December 7, 2023
technique-of Radish cultivation
Home » मुळा लागवड तंत्र
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुळा लागवड तंत्र

🥕 मुळा लागवड तंत्र 🥕

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. परंतु उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणाऱ्या मुळ्यांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळ्याचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते.

मुळ्याचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा हिरवापाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा किसून किंवा पातळ चकत्‍या करून त्‍यावर मीठ टाकून लिंबू पिळून खाल्‍यामुळे भूक वाढते. तसेच पचनशक्‍तीही वाढते. मुळ्यामध्‍ये असणाऱ्या सारक गुणधर्मामुळे बध्‍दकोष्‍ठता असणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी मुळा अतिशय उपयुक्‍त आहे. मुळा कच्चा खातात किंवा त्‍याची शिजवून भाजी करतात. मुळ्याच्‍या हिरव्‍या पाल्‍याची आणि शेंगाची (डिंगऱ्याची ) भाजी करतात. मुळ्याची कोशिंबीर करतात. मुळ्याच्‍या हिरव्‍या पानांमध्‍ये अ आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. मुळ्यामध्‍ये चुना फॉस्‍फरस, पोटॅशियम ही खनिजे आणि काही प्रमाणात अ व क जीवनसत्‍वे असतात.

हवामान आणि जमीन

मुळा हेक्‍टरी प्रामुख्‍याने थंड हवामानातील पीक आहे. मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते. परंतु चांगला स्‍वाद आणि कमी तिखटपणा येण्‍यासाठी मुळ्याच्‍या वाढीच्‍या काळात 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असावे. मुळ्याच्‍या वाढीच्‍या काळात तापमान जास्‍त झाल्‍यास मुळा लवकर जून होतो आणि त्‍याचा तिखटपणाही वाढतो. मुळयाची जमिनीतील वाढ चांगली होण्‍यासाठी निवडलेली जमीन भुसभूशीत असावी. भारी जमीनीची चांगली मशागत करावी. अन्‍यथा मुळ्याचा आकार वेडावाकडा होतो आणि त्‍यावर असंख्‍य तंतूमूळे येतात. अशा मुळ्याला बाजारात मागणी नसते. मुळ्यांची लागवड अनेक प्रकारच्‍या जमिनीत करता येत असली तरी मध्‍यम ते खोल भूसभूशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो. चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये.

सुधारीत जाती

पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्‍हाईट, गणेश सिंथेटीक या मुळाच्‍या आशियाई किंवा उष्‍ण समशितोष्‍ण हवामानात वाढणाऱ्या मुळाच्‍या जाती आहेत.

हंगाम आणि लागवडीचे अंतर

महाराष्‍ट्रात मुळ्याची लागवड वर्षभर करता येते. परंतु मुळयाची व्‍यापारी लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. रब्‍बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत बियांची पेरणी करावी. उन्‍हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिलमध्ये तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्‍टमध्मे बियांची पेरणी करावी. मुळ्याची लागवड करतांना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सेमी आणि 2 रोपांमधील अंतर 8 ते 10 सेमी ठेवावे.

लागवड

मुळयाची लागवड सपाट वाफयात किंवा सरी वरंब्‍यावर केली जाते. दोन वरंब्‍यामधील अंतर मुळयांच्‍या जातीवर अवलंबून असते. युरोपीय जातीसाठी हेक्‍टरी अंतर 30 सेमी ठेवतात. तर आशियाई जातीकरिता 45 सेमी इतर ठेवतात. वरंब्‍यावर 8 सेमी अंतरावर 2-3 बिया टोकून पेरणी करतात. सपाट वाफयात 15 बाय 15 सेमी अंतरावर लागवड करतात. बियांची पेरणी 2-3 सेमी खोलीवर करावी. पेरणी पूर्वी जमिनीत ओलावा असावा. मुळा लागवड अंतर हेक्‍टरी मुळयाची जात. त्‍याची वाढ आणि हंगामावर अवलंबून असते. तथापि कमी अंतरावर लागवड केल्‍यास मध्‍महिन्‍यातम आकाराचे मुळे मिळून उत्‍पादन जास्‍त मिळते. मुळयाच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी 10 ते 12 किलो बियाणे लागते.

खते आणि पाणी व्‍यवस्थापन

मुळयाचे पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्‍यामुळे जास्‍त उत्‍पादन मिळण्‍यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करतांना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्‍टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळयाच्‍या पिकाला दर हेक्‍टरी 30 किलो नत्र 20 किलो स्‍फूरद आणि 80 किलो पालाश द्यावे. स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धीमात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उरलेली अर्धीमात्रा ही बी उगवून आल्‍यावर म्‍हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी.
मुळयाच्‍या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे आवश्‍यक आहे. कोरडया जमिनीत मुळयाची पेरणी करू नये. बियांची पेरणी केल्‍यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. मुळयाच्‍या पिकाला हिवाळयात 8 ते 10 दिवसाच्‍या अंतराने आणि उन्‍हाळी हंगामात 4 ते 5 दिवसाच्‍या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत

मुळयाची लागवड कमी अंतरावर करतात म्‍हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्‍यक आहे. पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्‍यामुळे सुरूवातीच्‍या काळात पिकात खुरप्‍याच्‍या साहायाने निंदणी वेळेवर करून पिक तण रहित करावे. साधारणपणे दोन निंदण्‍या कराव्‍यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरूवातीच्‍या काळात करावी. मुळे लांब वाढणा-या जातींना आवश्‍यकतेप्रमाणे भर द्यावी.

किड, रोग आणि त्‍यांचे नियंत्रण

काळी अळी ( मस्‍टर्ड सॉफ्लाय) – मुळयावरील ही एक प्रमुख कीड आहे. लागवड झाल्‍यावर आणि मुळयाची उगवण झाल्‍यावर सुरूवातीच्‍या काळात हया काळया अळीचा उपद्रव मोठया प्रमाणात होतो. हया अळया पाने खातात आणि त्‍यामुळे पानांवर छिद्रे दिसतात.

मावा – या कीडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्‍त प्रमाणात होतो. हया किडीची पिल्‍ले तसेच प्रौढ किडे पानांतील अन्‍नरस शोषून घेतात. त्‍यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होते. पिवळे पडून रोप मरते.

करपा – मुळयाच्‍या पिकावर करपा रोग मोठया प्रमाणावर आढळतो. हया बुरशीजन्‍य रोगांच्‍या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळे फूगीर डाग अथवा चटटे पडतात. नंतर खोडावर आणि शेंगावर पिवळे डाग पडतात. पावसाळी हंगामात रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात होतो.

काढणी उत्‍पादन आणि विक्री

मुळयाची लागवड केल्‍यानंतर जातीनुसार 40 ते 55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. मुळे नाजूक आणि कोवळे असतानाच मुळयांची काढणी करावी. मुळा जास्‍त दिवस जमिनीत राहिल्‍यास कडसर, ति‍खट आणि जरड होतो, मुळयाला गाभा रवाळ होऊन भेगा पडतात.
मुळे काढण्‍यापूर्वी शेतीला पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावेत. नंतर त्‍यावरील माती काढून मुळे पाण्‍याने स्‍वच्‍छ धुवून घ्‍यावेत. किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत. मुळे पाल्‍यासह काढून विक्रीसाठी पाठवितात.
पाने आणि मुळै यांना इजा होवू नये म्‍हणून टोपलीत किंवा खोक्‍यात व्‍यवस्‍थि‍त रचून विक्रीसाठी पाठवावीत. मुळयाचे उत्‍पादन हे मुळयाची जात आणि लागवडीचा हंगाम हयांवर अवलंबून असते. साधारणपणे रब्‍बी हंगामात मुळयाचे दर हेक्‍टरी 10 ते 20 टन उत्‍पादन मिळते.

📚 स्रोत- कृषी विभाग महाराष्ट्र शासन

📚 संकलन- कृषिसमर्पण समूह

Related posts

अबोला

आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!

हरभरा लागवड तंत्र

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More