April 16, 2024
There is still a long way to go article by Yashwanti Shinde
Home » अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे…!
सत्ता संघर्ष

अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे…!

भारत हा एक स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि या देशात जन्माला येणारा प्रत्येक नागरिक स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला येतो. या देशातल्या प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने बहाल केलंय, अगदी तुम्हीसुद्धा त्यात येता. मग स्त्रियांना स्वातंत्र्य दिलंय म्हणजे?”

यशवंती शिंदे, कोल्हापूर
मो. 8830179157

“यशवंती, फारच छान लिहितेस गं. त्याबद्दल तुझं अभिनंदन ! पण तू स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी लिहितेस. स्त्रियांच्या प्रश्नांविषयी लिहितेस. आता तसं कुठं राहिलं आहे का?” तो म्हणाला.
मी म्हटलं, “असं कुठे राहिलं आहे का म्हणजे ? स्त्रियांच्यावर अत्याचार, अन्याय होतच नाहीत असं तुला म्हणायचं आहे का ? स्त्रिया सर्व प्रकारच्या हिंसा, अन्याय-अत्याचारांतून मुक्त झाल्या आहेत असं म्हणायचं आहे का?”
“तसं नाही. एखादी-दुसरी केस असेलही. एखादीवर अन्याय होत असेल, तिला त्रास होत असेल. म्हणून असं असं घडतंय, इतकं लिहिण्यासारखं त्यात काय आहे?” तो म्हणाला.

“म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की, एखादीवर अन्याय होतोय म्हणजे तो अन्याय नाही. त्याची दखल काय घ्यायची?” मी.
“हो, तसंच. उलट आता स्त्रिया घराबाहेर पडल्या. स्वावलंबी झाल्या. आपल्या हक्कांबद्दल जागरूक झाल्या आणि आम्ही पुरुषच आता अत्याचारग्रस्त झालोय. आमच्या बाजूनेपण आता तू काहीतरी लिहायला पाहिजेस.”

मी म्हटलं, “तुमच्यावर काय अन्याय होतोय? आणि तुम्ही पुरुषप्रधान संस्कृतीत वावरणारे पुरुष अन्याय-अत्याचार खपवून घ्याल? बरं, सांगशील का, तुम्हा पुरुषांवर काय अन्याय होतोय ते?”
तर म्हणाला, “होय, आमच्यावर अत्याचार होतोय. आमच्यासारख्या ज्यांची पत्नी नोकरी करते, त्यांच्या व्यथा वेगळ्याच आहेत. माझंच बघ ना, बायको नोकरी करते. धुण्याभांड्याला बाई आहे. फक्त स्वयंपाकाचे काम घरात असते. तेही करताना तिला वाटते, मी मदत करावी. कधी म्हणते, लसूण सोलून दे. कधी म्हणते, कांदा कापून दे.”

मी म्हटलं, “मग बिघडलं कुठे? ती घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत असते ना! हे करत असताना त्यात तिला हातभार लावला तर काय होते?”
“ती नोकरी करते, घरात पगार आणते म्हणून तिचं सगळं ऐकावं लागतं.” त्याच्या स्वरात त्रागा दिसत होता.
“मग काय होते ऐकलं तर? बायकोचं ऐकलं म्हणून कमीपणा येतो का?” मी.

यावर तक्रारीच्या स्वरात म्हणाला, “कमीपणा येत नाही, पण ती नोकरी करते म्हणून प्रत्येक गोष्टीत बरोबरी करते. कामावरून घरी येते. आली की मी थकले म्हणते. मग सगळ्या कामांना पुढे उशीर होतो. वेळेत स्वयंपाक करत नाही. तो स्वयंपाकपण आम्ही पुरुषांनीच करायचा का?”

