August 12, 2025
Human Library event where people engage in heart-to-heart conversations breaking social barriers
Home » ह्युमन लायब्ररी म्हणजे माणसांमधील भिंती तोडणारी आणि हृदय जोडणारी एक अतिशय सुंदर अन् प्रभावी कल्पना
विशेष संपादकीय

ह्युमन लायब्ररी म्हणजे माणसांमधील भिंती तोडणारी आणि हृदय जोडणारी एक अतिशय सुंदर अन् प्रभावी कल्पना

सध्याच्या काळात वाचनाची आवड कमी होताना पाहायला मिळत आहे. स्किनच्या वापराचे नव्या पिढीला आता वेडच लागले आहे. ही बदलती संस्कृती आता नवीन आव्हाने घेऊन उभी राहू पाहात आहे. पण निर्माण होणाऱ्या समस्यावर मात करण्यासाठी नव्या कल्पनाही पुढे येऊ लागल्या आहेत. हे बदल आपणास स्वीकारावेही लागणार आहेत. काही ठिकाणी हे बदल स्वीकारलेही जात आहेत. या नव्या कल्पनांचा वापर आता आपणही करायला हवा. आपण सहजच एखाद्या जेष्ठ तज्ज्ञांस चालतं बोलतं विद्यापीठ असे म्हणतो कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं आणि ते कोणताही मोबदला न घेता अगदी प्रेमाने ते आपले ज्ञान वाटत असतात अन् आपणाला प्रोत्साहित करत असतात. अशीच ह्युमन लायब्ररी ही एक अनोखी कल्पना आता जगभरात विकसित झाली आहे. याविषयी….

राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

ह्युमन लायब्ररी म्हणजे काय?

ह्युमन लायब्ररी ही एक जगभरातील अनोखी आणि प्रेरणादायी संकल्पना आहे. जिथे लोकच पुस्तक बनतात आणि इतर लोक त्यांच्याकडून थेट त्यांची गोष्ट वाचतात, उत्तरे मिळवतात म्हणजेच ऐकतात. परंपरागत लायब्ररीमध्ये आपण कागदी किंवा डिजिटल पुस्तकं वाचतो, पण ह्युमन लायब्ररीमध्ये पुस्तक म्हणजेच एक जिवंत माणूस असतो, ज्याचं आयुष्य एखाद्या विशिष्ट अनुभवाने, संघर्षाने किंवा समाजाच्या एका विशेष बाजूने प्रभावित झालेलं असतं.

ह्युमन लायब्ररीची सुरुवात:

२००० साली डेन्मार्क ( Denmark ) मध्ये रोनी अबर्गेल ( Ronni Abergel ) आणि त्यांच्या मित्रांनी ही कल्पना सुरू केली. समाजातील गैरसमज, भेदभाव, आणि पूर्वग्रह कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. लोकांमध्ये सांस्कृतिक समज, मानवी सहानुभूती आणि खुली चर्चा वाढवणे हे उद्दिष्ट त्यामागे होते.

ह्युमन लायब्ररी कशी काम करते?

पुस्तकं म्हणजे लोक: विशिष्ट अनुभव असलेली माणसं (उदा. अपंगत्व, LGBTQ+, मानसिक आरोग्याशी झुंजलेली व्यक्ती, स्थलांतरित, जातीभेदाने प्रभावित व्यक्ती) स्वयंसेवक म्हणून पुस्तकं बनतात.

वाचक म्हणजे इतर लोक: वाचक पुस्तक निवडतात आणि त्या व्यक्तीशी थेट संवाद साधतात. ठराविक वेळासाठी (जसे की २०-३० मिनिटं) त्या व्यक्तीशी चर्चा करू शकतात. यातून त्यांना त्यांच्या समस्यावर उत्तरे मिळतात. प्रोत्साहन, उर्जा मिळते. वाचकांना त्या व्यक्तीचे अनुभव, संघर्ष, आव्हानं, आणि विचार जाणून घेण्याची संधी मिळते. वाचक कोणतेही प्रश्न मोकळ्या मनाने विचारू शकतात. आणि पुस्तक आपला अनुभव प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडतात.

ह्युमन लायब्ररीचे फायदे:

जिवंत संवादाचा अनुभव यातून मिळतो. इथे पुस्तक वाचायचं नाही, तर थेट एखाद्या व्यक्तीशी बोलून त्याचा अनुभव ऐकायचा असतो. समोरासमोर बसून त्या व्यक्तीच्या संघर्षांची, यशोगाथांची, आयुष्यातील अडचणींवरील मात करण्याच्या कहाण्यांची ओळख होते.

वाचकांना कोणतेही प्रश्न विचारण्याची मोकळीक असते (आदरपूर्वक), आणि “पुस्तकं” त्यांच्या कथा प्रामाणिकपणे शेअर करतात. कुठलाही टीका-टिप्पणीचा किंवा अपमानाचा धोका नसतो. सगळं वातावरण सन्मानाने आणि विश्वासाने भरलेलं असतं. सामान्य जीवनात ज्या लोकांशी कधीही भेट घडली नसती अशा वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी संवाद साधता येतो.

सुरवातीच्या काळात राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून एकमेकातील संवाद वाढला. साहजिकच यातून होणारे गैरसमज दूर होऊ शकले. लोकांमध्ये समजूत आणि सहानुभूती वाढल्याचे निदर्शनास आले. या उपक्रमातून विविधतेचा उत्सव साजरा होतो. संवाद वाढल्याने समाजात बंधुभाव निर्माण होतो. पूर्वग्रह नष्ट होतात आणि सकारात्मक विचाराची पेरणी होते. अशा या फायद्यामुळे ही कल्पना आता वेगाने विकसित होऊ लागली आहे.

समजा, एखादी व्यक्ती युद्धग्रस्त देशातून स्थलांतरीत झाली आहे, आणि त्याने येथे येऊन प्रगती केली आहे. ती व्यक्ती ह्युमन लायब्ररीमध्ये “पुस्तक” म्हणून सहभागी होते. वाचक त्या व्यक्तीला त्याच्या अनुभवांबद्दल विचारतात. त्याला काय अडचणी आल्या ? कशा प्रकारे त्याने नवीन देशात स्वतःला उभं केलं ? अशा प्रकारच्या थेट संवादातून वाचक त्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकतो.

भारतातील ह्युमन लायब्ररीचा विकास –

भारतातही विविध शहरांमध्ये (मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली) ह्युमन लायब्ररीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मराठी भाषेतही काही ठिकाणी ह्युमन लायब्ररीच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवले जात आहेत. या संकल्पनेत केवळ दोन व्यक्ती किंवा छोट्या गटात संवाद होत असल्याने समस्या सोडविण्यासाठी, अडचणी सोडविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर आहे.

सध्या विविध संस्था, कंपन्यांमध्येही असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्डप्रेसतर्फे आयोजित वर्डकॅम्पमध्ये हा उपक्रम उत्तम प्रकारे विकसित होत आहे. या संदर्भात…

वर्डकॅम्प म्हणजे काय ?

वर्डकॅम्प (WordCamp) हे वर्डप्रेस (WordPress) वापरणाऱ्यांसाठी आयोजित केले जाणारे स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. या कार्यक्रमात वर्डप्रेसशी संबंधित सर्वजण – डेव्हलपर्स, डिझाइनर्स, लेखक, उद्योजक, कंटेंट क्रिएटर्स – एकत्र येतात, ज्ञानाची देवाणघेवाण करतात आणि नेटवर्किंग करतात.

वर्डकॅम्पमधील ह्युमन लायब्ररी संकल्पना –

वर्डकॅम्पमध्ये पारंपरिक भाषणं, वर्कशॉप्स यांच्याशिवाय काही अनोखे आणि वैयक्तिक अनुभवांची देवाण घेवाण करणारे कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यामधूनच ह्युमन लायब्ररी हा प्रकार वर्डकॅम्पमध्ये आणला गेला. विशेषतः जिथे माणूस म्हणजे पुस्तक ह्या कल्पनेतून वर्डप्रेस समुदायातील व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या अनुभवांची थेट आपले अनुभव कथा सांगतात.

वर्डकॅम्पमध्ये “ह्युमन लायब्ररी” कशी राबवली जाते?

आयोजकांकडून वर्डकॅम्पमध्ये ह्युमन लायब्ररीच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. “पुस्तकं” म्हणजे सहभागी तज्ज्ञ व्यक्तींची निवड संयोजकांकडून केली जाते. ही व्यक्ती वर्डप्रेसशी संबंधित किंवा त्यांच्या आयुष्यातील विशेष संघर्ष, अनुभव, करिअरचा प्रवास इत्यादीवर बोलतात.

उदाहरणार्थ: एखादा डेव्हलपर जो ग्रामीण भागातून आला आहे किंवा एखादी स्त्री उद्योजिका जी वर्डप्रेस वापरून स्वतःचा उद्योग वाढवू इच्छित आहे. अशा व्यकीस एखादा संघर्ष करून स्वतःला सिद्ध केलेली व्यक्ती किंवा अडचणींवर मात करून यशस्वी झालेला डिझायनर पुस्तक म्हणून आपले अनुभव सांगतो. यातून नव्या होतकरू व्यक्तीस प्रोत्साहन मिळते. त्याला त्याच्या वाटा सापडतात.

हे सत्र एका विशेष हॉल किंवा जागेमध्ये आयोजित केले जाते. जेथे प्रत्येक “पुस्तक” एका टेबलवर किंवा खुर्चीवर बसतात. वाचक (इतर सहभागी) त्या व्यक्तीकडे जाऊन काही मिनिटं (उदा. १५-२० मिनिटं) थेट चर्चा करू शकतात. एकावेळी अनेक वाचक एका “पुस्तकाशी” संवाद साधू शकतात. विशिष्ट वेळेवर वाचक नवीन “पुस्तक” निवडतात. असे या सत्राचे स्वरुप असते.

