्याशा रोपावर, हलक्याशा वाऱ्याने झुलणारी, वारे नसताना ताठ मानेने आपला तोरा दाखवत फुलणारी फुले, लहानपणापासून पाहात आलो. जांभळ्या- राणी रंगाची फुले फुलली की, हटकून नजर जायची. छान वाटायची. फुलांना वास नसल्याने त्यांना तोडायचा कधी प्रश्न आला नाही. मात्र फुलांच्या रंगामुळे डोळे सुखावायचे. यामध्ये कधी कधी पांढऱ्या रंगाचे फुल असणारे झाडही यायचे. आम्हाला त्यावेळी जनुकशास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे पांढरी फुले पाहून आश्चर्य वाटायचे. फुट-दीड फुटाची वाढ असणारे हे रोप सहज उगवते आपल्या तोऱ्यात वाढते. पण त्यासाठी त्याला खास लावावे लागते. त्याला प्राणी खातात. मध्य भारतात याची माळा देवाला घालतात. अनेकजन फ्लॉवर पॉटमध्ये ठेवतात. बुकेमध्येही यांचा वापर करतात. नेपाळमध्ये भावाच्या गळ्यात या फुलाचा हार घालून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली जाते, आपल्याकडे राखी बांधतात तसें. याच्या मूळ्यांचा खोकल्यावर औषधात वापर होतो. मराठीत याची इतर नावे आहेत गुलमखमल, सुपारीची फुले. हिंदीत गुलमखमल, इंग्रजीत बॅचलर्स बटन, ग्लोब ॲमरॅन्थ, गॉमफ्रेना, तमीळमध्ये वटमल्लीकई, कन्नडमध्ये महासई, मल्याळममध्ये वडपू, वडसळी, मणीपूरीमध्ये चिंकरू नावाने ओळखतात. संस्कृतमध्ये याचे नाव आहे, रक्त मल्लिका. यामध्ये बीटासायनीन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्याला औषधी वनस्पतीचे स्थान आहे. याचे मुळ अमेरिकेतील, मात्र आता जगभर आढळते.

याच शास्त्रीय नाव आहे गोमफ्रेना ग्लोबोसा. याचे कूळ अमरॅन्थसी आहे. हे झाड एक वर्ष जगते. खोड सरळ वाढते. जागोजागी फांद्या फुटून डेरेदार होते. याच्या रोपांना जांभळ्या, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाची फुले येतात. पावसाळा आणि हिवाळा हे याचे फुलण्याचे दिवस. ही फुले सुकल्यानंतरही रंग टिकवून ठेवतात. याची रोपे बियांपासून उगवतात. दाट रोपांची विरळणी करावी लागते. याच्या खोडावर आणि पानांवर केसाळ रचना असते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जागी यांची वाढ चांगली होते. खोडाचा रंगही जोभळा होतो.

या आकर्षक छोटेखानी फुलांकडे आज आवर्जून लक्ष गेले आणि त्यांचे सौंदर्य डोळ्यात भरले. मग काय मोबाईल काढला आणि छायाचित्रे टिपली. छायाचित्रात त्या गोंड्यावर बारीक पिवळी फुललेली फुले दिसली. चार पाकळ्यांची सुंदर फुले आणखी आकर्षक वाटू लागली. मुळांत इवलासा गोंडा. त्यामध्ये पाच पाकळ्यांची सुंदर फुले. दुसऱ्या दिवशी त्यांचा रंग पांढरट होतो. पुढे या पाकळ्या गळतात. मात्र जांभळे बोन्ड, ज्याला आजवर फुल समजायचो, ते तसेच रंगीत असते. बारकाईने पहिले कि मध्यभाग गुलाबाच्या फुलांची आठवण करून देतो…यामध्ये बीज तयार होते. ते पुन्हा पुढच्या वर्षी नव्या रोपाला जन्म देते. जांभळ्या बोंडात फुललेली फुले पाहून नेत्र सुखावले.

पण…

मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं तर… अनेक विवाह जुळले नसते… झालेले विवाह तुटले नसते… कारण तिला काय हवं किंवा त्याला काय हवं… ते यंत्रानं सांगीतल असतं… रूसवे, फुगवे आणि भांडणे कमी झाली असती… किंवा फारच मोठी झाली असती… नेमकं काय झालं असतं… फुलाप्रमाणेच माणसाचे मनही उलगडून दाखवणारे यंत्र तयार झाले असते तर…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भाजपने तुंगभद्रा घटना गांभिर्याने घेण्याची गरज

प्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी

राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading