April 14, 2024
Dnyaneshwari has the power to make the world Bramhasampan
Home » विश्वाला ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत
विश्वाचे आर्त

विश्वाला ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत

दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।। १७९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – पापाचा अंधार जावा व विश्वांत स्वधर्मरुपी सूर्याचा उदय व्हावा, प्राणिमात्रांत जो जे इच्छील, ते त्याला प्राप्त होवो.

आपण गुरुंच्याजवळ जातो अन् स्वतःसाठी काही ना काही तरी लाभ व्हावा असे मागतो. सद्गुरु ही इच्छा पूर्णही करतात. पण ज्ञानेश्वरांनी तसे केले नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या समाप्तीच्या निमित्ताने त्यांनी सद्गुरुंच्या जवळ मागणे केले, पण ते केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी मागितले. या विश्वाच्या सुखातच आपले सुख त्यांनी पाहीले. हे सर्व विश्व ब्रह्मसंपन्न व्हावे, असा प्रसाद ज्ञानेश्वरांनी गुरूंच्याजवळ मागीतला आहे. शिष्यांच्या बोधातच, प्रगतीमध्येच सद्गुरुंना संजिवन समाधीचा लाभ होत असतो. शिष्याच्या यशातच, सुखातच गुरुंचे सुख-समाधान असते. म्हणून गुरुजवळ मागताना काय मागायचे याचा विचार आपण स्वतःच करायला हवा. विश्वाला ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरी या ग्रंथात आहे.

आपला स्वधर्म कोणता ? अर्थात मानवाचा धर्म कोणता ? या विश्वात आपण एक मानव म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण एक जीव आहोत. एकप्राणी आहोत. आपल्यातील हा जीव, ही सजीवता कशामुळे आहे ? आपल्या देहात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपला श्वास सुरु आहे. सोहमचा गजर सुरु आहे. तोपर्यंत आपण सजीव आहोत. ही सजीवता देहाची आहे. एकदा या देहातील आत्मा निघून गेला की हा देह निर्जिव होतो. त्याचा नाश होतो. तो पंचत्वात विलिन होतो. यासाठीच आपण कोण आहोत याची ओळख आपण करून घ्यायला हवी. आपली ओळख करून घेणे हाच आपला स्वधर्म आहे. आपण एक आत्मा आहोत. आत्मा हा अमर आहे. आत्मा हीच आपली ओळख आहे. त्याला जाणणे हाच आपला धर्म आहे. आत्म्याचे अमरत्व जाणून आत्मज्ञानी होणे, ब्रह्मसंपन्न होणे हाच आपला स्वधर्म आहे. हाच मानव धर्म आहे. एकदा या आत्मतत्त्वाची ओळख झाली की मग जन्म-मृत्यू नाही.

प्रत्येक मानवाने, पृथ्वीतलावरील जीवाने हे ओळखून आत्मज्ञानी व्हायचे आहे. या आत्मज्ञानाच्या सूर्याचा प्रत्येक मानवामध्ये उदय व्हावा, असे ज्ञानेश्वर माऊलींना वाटते. यासाठीच त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या सूर्याच्या उदयाने सर्व जग आनंदाने भरून जाईल. असे हे आनंदाने भरलेले जग ज्ञानेश्वरांना अपेक्षीत आहे. यासाठीच त्यांनी हा प्रसाद गुरुदेवांकडे मागितला आहे. हे जग ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. हा ग्रंथ, हा विचार, हे तत्त्वज्ञान संपूर्ण विश्वाला आत्मसात व्हावे, हाच प्रसाद ज्ञानेश्वरांना हवा आहे. यासाठी आत्मज्ञानाची गुरु-शिष्य परंपरा या मराठी नगरीत त्यांनी पेरली आहे. या बीजाचा विस्तार होऊन त्याला फुले-फळे यावीत अन् त्या फळातील बीज पुन्हा पेरून सर्व विश्वात त्याचा प्रसार व्हावा. हा मानवधर्म प्रत्येकाला आत्मसात व्हावा, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.

Related posts

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

संत तुकाराम…

Leave a Comment