March 5, 2024
Introduction of Bhilli Culture review of Jija Soanwane book
Home » भिल्ली संस्कृतीचा परिचय
संशोधन आणि तंत्रज्ञान

भिल्ली संस्कृतीचा परिचय

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ. जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही. त्यामुळे भिल्ली साहित्य लिखित नाही, मौखिक आहे. अवघड शब्दसंपदा, भाषा, लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार यामुळे भिल्ल संस्कृती कशी निराळी आहे हे या ग्रंथात आहे.

डॉ शशिकांत लोखंडे

अनागर संस्कृतीतील रूढी परंपरा, लोक समजुती, विश्वास, विधिकर्म व त्या अनुषंगाने येणाऱ्या मौखिक कथा, गीतरचना, नृत्ये यांचा निर्देश डब्ल्यू जे. थॉमस यांनी सन १८४६ साली ‘फोक-लोअर’ असा केला आहे. लोकसाहित्याला लोकविद्या, लोकायन, लोकवार्ता, लोकवाङ्मय असेही म्हटले आहे. लोक’ ही संकल्पना नागरी संस्कृतीपासून दूर असलेल्या ग्रामीण लोकांसाठी वापरलेली आहे. अनामिकता म्हणजे लोक. बौद्धिकपंडिती संस्कृतीपासून अलिप्त असलेल्या, आधुनिकतेपासून अलिप्त असलेल्या अनागर संस्कृतीतील लोकांचे आविष्कारविशेष म्हणजे लोकसाहित्य लोक साहित्य ही लोक संस्कृतीच असते.

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही. त्यामुळे भिल्ली साहित्य लिखित नाही, मौखिक आहे. अवघड शब्दसंपदा, भाषा, लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार यामुळे भिल्ल संस्कृती कशी निराळी आहे हे या ग्रंथात आहे. भिल्लांचे निसर्ग, यंत्रतंत्र, जादुटोणा, प्राणी, जमीन, वातावरण यासंबंधीचे ज्ञान त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे, असे डॉ. सोनवणे लिहितात.

या शोधग्रंथाला प्रारंभी प्रस्तावना व अंती समारोप वा निष्कर्ष नसला तरीही त्याची ७ प्रकरणे वर्णनांनी व तपशिलाने भरगच्च आहेत. ‘मालेगाव तालुक्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी’ पहिल्याच प्रकरणात सांगून लेखिकेने लोकसाहित्याची संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करताना मालेगाव तालुक्यातील भिल्लमानस, भिल्ल स्त्री मानसिकता, भिल्ल संस्कृती, निसर्गशरणता, नृत्यप्रधान संस्कृती, लोकसाहित्य निर्मिती या दिशेने शोध घेऊन भिल्ल लोकसाहित्याचे ठळक विशेष प्रकरण – २ मध्ये उद्धृतं केलेले आहे.

भिल्ली लोकगीतांचा लोकतत्त्वीय अभ्यास प्रकरणात लेखिका लोकगीताबद्दलची मते’ सांगून भिल्ली लोकगीते. गीतांतील लोकसंस्कृती, लोकगीतांचे स्वरूप, त्यामागील प्रेरणास्रोत, त्यातील क्रिया संबंधता – मंत्रात्मकता, लोकगीतांतील गेयता, संगीत आणि गीतांची बोलीभाषा, लोक नाते व त्यांचे वर्गीकरण यासंबंधी माहिती दिली आहे. भिल्ली गीतांची विविधता अतिशय लक्षणीय आहे. त्यातील विषयांची माहिती देताना लेखिकेने त्या त्या गीतप्रकारांमागील लोकतत्त्वे, लोकधारणा, उपासना, पूजाविधी, आदिमाता, लोकवाद्ये, व्यवसाय यासंबंधींचा तपशील अचूकपणे दिलेला आहे.

भिल्ली लोककथांचा लोकतत्त्वीय अभ्यास करताना त्या लोककथांमागील लोकतत्त्वे आणि सांस्कृतिक वैभव कसे आहे हे सांगितले आहे. भिल्ली बोली : एक लोकभाषा’ प्रकरणात या बोलीमागील व्याकरणिक तत्त्वे शब्दांच्या जाती, नामविचार, सर्वनामे व विशेषणे, पदान्वय विचार, शब्दासिंधीबाबत येथे निरीक्षण – परीक्षण, अवलोकन, निष्कर्ष सहकार्य – सामंजस्य आदी शास्त्रीय प्रक्रियांचा विचार न केल्यामुळे भिल्ली भाषेचे अंतरंग व बहिरंग लेखिकेने दाखविलेले नाही.

भिलावू’ ही स्थानपरत्वे कशी बदलत जाते याचेही येथे निर्देशन नाही. भिलावू आणि अहिराणीचा सगोत्र संबंधही तत्त्वदृष्ट्या उलगडलेला नाही. तरीही भिल्ली आदिवासींचे लोकभ्रम अणि लोक वैद्यक’ प्रकरण वाचनीय झाले आहे. ‘भिल्ली लोकसाहित्यातील वाङमयीन विशेष’ सांगताना लेखिकेने लोकगीते व लोककथा यांचाच आधार घेतला आहे. पण या वाङ्मयातील वा बोलीतील म्हणी. वाक्यप्रचार, उखाणा यांचा विशेष अभ्यास येथे सादर होणे योग्य ठरले असते.

एकलव्य, शबरी ते सुभान्या नाईक, तंट्या भिल्ल आणि निषाद वेशातील शंकर-पार्वती इथपर्यंतच्या माणसांचा वेध या अभ्यासाला उठाव देणारा आहे. भिल्ली जमातीचा वेध घेण्यासाठी हा ग्रंथ काही प्रमाणात सहाय्यभूत ठरणारा आहे, हे विशेष होय.

पुस्तकाचे नाव – भिल्ली लोकसाहित्य
लेखक : डॉ. जीजा सोनवणे
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ४०८, मूल्य : रुपये ४१०

Related posts

लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी…

खंड्याला जीवदान…(व्हिडिओ)

वेळाचा सदुपयोग हेच यशामागचे रहस्य

Leave a Comment