श्रीलंका म्हटले म्हणजे कोणाही भारतीयाच्या मनात सर्वप्रथम रावणाची लंका येते ! पण बहुतेक तिथेच श्रीलंकेची ओळख सुरू होते आणि संपतेही ! भारतात इतकी माहीत असलेली आणि तिच्याबाबतीत इतके अज्ञान असलेली क्वचितच दुसरी जागा असेल. तमिळ एलमच्या लढ्याच्या बातम्या, भारतीय तमिळ मच्छीमारांना बंदी केल्याच्या बातम्या, क्वचित प्रसंगी श्रीलंकन चहा आणि अर्थातच क्रिकेट यापलीकडे नेहमीच्या बातम्यांत श्रीलंका क्वचितच येते.
असे असले तरी भारताच्या दक्षिणेला खेटून असलेल्या या बेटाबाबत नेहमीच एक कुतूहल मनात होतं. कर्मधर्म संयोगाने या विषववृत्तीय प्रदेशातल्या हिरव्यागार झाडीने समृद्ध पाचूच्या बेटाला भेट देण्याचा योग अचानक जमून आला. चला तर मग निघूया श्रीलंका म्हणजेच सिंहलव्दिपाच्या सफरीला !
श्रीलंकेचा त्रोटक इतिहास
श्रीलंकेत सापडलेल्या आदिमानवाच्या अवशेषांचे वय १२५,००० (काहींच्या मते ५००,०००) वर्षे मागे जाते, तर आधुनिक मानवांच्या अवशेषांचे (बालांगोदा मानव, Balangoda Man) वय ३७,००० वर्षे मागे जाते. हा मानव शेती करत असे आणि तो शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर करत असे पुरावे आहेत. जेम्स एमर्सन टेनेटच्या एका सिद्धान्ताप्रमाणे श्रीलंकेच्या तार्शिश (आताचे गाले) नावाच्या बंदरातून प्राचीन इझ्रेलचा राजा सॉलोमन हस्तिदंत, मोर, मोरपिसे आणि इतर किंमती वस्तू आयात करत असे.
श्रीलंका आणि भारत शेजारी असल्याचे त्यांचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. साहजिकच त्यांचे उल्लेख दोन्ही देशांतील अनेक कथा, कविता, पुराणे व दंतकथांत आहेत. पाली भाषेत लिहिलेल्या महावंश या ग्रंथाप्रमाणे श्रीलंकेचे मूलवासी यक्ष व नाग या नावांनी ओळखले जात होते. भारतातील आताच्या बंगालमधील रार प्रदेशातून विजय (सिंह) नावाचा एक राजपुत्र इ स पूर्व ५४३ मध्ये तेथे आठ जहाजांतून ७०० जणांना घेऊन पोहोचला आणि तेथे आपले राज्य (इ स पूर्व ५४३ ते ५०५) स्थापन करून त्याने श्रीलंकेत सिंहला राजांची परंपरा सुरू केली. तेथील तांब्याच्या रंगाची नारळाची झाडे पाहून त्याने या बेटाला (आणि आपल्या राज्याला) थांबापन्नी (Thambapanni, ताम्रपर्णी) असे नाव दिले.
साधारणपणे १८९ श्रीलंकन राजांची ही वंशपरंपरा इ स १८१५ मध्ये तेथे ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर खंडीत झाली. इ स पूर्व सहाव्या शतकात सुरू झालेला सिंहला राजवंशाची राज्यरेखा, मधून मधून तमीळ एलाराने (राजवंश) व चोल वंशाच्या राजांनी खंडीत केली. सम्राट अशोकाचा मुलगा अरहन्त महिंदा (महिंद्र) याने श्रीलंकेत बौद्ध धर्म आणला. त्यामुळे, प्रथम हिंदू असणारी ही राज्ये इ स पूर्व तिसर्या शतकापासून बौद्ध प्रभावाखाली आली. या राजवंशांची माहिती दीपवंश, महावंश, कुलवंश, लंकावतारासुत्र आणि राजवालिया अशा अनेक ग्रंथांत लिखित स्वरूपात आहे.
विजयसिंह आणि त्याच्या पूर्वीपासून भारतात हे बेट लंका या नावाने ओळखले जात होते. प्राचीन ग्रीक नकाशात त्याचा उल्लेख ताप्रोबना (Ταπροβανᾶ, Taprobanā) असा आढळतो. अरब प्रवासी त्याचा उल्लेख सरंदीब (इंग्लिश serendipity या शब्दाचा उगम या शब्दामध्ये आहे) असा करत. इ स १५०५ मध्ये पोर्तुगीजांचे भारतीय उपखंडात आगमन झाल्यावर त्यांनी या बेटाला सायलाव (Ceilão) असे नाव दिले. याच नावाच्या आधारावर इंग्रजांनी या बेटाला सिलोन (Ceylon) असे म्हणायला सुरुवात केली. १९४८ साली स्वतंत्र झाल्यावरही सिलोन हेच नाव चालू राहिले. नंतर १९७२ साली ते “Free, Sovereign and Independent Republic of Sri Lanka” असे व नंतर १९७८ साली “Democratic Socialist Republic of Sri Lanka” असे बदलले गेले. तिथपासून हा देश श्रीलंका या संक्षिप्त नावाने ओळखला जातो.