त्यावर मी समजावणीच्या स्वरात म्हणाले, “अरे बाबा, तीपण तुझ्यासारखीच नोकरी करते. तू शिक्षक आहेस, तीही शिक्षिका आहे. तुला जेवढा पगार, तेवढाच तिलाही आहे. मग तुला स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी हवी? तू शाळेतून घरी आलास की, तुला चहा कोण करून देतं? तीच देत असणार. मग तिलाही कधीतरी असं वाटत असेल ना की, मलापण आयता चहा मिळावा. आयतं जेवण मिळावं.”
“मग देतो की मी कधीकधी. पण हिच्या अपेक्षा वाढतच जातात. प्रत्येक काम करताना हिला वाटतं, मी त्यात मदत करावी. हे सगळं ती शिकल्यामुळे आणि नोकरी करत असल्यामुळे झालंय बघ. ती घरातच राहिली असती तर कशाला अशी बरोबरी करत बसली असती? गपगुमान सगळं करून दिलं असतं!”

त्याचा हा दृष्टिकोन पाहून मी चक्रावलेच. तो अजूनही तावातावाने बोलत होता.
म्हणाला, “आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींमध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय, हे बायका नोकरी करत असल्यामुळेच. या बायका पैसे कमावतात. यांना मित्रमैत्रिणी असतात. त्यांच्याबरोबर पार्ट्या कराव्या वाटतात. त्यांना पैशांबद्दल विचारलं की राग येतो. यांना नवऱ्यासारखे हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य हवे असते. पैसे कमावण्याची चावी यांच्या हातात आली, याच्यामुळं त्या अशा वागतात!”

“म्हणजे तुला म्हणायचंय की, घटस्फोटाचं प्रमाण स्त्रिया शिकल्यामुळे वाढलंय? मग बायकांनी शिकून, नोकरी करून स्वावलंबी नाही झालं पाहिजे का? आणि पैशांबद्दल म्हणालास, तर तुम्ही पुरुष बायकांना किती हिशोब देता?”

“स्वावलंबी झालं पाहिजे की. पण या आता आपल्या अधिकारांसाठी भांडू लागल्या. नवऱ्याबरोबर बरोबरी करू लागल्या. मी जे काम करते, ते तूही केलं पाहिजे, असं म्हणू लागल्या. तुला पैशांचा हिशोब मी मागत नाही म्हणून, मीही पैशांचा हिशोब देणार नाही असं म्हणू लागल्या. त्यामुळे कुटुंबात वाद होऊन घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले आणि असल्या प्रकारांमुळे कुटुंबसंस्था धोक्यात येत आहे. याला कारणीभूत नोकरी करणाऱ्या मुलीच आहेत.”

“म्हणजे स्त्रीने नोकरी केल्यामुळे, स्वावलंबी झाल्यामुळे कुटुंबसंस्था धोक्यात आली, असं म्हणायचं आहे का तुला?”
“तसं नाही, पण जरा समजून घ्यावं ना. कशाला हवी सगळीकडे बरोबरी? बाई, पुरुष निसर्गाने कशाला निर्माण केलेत? बाईने बाईसारखं राहावं ना.”
“बाईने बाईसारखं राहावं म्हणजे काय करायचं? तिने आपली मते मांडू नये, अधिकार, हक्क मागू नयेत. आपलं कसं आज्ञाधारक बनून सगळ्यांच्या इच्छा पुरवत सेवाभावी वृत्तीने राहावं! घर आणि मूल सांभाळावं हेच म्हणायचं आहे का तुला?”
“एकदम तसं नाही. पण सारखी पुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. आणि आम्ही पुरुषांनी तुम्हा बायकांना स्वातंत्र्य दिलंय ते बघा. केवळ त्यामुळे तुम्ही शिकलात, नोकरी करू शकलात. ते राहिलं बाजूला? उलटं स्वातंत्र्य देणाऱ्याच्या मागे हात धुवून तुम्ही लागलात…”

हे ऐकून मी अवाकच झाले. म्हटलं,
“अरे, पण स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? स्त्री काय गुलाम म्हणून जन्माला आली होती का? की तुम्ही ती विकत आणली? भारत हा एक स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि या देशात जन्माला येणारा प्रत्येक नागरिक स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला येतो. या देशातल्या प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने बहाल केलंय, अगदी तुम्हीसुद्धा त्यात येता. मग स्त्रियांना स्वातंत्र्य दिलंय म्हणजे?”
“म्हणजे तुम्हा स्त्रियांना आधी शिक्षणाचा अधिकार नव्हता, तुम्ही शिकला आणि आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटू लागला. सगळ्या आधुनिक सोयीसुविधा हाती आल्या. त्यामुळे तुमची कामे सोपी झाली. तुम्हाला पूर्वीसारखं जात्यावर दळण दळायला पाहिजे होतं. हातात शेण घेऊन घर सारवायला पाहिजे होतं. घराच्या भिंती पोतेऱ्याने सारवायला पाहिजे होत्या. चुलीवर स्वयंपाक करायला लागला असता म्हणजे तुम्हाला कळलं असतं! सगळं तुमच्या मनासारखं चाललंय म्हणून तुम्हाला कष्ट नको वाटतात. तुम्ही स्त्रिया पाश्चात्त्य संस्कृतीचं अनुकरण करू लागलात. आपली संस्कृती नष्ट होऊ लागली. केस छोटे करू लागलात, साडी नेसायची तर तुम्हा स्त्रियांना लाजच वाटते! सगळं पाश्चात्त्यांसारखं स्वातंत्र्य तुम्हाला हवं आहे. मग आपल्या संस्कृतीच्या विनाशाला तुम्ही शिकलेल्या स्त्रियाच जबाबदार आहात.”

हे विचार ऐकून मी सुन्नच. मी म्हटले,
“स्त्रिया संस्कृतीच्या विनाशाला कशा जबाबदार? आणि कसली संस्कृती? जी संस्कृती स्त्रीला पशूपेक्षाही हीन, पुरुषाची गुलाम समजते, ती स्त्रियांनी का जतन करायची? आणि संस्कृती स्त्रियांनी बुडवली असं कसं तू म्हणू शकतोस? संस्कृती जतन करण्याचं काम बायकांच्या माथी का? तू म्हणतोस ती संस्कृती तुला इतकीच प्रिय आहे तर तुम्ही करा ना संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न, तोही तुमच्या पातळीवर, स्वतःच्या कृतीतून. नेसा धोतर, डोक्याला पटका (फेटा) बांधा. तीन गुंड्यांचा शर्ट घाला. बैलगाडीने फिरा, बंद करा मोटारसाइकल, फोर व्हीलर वापरणे. नोकरी सोडा, बैल पाळा. शेतात जा, नांगरणी करा. दारं धरा, शेताला पाणी पाजा. आपल्या कृषिसंस्कृतीचे जतन करा. मग आम्हाला सांगा साडी नेसायला आणि तुमची तथाकथित संस्कृती जतन करायला. पत्नी नोकरी करणारी असावी, पगार हातात आणून द्यावा. घरातली सगळी कामे खालमानेनं निमूटपणे करावी. आल्यागेल्यांचा आदरसत्कार, पाहुणचार करावा. घरातल्यांच्या आणि बाहेरच्यांच्याही पुढेपुढे फार करू नये. डोक्यावर पदर घ्यावा. मग अशी बाई सुसंस्कृत, बरोबर ना?”
“मग यात काय चुकीचं आहे? आपली प्राचीन संस्कृती हेच सांगते ना!”
“चुलीत घाला तुमची संस्कृती,” मी म्हणाले, “आणि काय रे, तू आजच्या विज्ञानाच्या युगात वावरतोस की मध्ययुगीन मनुस्मृतीच्या? कसला शिक्षक आहेस तू? ज्या मनुवादी संस्कृतीने स्त्री म्हणून जन्माला येणं हेच मुळी पाप आहे असे मानले, तिने निर्मिलेल्या धर्मग्रंथांवर आधारित जगणं म्हणजे संस्कृती काय?”

“अगं, तुम्हा बायकांना कसली बंधनेच नको असतात. स्त्रियांना बंधने असली तरच समाज सुसंस्कृत राहतो. आता माझी बायकोच बघ, तिला मी नोकरीची गरज म्हणून टू-व्हीलर शिकवली. तर आता म्हणते, मला फोर व्हीलर शिकायची आहे. काय गरज आहे तिला गाडी शिकायची? मी आहे ना घरात. आणि कुठे जाणार आहे ती गाडी चालवत? कामापुरती छोटी गाडी येते, पुरेसं आहे.”
“पण काय होते तिने फोर व्हीलर शिकले तर? तिलाही वाटत असेल आपण गाडी शिकावी, आपल्या कुटुंबाला गाडीत घेऊन फिरवायला न्यावं किंवा स्वतः सक्षम व्हावं. तुलाही फिरवून आणेल ती कधीतरी गाडीत बसवून.”

“एवढंच राहिलंय आता. म्हणजे तिने ड्राइव्हिंग करायची आणि मी तिच्या बाजूला बसायचं. सगळा गाव माझ्याकडे बघेल. काय राहील का माझी इज्जत? आणि मग मी कशाला आहे? मी बसवतोच की तिला गाडीत माझ्याशेजारी, अगदी पुढच्या सीटवर. तरीपण मला म्हणते, मलापण तुमच्यासारखी गाडी चालवायला शिकायची. हेच गावाला दाखवायचं राहिलंय आता.”
माझ्या मित्राच्या बोलण्यातून पत्नी गाडी शिकते म्हणजे आपली अब्रू जाऊन गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही असाच आविर्भाव दिसत होता. मी म्हटलं, “नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे? तिने गाडी शिकणे हा की तुझी इज्जत जाईल हा? आणि काय रे, इतकी वर्षे ती तुझ्या शेजारी गाडीत/गाडीवर बसली, तेव्हा तिला असा कमीपणा कधी वाटला नाही. मग तुला का वाटावा?”

“तिला कमीपणा वाटायचं काय कारण आहे? पुरुषाने बाईच्या मागे गाडीवर बसायचं, बाईने फोर-व्हीलर चालवायची आणि पुरुषाने तिच्या शेजारी बसायचं… कसं दिसतं हे दृश्य? असलं खेड्यापाड्यात बरं दिसत नाही. लोक मला काय म्हणतील? माझं म्हणणं एवढंच आहे, बाईने बाईसारखं राहावं. पुरुषांची बरोबरी करू नये. आणि पुरुषासारखं वागण्याचा प्रयत्न करू नये.”
“सोप्या भाषेत सांग ना, की तुला भीती वाटते बायको प्रत्येक गोष्टीत स्वावलंबी होईल, सक्षम होईल आणि तुझा वरचश्मा चालणार नाही. तुला कुठल्या तरी बाबीत तिच्यापेक्षा आपण श्रेष्ठ असा अधिकार गाजवता येणार नाही आणि तिला तुझी कसलीही गरज उरणार नाही. आपण लग्न करून आणलेली पत्नी ही हक्काची मोलकरीण उरणार नाही. तिने तुझी गुलामी नाकारली तर तू अधिकार कुणावर गाजवायचा? तुझा पुरुषीपणा मग कुठल्या कामी यायचा? तिने तुझ्या शब्दांत राहिले तरच तू श्रेष्ठ राहणार ना! तुला न जुमानता ती जर स्वतःच्या क्षमतांना सिद्ध करत एक स्वयंभू व्यक्तिमत्त्व बनली तर तुझं काही विशेष असं अस्तित्वच राहणार नाही.”

“हे माझे एकट्याचे विचार नाहीत. समाजातील सर्व पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून मी हे बोलतोय. या समस्यांनी ग्रस्त असे अनेक तरुण पुरुष समाजात आहेत. त्यांची ही व्यथा आहे.”
“कसली व्यथा रे? पत्नी तुमच्या बरोबरीला आली ही व्यथा? तुम्ही तुमच्या मुलामुलींना काय संस्कार देणार मग? आणि स्वतःला सध्याच्या पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून कशाला सांगतोस? तुझ्यासारखे समाजातील स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेच्या विरुद्ध असणारे काहीजण म्हणजे पुरुषांचे प्रतिनिधी होऊच शकत नाहीत. साधारण दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांच्या प्रयत्नांतून स्त्रियांच्या शिक्षणाची दारे खुली झाली आणि अनेक जणी स्वावलंबी होऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावू लागल्या. स्वत्वाचे भान येऊन कुटुंबाचा आधार बनू लागल्या. असंख्य स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या. दोनेकशे वर्षांपूर्वी सतिप्रथेचे मोठेपण आपल्या देशात होते, पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने सती जाणे म्हणजे स्वर्गप्राप्ती होणे असा समज होता. राजा राममोहन रॉय यांनी आपल्या देशातील सतिप्रथेतला क्रूरपणा निदर्शनास आणून या प्रथेविरुद्ध ब्रिटिशांना कायदे करायला भाग पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने शूद्रांबरोबरच स्त्रियांना समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी संविधानात तरतुदी केल्या. असे स्त्रियांच्या जीविताचा, हक्कांचा, स्वावलंबनाचा विचार करणारे पुरुषच होते. आजही असे अनेक उदारमतवादी आणि समतेच्या वाटेवर चालणारे पुरुष आहेत, ज्यांच्यामुळे समानतेची चळवळ कणाकणाने पुढे चाललेली आहे आणि तुझ्यासारख्या प्रतिगामी प्रवृत्ती अख्ख्या समाजाला मागे ओढीत आहेत. कशाला स्वतःला पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणवून घेतोस? तू आजच्या आधुनिक काळात पुरातन, प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांचा प्रतिनिधी वाटतोस. मला वाईट याचे वाटते की, तू शिक्षक आहेस. एखाद्या शिक्षकाचे विचार जर असे असतील तर तो आपल्या विद्यार्थ्यांना काय समतेची शिकवण देणार? तुझ्या हाताखालून कित्येक मुले शिक्षित होतील, त्या सगळ्यांना तू तुझे असले विचार शिकवत गेलास, तर त्या सगळ्या पिढ्यांमधील मुलं तुझ्यासारखाच विचार करू लागतील… मग त्या भावी पिढ्यांचं काय?”
“किती ऐकवतेस मला? मी आपलं पुरुषांचे प्रश्न असे असे आहेत मांडायला गेलो, तू आमच्यावर काहीतरी लिहिशील म्हणून! तर तू माझे चांगलेच वाभाडे काढलेस!”

यावर म्हटलं, “अजून वाभाडे काढलेत कुठे? तुझ्या प्रश्नावर खरंच लिहिते, अगदी जसंच्या तसं. मग तुला कळेल वाभाडे काय असतात ते! तुमच्यावर काय अन्याय होतो, तुम्ही कसे शोषित आहात, हेच लिहायचं आहे ना?”

यावर नरम होत म्हणाला, “ए बाई, असं काही लिहू नकोस. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मी आपलं मला जे वाटतंय ते व्यक्त करायला गेलो तर तू मला चांगलंच लेक्चर दिलंस.”
अशा प्रकारे शेवटी मी लिहिते म्हटल्यावर माझा शिक्षक मित्र वरमला. समाजात आपली अब्रू जाईल अशी त्याला भीती वाटू लागली. तसं काही नाही म्हणत, त्याने माझा निरोप घेतला; पण असंख्य प्रश्न डोक्यात निर्माण करून गेला. ज्या आईच्या पोटी आपला जन्म झाला, आजी, बहीण, पत्नी, वहिनी, मावशी, काकी, मामी, आत्या अशा अनेक नात्यांच्या स्त्रियांभोवतीच ज्यांचे अस्तित्व आकाराला येते, बहरते, त्या पुरुषांना स्त्रिया आपल्या पावलाबरोबर समानतेने येताना एवढे असुरक्षित का वाटते? कोणत्या भीतीने आणि न्युनगंडाने त्यांना ग्रासलेले असते? या सगळ्यांच्या मुळाशी नेमके काय आहे? या भयग्रस्ततेचे ओझे घेऊन ही माणसे आयुष्यभर कशी जगत असतील? यातून हे कधी बाहेर येणार? एवढे मात्र नक्की जाणवले की, समतेच्या वाटेवर चालत असताना आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे…!

Related posts

निसर्गाच्या विचारातूनच निसर्गाचे संवर्धन शक्य

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोन्याच्या तस्करी करणारी साखळी डीआरआयकडून उध्वस्त

Leave a Comment