November 30, 2022
Book Review of Vilas Patne Zhashichi Rani Laxmibai
Home » राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी
मुक्त संवाद

राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस  लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते  ज्येष्ठ बंगाली लेखिका  महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या  कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन आहे. त्या पार्श्वभूमीवर मी निश्चित असे म्हणेन की,  विलास पाटणे यांचा लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हा ग्रंथ त्या विषयावरचा आणखी एक ग्रंथ नसून तो राणीसाहेबांचे  उत्तुंग व्यक्तिमत्व, शौर्य आणि त्यांचा तो धगधगता काळ मांडणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथराज आहे.

पानिपतकार विश्वास पाटील

ॲड. विलास पाटणे  यांचा  झाशीची राणी लक्ष्मीबाई हा ग्रंथ पुरेशा ऐतिहासिक संशोधनावर व कायदेविषयक ज्ञानाच्या सम्यक दृष्टिकोनातून निरक्षीर विवेकबुद्धीने लिहिला गेलेला आहे. तसे पाहता या विषयावर आजवर अनेक नाटके, ऐतिहासिक ग्रंथ व  संशोधन ग्रंथ लिहून झाले आहेत. तरीही  विलास पाटणे  यांची ही रांगोळी खूपच वेगळी  प्रत्ययकारी आणि या विषयावर नव्या दृष्टिकोनातून मांडणी करणारी आहे, त्याचा  मला विशेष आनंद वाटतो .

आरंभीलाच श्री पाटणे हे भारतीय संस्थानिकांचा लेखाजोखा मांडतात. त्याचवेळी कोकणच्या लांज्यापासून ते  झाशी संस्थानापर्यंतचा पदर कसा जुळतो  हे ऐतिहासिक दृष्ट्या पटवून देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाटणे हे वकिली क्षेत्रातले असल्यामुळेच त्यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या बाबतीत संशोधनाच्या कोणत्याही जागा रिकाम्या सोडलेल्या नाहीत. या विषयावरच्या सर्व अद्यायावत ग्रंथांचे त्यांनी बारकाईने वाचन केले आहे.  तसेच ऐतिहासिक दृष्ट्या संबंधित पुराव्यातील सत्यशोधन करून ते पुरावे आपल्या  विवेचनात घासून पुसून घेतले आहेत. या विषयाच्या संदर्भातील अफवांना व बाजारगप्पांना त्यांनी  फाटा दिला आहे.

विवाह आधी गंगाधरराव नेवाळकरांची प्रतिमा बाईलपणाची कशी होती हे ते बेडरपणे मांडतात. त्याचवेळी राणी लक्ष्मीबाईंचा मनकर्णिका ते राणी पर्यंतचा प्रवासही ते पुरेशा पुराव्यानिशी स्पष्ट करतात. बॅरिस्टर जॉन  लेंग यांच्या” वंडरिंग्स इन इंडिया” या  ग्रंथाचे त्यांनी उत्तम परिशिलन केले आहे. बॅरिस्टर जॉन हे काही खटल्यांच्या निमित्ताने नेवाळकर फॅमिलीशी जवळ आले होते. त्यांच्या निरीक्षणाला जसे महत्व आहे तसेच तत्कालीन प्रवासी गोडसे भटजी यांची राणी लक्ष्मीबाई व त्या वेळेच्या भारताबद्दलची निरक्षणे सुद्धा  तितकीच मोलाची आहेत.

विलास पाटणे यांनी तत्कालीन मेजर एलिस, बुंदेलखंडाचे पॉलिटिकल एजंट मेजर मल्कम , लॉर्ड डलहौसी अशा सर्व ब्रिटिश अंमलदारांच्या  लेखनाचा व पुराव्यांचा  धांडोळा घेतला आहे . झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची  बहादुरी ते स्पष्टपणे अधोरेखित करतातच. पण त्याचवेळी राणी लक्ष्मीबाई यांनी त्याच धामधुमीच्या काळात आश्रित ब्रिटिश कुटुंबांना कशी मायेची सावली दिली होती. राणीचे आणि काही ब्रिटिश कुटुंबांचे परस्पर संबंध, लक्ष्मीबाईंचे नाटक, चित्रकला इत्यादी कलाप्रकारावर असणारे प्रेम व रसिकता,  तसेच देवी महालक्ष्मीवरील अपार श्रद्धा, शिवाय बुंदेलखंडातील डाकूंपासून त्यांनी आपल्या प्रजेची केलेली सुटका,  त्यांची मोडलेली बंडे अशा विविध चाकोरीतून लक्ष्मीबाईंचे व्यापक चित्र वाचकांपुढे उभे केले आहे.

एक माणूस म्हणून लक्ष्मीबाईंचे असणारे मोठेपण त्यांना कैद करणाऱ्या सर ह्यू रोज या ब्रिटिश अंमलदाराने कसे मान्य केले होते, याचीही ते स्पष्टपणे नोंद घेतात. शिवाय  तेव्हा राणीच्या  वेषामध्ये किल्ला लढवणाऱ्या झलकरी बाई या कोळी समाजातील लढवय्या स्त्रीचेही मोठेपण त्यांनी अधोरेखित  केलेले आहे.

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस  लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते  ज्येष्ठ बंगाली लेखिका  महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या  कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन आहे. त्या पार्श्वभूमीवर मी निश्चित असे म्हणेन की,  विलास पाटणे यांचा लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हा ग्रंथ त्या विषयावरचा आणखी एक ग्रंथ नसून तो राणीसाहेबांचे  उत्तुंग व्यक्तिमत्व, शौर्य आणि त्यांचा तो धगधगता काळ मांडणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथराज आहे. तो आकाराने छोटा असला तरी आशयाने  निश्चित मोठा आहे.  असा सजग, माहितीपूर्ण व ऐतिहासिक सत्याशी सांधा ठेवून लिहिला गेलेला ग्रंथ मराठी भाषेत निर्माण व्हावा हा खूपच चांगला योग आहे. एका यशस्वी वकील मित्राने सखोल संशोधकाच्या बाण्याने सिद्ध केलेला हा ग्रंथ स्वातंत्र्य चळवळींचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरक ठरेल  याबद्दल माझ्या मनात शंका नाही.                 

पुस्तकाचे नाव – झाशीची राणी लक्ष्मीबाई
लेखक – विलास पाटणे
प्रकाशक – अक्षर प्रकाशन 
मूल्य –  २०० रुपये

Related posts

मराठीची एक प्रगत बोली – मालवणी

लळित लोककलेचे सादरीकरणातून संवर्धन

सत्य -असत्याची ग्वाही : चारोळी संग्रह अंतर-मंतर

Leave a Comment