जागतिक पातळीवर सुरू असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा अफाट वापर व त्यामुळे निर्माण होत असलेले धोके व गंभीर संकट याची अजूनही सर्वांना स्पष्ट जाणीव झालेली नाही किंवा काहीही कल्पना आलेली नाही. इस्रायलमध्ये गेली अनेक वर्षे होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरापोटी त्यांचा घात झाला असल्याची दाट शक्यता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे. या अति गंभीर शक्यतेचा घेतलेला हा वेध.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत
गेल्या काही वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) होत असलेला वापर आणि त्याची वेगाने होणारी प्रगती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे. केवळ सर्वसामान्य जनतेच्या पातळीवरच नाही तर जगभरातील व्यवसाय, व्यापार, विविध देशांची सरकारे या सर्व ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेने घातलेला धुमाकूळ पाहायला मिळत आहे. भारत सरकारनेही अलीकडेच याबाबतचा एक सर्वंकष अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेने देशात निर्माण केलेल्या संधीचा उहापोह केला आहे. भारतासह जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनेक धुरिणांना या धोक्याची पूर्ण कल्पना असून माणसाच्या कौशल्य क्षमतेच्या पटलावर अत्यंत मूलभूत स्वरूपाचे बदल या कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेले आहेत. त्यामुळे निर्माण होत असलेल्या धोक्याची जाणीवही त्यातील अनेकांना आहे.
भारतासह जगभर या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या “डिजिटल” स्फोटाची कल्पना फारशी आलेली नाही. भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख श्री एम के नारायणन यांचा या क्षेत्रातील सखोल अभ्यास असून त्यांनी एका लेखाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा धोका जगासमोर उभा ठाकला असून त्याची आत्ताच सुरुवात झाल्याचे नमूद केले आहे.
इस्रायल व हमास यांच्यातील युद्धाची ठिणगी पडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा एखाद्याला हवा असेल त्याप्रमाणे स्वतःच्या ताब्यात किंवा कह्यात घेऊन त्याचा वापर चलाखीने केला जाऊ शकतो. हेच नेमके इस्रायलच्या बाबतीत घडले असण्याची दाट शक्यता आहे. आत्ताची युद्धाची ठिणगी हमास व इस्रायल यांच्यात पडली आहे त्याची तुलना पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या इस्राइल विरुद्ध इजिप्त – सिरिया यांच्यातील युद्धाशी केली जात आहे. त्या युद्धाला ” योम किप्पुर युद्ध किंवा “रमजान युद्ध” असे म्हणले जात होते. या युद्धाच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच गाझा पट्टयातील हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यामुळे केल्यामुळे या दोन युद्धांची तुलना तशी केली जात आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धामुळे मध्य आशियातील भूराजकीय समीकरणे कायमची बदलली. त्याचीच पुनरावृत्ती या नवीन युद्धामुळे होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
योम किप्पुर युद्धाप्रमाणेच यावेळीही इस्रायलची सुरक्षा यंत्रणा कोणत्याही परकीय हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज नव्हती असे दिसुन आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशाची ‘मोसाद ‘ गुप्तचर यंत्रणा ही जगातील सर्वोच्च यंत्रणा समजली जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले क्षेपणास्त्र विरोधी जाळे ज्याला “आयर्न डोम ” असे संबोधले जाते ती यंत्रणाही अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ञांच्या मते इस्रायल मध्ये गेली अनेक वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिवापर ( ओव्हर इंडलजन्स ) केला जात आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा भेद अत्यंत कौशल्याने हमासच्या समर्थकांनी केला आहे. तसे पाहायला गेले तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने प्रामुख्याने डेटा म्हणजे माहिती विदा व त्यावरून काही निष्कर्ष काढण्यासाठी वापरले जाणारे ‘अल्गोरिथम’ यांना हमासने बरोबर भेदले आहे.
हमासने अशा काही पळवाटा किंवा क्ल्युप्त्या शोधून काढल्या की ज्यामुळे इस्रायलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेमध्ये माहितीचा साठा जमा होत असताना त्याची खरी कल्पना इस्रायलच्या उच्च लष्करी यंत्रणेला येऊन दिली नाही. एक प्रकारे हमासने इस्त्रायलच्या उच्च पदस्थांची बुद्धिमत्ता आंधळ्या बाजू सारखी करून टाकली. एक प्रकारे इस्रायल सारखा देश या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अति आहारी गेल्यामुळे किंवा त्याच्यावर संपूर्णपणे अवलंबून राहिल्यामुळे राहिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली व हमासनी केलेल्या हल्ल्यांना थोपवता आले नाही. ही स्थिती म्हणजे घोडा उधळून गेल्यानंतर तबेल्याच्या दरवाज्यांना कुलूप घालण्यासारखी झाले असल्याचे मतही श्री एम. के. नारायणन यांनी व्यक्त केले आहे.
आजच्या घडीला ज्या प्रमाणात आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत आहोत. त्यामुळे निर्माण होत असलेल्या धोक्यांची आपल्याला केवळ हिमनगा इतकीच कल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रांगणात आता “सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा ” ( आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स – एजीआय) शिरकाव झालेला आहे. यामुळे माणसाच्या निर्णय घेण्याची तसेच नवनिर्माण किंवा सर्जनशीलतेची क्षमता, अंतर्ज्ञानाची क्षमता यावरच मात केली जात आहे. यामुळे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील घडामोडी प्रत्यक्षात अस्तित्वात येत असून त्याची आपल्यालाच कल्पनाच येताना दिसत नाही.
जगभरामध्ये अनेक राष्ट्रे, भूभाग अस्तित्वात आहेत. यामध्ये भिन्न प्रकारचे समुदाय आहेत. या सर्वांमध्ये निर्माण झालेली नैसर्गिक मानवतेची एक घट्ट वीण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे नष्ट होत आहे किंवा उसवली जात आहे. हा एक मोठा गंभीर धोका आपल्यासमोर उभा ठाकला आहे. यामुळे जगातील सामाजिक आणि आर्थिक असमानता प्रमाणाच्या बाहेर वाढत असून पुढील काळात रस्त्यारस्त्यांवर सामाजिक हिंसाचाराचे राज्य प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. याचे प्रत्यंतर आपल्याला ज्या देशात तंत्रज्ञानाचा विकास, प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आहे तेथे दिसून येत आहे. बनावट किंवा खोट्या माहितीच्या रेट्यामुळे जनसामान्यांची विचार करण्याची प्रवृत्तीच बदलली जात आहे. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याची किंवा जे बोलले जाते; वाचले जाते किंवा ऐकले जाते तेच खरे मानण्याची प्रवृत्ती किंवा दृढ विश्वासालाच तडे जाताना दिसत आहेत.
या ‘ए जी आय’ मुळे माणूस ज्या क्षेत्रात काम करताना दिसत आहे त्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मूल्यवर्धित कामावरच मात केली जात असून त्यामुळे अनियंत्रित किंवा अतर्क्य निर्णय घेतले जाऊन आपल्याला अभिप्रेत नसलेल्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. वाढती बेरोजगारी व आर्थिक असमानता ही त्याची अलीकडच्या काळातील जाणवणारी लक्षणे आहेत व यातून आपण वेळीच धडा घेतला नाही आणि केवळ तंत्रज्ञानाच्या मागे आंधळेपणाने धावत राहिलो तर आज इस्रायलमध्ये जे काही घडत आहे याची पुनरावृत्ती जगभरातील देशांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच या डिजिटल अनिश्चितता किंवा अस्थिरतेचा स्फोट होण्यापूर्वी आपण जागरूकतेने त्याचा वापर करणे हे आपल्या हातात आहे असे मतही श्री नारायणन यांनी त्यांच्या लेखांमध्ये व्यक्त केलेले आहे. या धोक्याच्या इशाऱ्याची आपण नोंद करून घेऊन त्याप्रमाणे पुढील पाऊले टाकणे आपल्या हातात आहे हे निश्चित.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.