६५,६१० चौरस किमी क्षेत्रफळाच्या या बेटरुपी देशात आठ युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थळे (UNESCO World Heritage Sites); वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेली १५ राष्ट्रीय उद्याने; ५००,००० एकरांवर पसरलेल्या गर्द हिरव्या चहाच्या बागा; २५० एकराच्या वनस्पतिशास्त्राला वाहिलेल्या बागा (botanical gardens); ३५० धबधबे आणि २५,००० तलाव आहेत. हे बेट विषववृत्तीय प्रदेशात वसलेले आहे. अर्थातच तेथे वर्षभर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच हा देश त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बेट असलेल्या या देशाला असलेला १,५८५ किमी लांब समुद्रकिनाराही परदेशी पर्यटकांना आकर्षक वाटतो. इतक्या लहान जागेत इतके वैविद्ध्य इतर फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळते. श्रीलंकेच्या जादुई सौंदर्यामुळे ती भारतीय महासागरातला मोती (Pearl of the Indian Ocean) या नावानेही ओळखली जाते.
श्रीलंकेची इतकी तोंडओळख पुरे. फिरताना वाटेतल्या प्रत्येक ठिकाणावर तिथल्या इतिहासाची आणि वैशिष्ट्याची ओळख करून घेत सहलीचा आनंद वाढवत पुढे पुढे जाऊया.
कोलंबोच्या बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे सुमारे चार वाजता आमचे विमान उतरले. आप्रवास सोपस्कार आटपून बाहेर पडलो. थोडेफार शोधल्यावर आमचा मार्गदर्शक-कम-ड्रायव्हर हातात नावाची पाटी घेऊन उभा दिसला. नमस्कार-चमत्कार होऊन गाडी औकानाच्या दिशेने धावू लागली आणि “चला, गडबडीने ठरवलेल्या सहलीला सुरुवात झाली”, असे जाणवून मन प्रफुल्लित झाले.
मार्गदर्शकाने वाटेत एका निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाजवळ गाडी थांबवली आणि न्याहारी करून घ्या असे सांगितले. भल्या सकाळी त्या विश्रामगृहाचे मीच पहिले गिर्हाईक होतो असे दिसले. पण जागा एकदम मस्त होती… वस्तीबाहेर, एका मोठ्या निरव तळ्याकाठी, एक जुन्या शैलीतली इमारत आणि आजूबाजूच्या भरगच्च झाडीने भरलेल्या प्रशस्त परिसरात काही झावळ्यांनी शाकारलेल्या बसायच्या जागा. तळ्यापलीकडच्या एका टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या भल्या मोठ्या बुद्धमूर्तीने त्या सकाळच्या धूसर शांत वातावरणाला धीरगंभीर पावित्र्याने भारून टाकले होते. श्रीलंकेच्या या पहिल्या दर्शनाने मन जिंकून घेतले.
सहलीचा मूड एकदम जमून आला. मी झाडीमधल्या एका शाकारलेल्या जागेची निवड करून निसर्गसौंदर्य न्याहाळत न्याहारीचा समाचार घेतला. श्रीलंकेचा विशेष म्हणजे, तो विषववृत्तीय प्रदेश असल्याने, तेथे विविध प्रकारच्या फळांची रेलेचेल असते, मग ती न्याहारी असो की दुपार – संध्याकाळचे जेवण. गाडीचा टँक अगोदरच फुल्ल होता, पोटाचा टँकही फुल्ल करून दिवसभराच्या धावपळीला गाडी आणि आमचे पाय तयार झाले !
वेगाने चाललेल्या गाडीतून एक मिनी-राजवाडा दिसेल अशा इमारतीसमोरून जाताना आकर्षक जरीकाम आणि भरतकाम केलेले पोषाख घातलेले लोक दिसले. मार्गदर्शकाला पुढे गेलेली गाडी मागे घ्यायला भाग पाडल्याशिवाय राहवले नाही ! खाली उतरून चौकशी केली तर कळले की त्या घरात लग्नसमारंभ चालू होता. त्यानिमित्ताने घरातल्या लोकांनी पारंपरिक उच्चभ्रू पोषाख घातलेले होते. प्रवेशव्दारापाशी त्यापैकी काही सिंहली मावळ्यांचा खास फोटो-सेशन चालला होता ! या अचानक समोर आलेल्या संधीचा फायदा घेऊन, त्यांची परवानगी घेऊन, मीही माझ्या कॅमेर्याची हौस पुरी करून घेतली…
प्रवासात अनपेक्षितपणे असे काही अनवट घडले की त्याची मजा अजूनच वाढते ! आज तर पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेची खास ओळख पुढे आल्याने पहिले आकर्षण डोळ्यापुढे येण्याअगोदरच सहलीचा उत्साह व्दिगुणित झाला ! गाडी हिरव्यागार झाडीतून पळू लागली… या बेटाला पाचूचे बेट का म्हणतात याची प्रचिती पुढचे सहा दिवस येणार होती !
श्रीलंकेतले रस्ते जरी अरुंद, म्हणजे जायला एक व यायला एक अशा दोनच लेनचे, असले तरी त्यांची देखभाल चांगल्या रितीने केली जाते आहे असेच दिसले. संपूर्ण देशभर रस्त्यांवर खड्डे अजिबात दिसले नाहीत. तसेच कोलंबो शहर सोडून इतर कोठेही वाहनांची फार गर्दी अथवा वाहतुकीची कोंडी नव्हती. त्यामुळे एकंदरीत सर्व प्रवास वेगाने व सुखकारक झाला.
डोळ्यांना थंडाई देणार्या हिरव्यागार महिरपीतून प्रवास चालू असताना आता औकानातली श्रीलंकेतली सर्वात उंच असलेली बुद्धमूर्ती पाहण्याचे वेध लागले होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.