April 20, 2024
Rajan Konavdekar Poem Aai
Home » आई…
कविता

आई…

आई…

तिचे असणे कळले नव्हते
नसणे मला छळत आहे |
आई काय असते हे
आज मला कळत आहे ||
फाटलेलं आभाळ कसं
वेड्यासारखं गळत आहे ||

अस्तित्वात नसली तरी
अवती भवती वास तिचा |
मागे पुढे इकडे तिकडे
पावलोपावली भास तिचा ||
अजूनही देव घरात..
समई सोबत जळत आहे
आई काय असते हे
आज मला कळत आहे ||

रीते नसिब कोरडे भाळ
वैशाखातलं वर आभाळ |
अनवाणी या पायाखाली
फुफाट्याचा भुंडा माळ |
कितीही मागे धावत सुटलो
क्षितिज दूर पळत आहे
आई काय असते हे
आज मला कळत आहे ||

माझं हसणं विश्व तिचं
माझं दुःख तिचं रडणं |
माझ्यासाठी आयुष्याचा
कण क्षण खर्ची पडणं |
बाजार उलगून गेल्यावर
हिशेब आता जुळत आहे
आई काय असते हे
आज मला कळत आहे
फाटलेलं आभाळ कसं
वेड्यासारखं गळत आहे ||

कवी – राजन कोनवडेकर

Related posts

बँकांच्या दिवाळखोरीतून धडा शिकण्याची गरज !

शेत जमीन मोजणी करायची आहे, मग हे वाचा…

पित्त देहात व्यापू नये यासाठी…

Leave a Comment