संवादाचे नियम:

सर्व वाचकांनी आदराने आणि खुले मनाने प्रश्न विचारायचे असतात. “पुस्तकं” आपल्या अनुभवांविषयी मोकळेपणाने बोलतात, पण काही वैयक्तिक प्रश्न टाळले जातात. हा सेशन फारच मोकळा, संवादप्रधान आणि अनौपचारिक असतो.

ह्युमन लायब्ररी वर्डकॅम्पमध्ये का महत्त्वाची?

संवाद वाढतो: वर्डप्रेस समुदायातील विविध पार्श्वभूमीची माणसं एकमेकांच्या अनुभवांतून शिकतात.
प्रेरणा मिळते: अनेकांना आपल्या वाटचालीबाबत नवा दृष्टिकोन मिळतो.
समज वाढते: विविध संघर्ष, अडचणी आणि त्यावर मात केलेले अनुभव ऐकताना सहानुभूती आणि स्वीकार वाढतो.
नेटवर्किंग सोप्पं होतं: पारंपरिक व्याख्यानांपेक्षा थेट संवादामुळे खोलवर नाती तयार होतात.

WordCamp Europe 2023 मध्ये “ह्युमन लायब्ररी” सेशन आयोजित करण्यात आलं होतं. विविध “पुस्तकं” होती जसं की: Open Source Contribution करणारे जण, Women in Tech, Freelancers from Remote Villages वगैरे. वाचकांना त्यांचं जीवन, करिअर, आव्हानं याविषयी थेट प्रश्न विचारण्याची मोकळीक होती.

वर्डकॅम्पमध्ये “ह्युमन लायब्ररी” ही संकल्पना प्रथम वर्डकॅम्प एशिया 2024 च्या “कंट्रीब्युटर डे” मध्ये सादर करण्यात आली होती. या उपक्रमात सहभागी “ह्युमन बुक्स” म्हणजेच अनुभवी वर्डप्रेस योगदानकर्ते, सहभागींसोबत एक-एक संवाद साधून त्यांचे अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये शेअर करतात. या संवादांमुळे सहभागी नवीन कल्पना, प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळवू शकतात .

2025 मध्ये वर्डकॅम्प एशिया 2025 च्या “कंट्रीब्युटर डे” मध्येही ह्युमन लायब्ररीचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सहभागींसोबत संवाद साधला. उदाहरणार्थ, मिलाना कॅप यांनी डॉक्युमेंटेशन आणि प्लगइन रिव्ह्यूवर, धनेंद्रन राजगोपाल यांनी एंटरप्राइज पब्लिशिंग टूल्सवर, आणि हरि शंकर यांनी वर्डप्रेस समुदायातील योगदान व मार्गदर्शनावर चर्चा केली. यामध्ये निर्मल देसाई, रश्मी नागपाल, चियाकी कौनो, रॉबर्ट विंडिश, रायन वेल्चर, निक दिएगो, बिर्गिट पॉली-हाक आदी तज्ज्ञ ह्युमन पुस्तक म्हणून सहभागी झाले होते.

या सत्रांमधून सहभागी झालेल्या व्यक्तींनी स्वतःला आलेला अनुभव सांगितला. कोल्हापूर वर्डकॅम्पचे संयोजक मकरंद माने हे एशिया 2025 च्या वर्डकॅम्पमध्ये सहभागी झाले होते. ह्युमन लायब्ररीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि पुस्तकाशी त्यांनी संवाद साधला. याबद्दल सांगताना मकरंद माने म्हणाले, विविध विषयाती तज्ज्ञ यामध्ये ह्युमन पुस्तक रुपाने आपल्याशी संवाद साधतात. आपणाला आवश्यक असणारे तज्ज्ञ पुस्तक आपण निवडायचे असते आणि त्याच्याशी संवाद साधायचा असतो. यात मला माझ्या गरजांनुसार सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले. “ह्युमन बुक्स” यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासाच्या कथा शेअर केल्या, ज्यातून मला माझ्या कल्पनांना प्रोत्साहन मिळाले. यात सहभागी झाल्याने वर्डप्रेस समुदायाशी अधिक घट्ट संबंध प्रस्थापित करण्याची संधी मला मिळाली.

वर्डकॅम्पमध्ये “ह्युमन लायब्ररी” हा केवळ एक इव्हेंट नसतो, तर एक अनुभव असतो. ज्यातून मानवी कथा थेट वाचल्या जातात, शिकल्या जातात, आणि एकमेकांशी असलेलं नातं घट्ट केलं जातं. ह्युमन लायब्ररी म्हणजे “माणसांमधील भिंती तोडणारी आणि हृदय जोडणारी” एक अतिशय सुंदर आणि प्रभावी कल्पना आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading