February 22, 2025
Government cultural policy is unstable - Conference President Poet Ajay Kander
Home » सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर
काय चाललयं अवतीभवती

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर

कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण असणारे कलावंत दुर्लक्षित राहतात किंवा त्यांची कला लहानपणीच कोमेजून जाते. त्यासाठी हे कला दलन महत्त्वाचे आहे.

किशोर कदम

कोकणभूमी साहित्य कला संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे साहित्य कला संमेलनालनाचे उत्तम आयोजन

कणकवली – ओसरगांव येथे कोकण एम. व्ही. डी. कला अकादमी सुरू करण्यात आली हा कोकणच्या कला सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावावा असा क्षण आहे. सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर राहिल्यामुळे कोकणबरोबरच महाराष्ट्रातील स्थानिक कलाकार उपेक्षित राहिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणच्या कलाक्षेत्रात कोकण कला अकादमी सुरू करणाऱ्या कॅप्टन विलास सावंत दांपत्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी कोकणभूमी साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षपदावर बोलताना केले.

कोकण एम. व्ही. डी. कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय कोकण भूमी साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ गायिका डॉ शकुंतला भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बोलताना कांडर यांनी माणसांच्या पोटाला जशी भूक लागते तशी माणसाच्या मेंदूलाही भूक असते. यासाठी कला संस्कृती याचा प्रवाह त्या त्या भागात सतत प्रवाहित राहिला पाहिजे असेही आग्रहाने सांगितले.

यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, जिल्हा शिक्षण अधिकारी कविता शिंपी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, लोक कलावंत प्रा हरिभाऊ भिसे, यांच्याबरोबर अकादमीचे चेअरमन कॅप्टन विलास सावंत, राजश्री सावंत, ओसरगांव पोलीस पाटील आंगणे आदी उपस्थित होते.

कवी कांडर म्हणाले, कोकणभूमी साहित्य कला संमेलन हा एम व्ही डी कला अकादमीचा कोकणातील महत्त्वाचा उपक्रम आहे. सरकारने अशा कार्यक्रमासाठी एम व्ही डी कला अकादमीला अनुदान द्यायला हवे. सरकारचे सांस्कृतिक धोरण स्थिर नाही. ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांचे पूर्ण सांस्कृतिक धोरण स्वीकारून ते अमलात आणले असते तर आज महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा वेगळा दिसला असता.कला म्हणजे मौजमजा मनोरंजन असं नाही. कला म्हणजे व्यवस्थेतील हस्तक्षेप असतो. अनिष्ट राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक जातीय या सगळ्याच्या विरोधातला आवाज म्हणजे कला असते. मात्र हे हौशीने काम करणाऱ्या कलावंतांना माहीत नसते यासाठी अशी कला कलादालने महत्त्वाची ठरतात.

डॉ. भरणे म्हणाल्या, संपूर्ण कोकणात वेगवेगळ्या कला क्षेत्रात अतिशय गुणवंत कलावंत आहेत. ते दुर्लक्षित राहता नये यासाठी कोकण एम.व्ही.डी. कला अकादमी सारख्या संस्था महत्त्वाच्या ठरतात. कोकणात कितीतरी मोठे कलावंत होऊन गेले मात्र त्याची माहिती इथल्या रसिकांना नाही. म्हणून असे उपक्रम महत्त्वाचे ठरत असतात. आपल्या मातीत आपला कलावंत मोठा व्हायला हवा. बाहेर जाऊन सगळेच मोठे होतात. पण या मातीत मोठा झालेला कलावंत मागून येणाऱ्या कलावंत पिढीला प्रेरणा देत असतो.

श्री रावले म्हणाले, शालेय शिक्षणाच्या सुविधेबरोबरच शिक्षणापलीकडच्या कलागुणांचं सादरीकरण होणेही महत्त्वाचे असते. यासाठी एम व्ही डी कलादालन महत्त्वाचे योगदान देईल.

किशोर कदम म्हणाले, कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण असणारे कलावंत दुर्लक्षित राहतात किंवा त्यांची कला लहानपणीच कोमेजून जाते. त्यासाठी हे कला दलन महत्त्वाचे आहे.

बहारदार कार्यक्रम

संपूर्ण संमेलनाच राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केलेल्या या संमेलनात बालदशावतार स्पर्धा, नृत्य संगीत, गायन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन असे विविध आयोजित करण्यात आले. कवयित्री प्रा मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात मधुकर मातोंडकर, निशिगंधा गांवकर,सत्यवान साटम, संदीप कदम, तनवी मोहिते, श्रवण वाळवे, सोनिया आंगणे आदी कवींनी कविता सादर करून बहारदार रंगत आणली.

तर संमेलनाच्या प्रारंभी श्रीधर पाचंगे आणि त्यांच्या कलावंतांनी सादर केलेल्या गाण्यानी रंगत वाढविली. याचवेळी एम व्ही डी कॉलेजच्या विद्यार्थ्याने वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत अप्रतिम समूह नृत्य सादर केले.तर या कॉलेजच्या तेंडोलकर या विद्यार्थिनीने सादर केलेल्या लावणीला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. रात्री एक वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालू होते. त्यांना रसिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading