तणावाखाली असणारी झाडे सुखात असणाऱ्या झाडांपेक्षा वेगळा आवाज काढतात, हे या संशोधनाचे सार आहे. लिलाच हॅडनी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. पाणी अपूरे मिळणे, हे झाड तणावाखाली येण्याचे प्रमुख कारण आहे. पाणी कमी मिळाले की झाडाचा रंग बदलतो. त्याचा वास आणि आकारही बदलतो. मात्र झाडांचा आवाज बदलतो हे या संशोधनातून प्रथमच सिद्ध करण्यात आले आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
बहुतांश भारतीय रूढी, प्रथा, परंपरा, सण साजरे करण्यामागे शास्त्रीय विचार आढळतो. मात्र त्याची मांडणी वैज्ञानिक सत्यावर आधारीत झालेली नाही. ती धार्मिक किंवा देवावर आधारित आहे. त्यामुळे अनेक लोक अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. तर कालौघात आलेले बदल स्वीकारत अनेकजन त्या अंधपणे साजऱ्या करतात. अशाच संदर्भात इस्राईल आणि अमेरिकेतील संशोधकांचे वनस्पतीसंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
भारतीय रूढी, प्रथा, परंपरा आणि सण साजरे करताना वनस्पतींचा वापर किंवा संबंध येतो. हे संशोधनही वनस्पतींच्या संदर्भात आहे. वनस्पती तणावात असताना आवाज करतात. हे आवाज अल्ट्रासोनिक तरंगाच्या रूपात असतात. त्यामुळे मानवी कानांना त्यांची संवेदना जाणवत नाही. त्यामुळे या तरंगाना शोधणारी उपकरणे वापरून, पंधरा संशोधकांच्या गटाने केलेले संशोधन ‘सेल’ या जगप्रसिद्ध संशोधनपत्रिकेच्या ९ मार्च २०२३च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. भारतीय संशोधक जगदिशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात, हे सर्वप्रथम मांडले. सुरुवातीला रॉयल सोसायटीने त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध करण्यास नकार दिला. ज्यावेळी हे लेखन त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केले आणि ते लोकप्रिय ठरू लागले तेव्हा रॉयल सोसायटीने ते मागवून घेतले आणि प्रसिद्ध केले. नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या संशोधनाने जगदिशचंद्र बोस यांच्या निष्कर्षाची आठवण आली. पुढे संगीत ऐकवल्यास पिकांची वाढ चांगली होते, हे शोधण्यात आले.
तणावाखाली असणारी झाडे सुखात असणाऱ्या झाडांपेक्षा वेगळा आवाज काढतात, हे या संशोधनाचे सार आहे. लिलाच हॅडनी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. पाणी अपूरे मिळणे, हे झाड तणावाखाली येण्याचे प्रमुख कारण आहे. पाणी कमी मिळाले की झाडाचा रंग बदलतो. त्याचा वास आणि आकारही बदलतो. मात्र झाडांचा आवाज बदलतो हे या संशोधनातून प्रथमच सिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनासाठी टोमॅटो आणि तंबाखूची रोपे निवडण्यात आली होती. ही झाडे आवाजविरहीत अशा ग्रीनरूममध्ये वाढवण्यात आली. त्यांच्या वाढीच्या सर्व नोंदी नियमीत घेण्यात आल्या. त्यानंतर काही रोपांना पूर्वीप्रमाणेच सर्व सुविधा म्हणजे पाणी आणि खते देण्यात आली. मात्र काही रोपांना यापासून वंचीत ठेवण्यात आले. त्यावेळी ज्या रोपांना खते आणि पाणी पूरेशा प्रमाणात देण्यात आले नाही, त्या झाडांच्या रंग, आकार आणि वासामध्ये बदल जाणवला. यातील वास बदलतो, कारण तणावाखाली असणारी वनस्पती उर्ध्वपतन होईल, असे सेंद्रिय रसायन बाहेर टाकते. त्याच्या संवेदना शेजारी असणाऱ्या झाडांपर्यंत पोहोचतात आणि त्या अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सावध करतात. तणावामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये दृश्य, रासायनिक आणि स्पर्शज्ञानाने समजतील असे बदल होतात. उदाहरणार्थ काही वनस्पतींपासून पाणी कमी मिळाल्यास उग्र वास येतो. पानांचा रंग बदलतो. तसेच काही वनस्पतींची पाने ताठ दिसत असली, तरी त्यांना स्पर्श केल्यास मऊपणा आल्याचे लक्षात येते. या त्यांच्यातील बदलांचे आकलन त्यांच्याभोवती असणाऱ्या समस्त जीवसृष्टीला होते. मात्र त्यांच्या वेदना ज्या आवाजात बाहेर पडतात, त्याबाबत आजवर संशोधन झालेले नव्हते.
हा आवाज वनस्पतींच्या खोडातील पाणी वाहून नेणाऱ्या भागातून बाहेर पडतो. त्या ठिकाणी पाणी कमी मिळाल्यामुळे हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळे तो भाग फुगतो आणि त्यापासून हा आवाज येत असल्याचे हे संशोधन सांगते. हा आवाज ध्वनीबंद ग्रीनहाऊस इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने नोंदण्यात आला. या वनस्पतींचा आवाज त्यांना खाणाऱ्या प्राण्यांना आणि झाडाच्या सहनिवासी जीवांना मात्र ऐकायला येतो. झाडे तणावाखाली आल्यानंतर त्यांच्या फुलांमध्ये पुष्परसांचे प्रमाण वाढते. वनस्पतींचा हा आवाज काही मीटर दूरवर ऐकायला येतो. तसेच वनस्पतींना जगण्यासाठी आवश्यक घटकांची कमतरता झाल्यास आवाज येतो. झाड तोडतानाही असा आवाज येतो. तसेच वेगवेगळ्या तणावाखाली येणारे आवाजही वेगळे असतात. या संशोधनामध्ये मिळालेल्या निष्कर्षाचा फायदा पिकांची चांगली वाढ करण्यासाठी होऊ शकेल, असे या संशोधकांनी नमूद केले आहे.
या संशोधनातही मानवाने आपल्या स्वार्थाचाच विचार केला आहे. पिकांची वाढ चांगली करणे आणि त्यापासून उत्पादन वाढवणे हा संशोधनातील फायदा दिसतो. तरीही या संशोधनाने वनस्पतींना भावना असतात आणि त्या तणावाखाली वेगळे आवाज काढतात, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. तरीही, एकूण जीवसृष्टीसाठी वनस्पतींचे योगदान आणि त्यांचे संवर्धन करणे, जतन करण्यासंदर्भात कोणताही विचार मांडण्यात आलेला नाही. खरेतर, पृथ्वीवर जीवसृष्टी टिकवून ठेवावयाची असेल तर जल, जंगल आणि जमीन यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. या तीन घटकांतील कोणताही एका घटकाचे प्रमाण घटले तर संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. जमीन चांगली असेल, तर तेथे पाणी टिकेल आणि वनस्पती चांगल्या वाढतील. वनस्पती चांगल्या वाढल्या, तर त्या जमिनीची धूप थांबवतील आणि जमिनीत पाणीही टिकवून ठेवतील. जमिनीत पाणी असेल तर वनस्पती चांगल्या वाढतील. पर्यावरण योग्य राहील.
आपल्या हातात पाऊस पाडणे नाही. जमीनीचा पोत बदलणे ठरावीक मर्यादेपर्यंतच शक्य आहे. त्यामुळे या क्षेत्रात फार मोठे बदल करता येणे शक्य नाही. विविध प्रकारच्या मातीमध्ये, जमिनीमध्ये वाढणाऱ्या झाडांच्या जाती आहेत. योग्य जागी योग्य वाणांची झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे आपल्या हाती आहे. मागील काही वर्षात झाडांचे महत्त्व लोकांच्या लक्षात आल्यामुळे अनेक लोक मोठ्या उत्साहाने झाडे लावतात. मात्र लावल्यानंतर ती वाढतात किंवा नाही याबाबत चिंता करत नाहीत. झाडे मात्र त्यांच्या सहजिवींना आपबिती सांगतात. सावध करतात. झाडे चल नाहीत. त्यांना आपल्यासाठी योग्य वातावरण शोधता येत नाही. ते स्वत:ची जागा सोडून योग्य ठिकाणी जाऊ शकत नाही. ही सवलत प्राण्यांना मिळते. प्राण्यांना जगण्यासाठी वातावरण योग्य नाही, असे वाटले की ते आपली जागा सोडून योग्य जागी जाऊन राहतात.
झाडे मानव लावतो. मात्र त्यांची काळजी बहुतांश वेळा घेतली जात नाही. त्यामुळे लावलेली अनेक झाडे मरतात. मोठी झाडे अमानुषपणे कापतात. मानवाला रस्ते मोठे हवेत, कारखाने उभारायचे असतात. शेतीसाठी जमीन हवी असते. इमारती बांधायच्या असतात. अन्न शिजवण्यासाठी जळण हवे असते. त्यासाठी झाडे तोडली जातात. मात्र भविष्यात यासाठी झाडे असायला हवीत. झाडे लावताना त्यांना जगवण्याचा विचार प्रथम व्हायला हवा. तोडताना झाडांनाही भावना आहेत, हे लक्षात घ्यायला हवे!