महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे.
ॲड.शैलजा मोळक
प्रा. डॉ. अरुण शिंदे यांचे तरुण पिढीतील प्रभावी आणि व्यासंगी संशोधकांमध्ये स्थान उच्च असून त्यांचा ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हा नवीन ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सक दृष्टिकोनाची साक्ष देणारा आहे. ते विपुल स्वरूपाचे वैचारिक लेखन करीत असले, तरी सत्यशोधकीय साहित्य हा त्यांचा संशोधनाचा खास आत्मीय विषय आहे. आधुनिक काळात महात्मा फुल्यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात आणि इतिहासात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच एक सत्यशोधकीय पत्रकारिताही बहरली. डॉ. शिंदे यांनी या पत्रकारितेचा चिकित्सक अभ्यास वाचकांना सादर करताना ‘दीनबंधु’, ‘दीनमित्र’, ‘शेतकऱ्याचा कैवारी’, ‘जागृति’, ‘विजयी मराठा’, ‘राष्ट्रवीर’, ‘प्रबोधन’, ‘हंटर’, ‘सत्यवादी’, ‘कैवारी’ अशा साठहून अधिक नियतकालिकांचा आढावा आपल्या या ग्रंथात घेतला आहे. माझ्या माहितीनुसार असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे. हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे. त्यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून केले आहे. ज्यांना आपल्या क्रांतिकारक भूतकाळाविषयी कृतज्ञता आहे आणि ज्यांच्या मनात आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी चितेबरोबरच प्रचंड आशाही आहे, आस्थाही आहे आणि जे आपल्या भावी पिढ्यांसाठी देखणी आणि निरामय स्वप्ने पहात आहेत, त्या सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. एका दृष्टीने हा ग्रंथ सर्वच मराठी वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी प्रकाशाची एक नवी वाट निर्माण करीत आहे, यात शंका नाही. मी डॉ. शिंदेचे या ग्रंथाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना अशाच भरीव व कसदार लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आता आमच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत, याची त्यांना मुद्दाम आठवण करून देतो!
डॉ. आ. ह. साळुंखे
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. आजही सत्यशोधक विचार समाजात जोपासला जातो. यातून तो वाढीस लागत आहे. सत्यशोधकीय विचार जनमानसांपर्यंत जावेत यासाठी तत्कालीन सत्यशोधकांनी पत्रकारितेचा आधार घेऊन नियतकालिके सुरु केली.
महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, भास्करराव जाधव, मुकूंदराव पाटील, भगवंतराव पाळेकर, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे, श्रीपतराव शिंदे, बाबुराव यादव, दिनकरराव जवळकर, केशव सीताराम ठाकरे अशा अनेकांनी अनुक्रमे सत्सार, दीनबंधू, अंबालहरी, शेतकऱ्याचा कैवारी, मराठा दीनबंधु, दीनमित्र, जागृति, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, गरीबांचा कैवारी, तरूण मराठा, कैवारी, तेज, प्रबोधन, लोकहितवादी अशी अनेक नियतकालिके सत्यशोधकीय विचार प्रचार प्रसारासाठी काढली होती.
महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. या ग्रंथात सत्यशोधक चळवळ, सत्यशोधकीय नियतकालिकांचे स्वरूप, सत्यशोधकीय नियतकालिकांचे वैचारिक साहित्य, सत्यशोधकीय नियतकालिकातील कविता, कादंबऱ्या, कथा, नाट्यस्वरूप वाड्मय आदीचा सखोल संशोधन व अभ्यास करून यात अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
डॅा. आ. ह. साळुंखे यांनी या ग्रंथाची पाठराखण केली आहे. असा अभ्यासपूर्ण ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे असे ते म्हणतात. भूतकाळ समजून घेऊन वर्तमानात त्या विचारांची अंमलबजावणी केली तर आपला भूतकाळ प्रकाशमान होईल यात शंकाच नाही.
पुस्तकाचे नाव:- सत्यशोधकीय नियतकालिके
लेखक :- डॅा. अरूण शिंदे
प्रकाशक – कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा
पृष्ठे:- ५३२ (पुठ्ठा बायडिंग )
किंमत :- ₹ ७५०/-
पुस्तकासाठी संपर्क – 9823627244
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.