पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें ।
म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ।।221 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून, पाऊस पाडणारे नाना याग वैगरे अनेक यज्ञ करावेत.
निसर्गाच्या नियमाने पाऊस पडतो. कृत्रिमरीत्याही पाऊस पाडला जात आहे. यावर पुरातन काळापासून प्रयोग होत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याचा प्रयत्न होतो. आता तर तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे, की पाऊस थांबवताही येतो. चीनमध्ये हा प्रयोग करण्यात आला. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत पाऊस पडण्याची लक्षणे दिसल्यानंतर तेथील ढग फवारणीकरून नष्ट करण्यात आले. इतके तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पण ही माणसाची निसर्गाशी स्पर्धा आहे.
पूर्वीच्याकाळीही विविध यज्ञ करून असे प्रयोग केले जात होते. दुष्काळी परिस्थितीत शेतीचे मोठे नुकसान होते. शेतात लावलेली पिके कधी वाया जातात. तर पाऊस न पडल्याने जमीन पडीक ठेवण्याची वेळ येते. उत्पादनच झाले नाही तर शेतकरी जगणार कसा? पाऊस न पडल्याने जनावरांना चाराही मिळणार नाही. पाणी, चाऱ्याविना जनावरेही जगणार कशी? अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याचे प्रयत्न झाले. हे योग्यच आहे. हा दुष्काळ अधूनमधून पडतोच आहे. 2009 मध्ये केवळ 78 टक्के तर 2012 मध्ये 93 टक्के पाऊस पडला. 1971 लाही भीषण दुष्काळ पडला होता. पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवते. ही परिस्थिती आता नित्याची होताना दिसत आहे. दर दोन तीन वर्षांच्या अंतराने ही परिस्थिती आता येत आहे. याला वाढते शहरीकरण, वाढती औद्योगिकता, घटणारे जंगलांचे प्रमाण आदी कारणे आहेत. सर्व जगभरातच ही परिस्थिती आहे, त्यामुळे पृथ्वीच्या तापमानातही वाढ होत आहे.
पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नुसता प्रचाराचा मुद्दा झाला आहे. सामाजिक संघटना हजारो झाडे लावल्याचा दावा करतात. दरवर्षी उद्घाटनाचे कार्यक्रम होतात. केवळ प्रसिद्धीसाठी ही पर्यावरण जागृती केली जाते. प्रत्यक्षात लावलेली झाडे जगतात का हेसुद्धा पाहिले जात नाही. हजारो झाडे लावली, मग झाडे कमी कशी झाली? याचा विचार कोण करत नाही. वनक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. दरवर्षी हजारो झाडे लावली, मग वने कमी कशी झाली. खाणींच्या उत्खननांना परवानगी देताना त्यांनी किती जंगले उभारली? कोठे उभारली? कशी उभारली याचा विचार केला जातो का? तसे होत नसेल तर मग खाणींसाठी जंगले नष्ट होणारच.
पर्यावरणसंवर्धनासाठी नुसती झाडे लावण्याचा प्रचार करून काय उपयोग? झाडे कोणती लावली जातात याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. अनेक वृक्षांच्या जाती दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. वृक्षामुळे तयार होणारी जैवविविधताही जोपासणे गरजेचे आहे. वनांचे संवर्धन झाले तरच पर्जन्याचे प्रमाण राखता येईल. अति पाऊस का पडतो ? दुष्काळ का पडतो? याचा विचार झाला नाही तर अति पावसाचा अन् दुष्काळाचा सामना कसा करता येईल बरे. पूर्वी उन्हाळ्यात 35 ते 38 अंशापर्यंत असणारे तापमान आता 40 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या शहरीकरणावर यासाठीच उपाय योजायला हवेत. सिमेंटची जंगले उभारताना वनराई तिथे कशी उभी करता येईल याचा विचार करायला हवा.
नैसर्गिक टेकड्यातर आता शहरात दिसेनाशा झाल्या आहेत. टेकडी नष्ट करून तेथे सपाटीकरण करून सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. पूर्वी या टेकड्यांमुळे वाहणारा वारा तटत होता. या टेकड्यांमुळे वाऱ्याचा वेग कमी केला जात होता. या टेकडीवर असणाऱ्या थंड वातावरणामुळे या परिसरात पावसाचे प्रमाणही अधिक होते. आता वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण टेकडीसारखे कार्य त्यांच्याकडून होत नाही. जरी पाऊस पडला तरी पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. कारण तेथे जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच नाही. यामुळे पुरस्थितीसारखी परिस्थिती वारंवार निर्माण होते. भूजलपातळीही यामुळे खालावली आहे.
अशा अनेक कारणांमुळेच तापमान वाढत आहे. कोकणात तर फारच भयाण परिस्थिती आहे. खाणींच्या उत्खननामुळे परिसरातील पाणी पिण्यायोग्यही राहिलेले नाही. दरवर्षी सरासरी इतका पाऊस पडूनही येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवतेच. पाण्याच्या प्रदूषणाने येथे रोगराई पसरत आहे. याला जबाबदार कोण? मानवच याला जबाबदार आहे. माणसाची हावच याला कारणीभूत आहे. अवृष्टीला जबाबदार मानवच आहे. मानवाने यासाठी आता वेळीच जागे व्हायला हवे. अवृष्टीची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 35 टक्के वनक्षेत्र उभे राहिले तरच पावसाचे प्रमाण टिकून राहील. वन टिकवायचे असेल तर तसे कायदे करावे लागतील. केवळ कायदे करून चालणार नाही, तर वनांचे संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवे.
वनराईची जैवविविधताही जोपासण्याचा प्रयत्न व्हायला हवा. दुर्मिळ होऊ लागलेल्या वनौषधींची लागवडही होणे गरजेचे आहे. रसायनांच्या फवारण्याकरून कृत्रिम पाऊस पाडता येईल. पण तो एकदा-दोनदा पाडता येणे शक्य होईल. असा पाऊस पाडण्यासाठी करोडोंचा खर्च करावा लागणार आहे. पाऊस पाडण्यासाठी इतका खर्च करण्याऐवजी आत्तापासूनच जंगलांच्या संवर्धनावर हा खर्च झाला तर ही वेळ येणार नाही. पर्जन्ययाग करून कमी खर्चात पाऊस पाडणेही शक्य आहे. पण नेहमीच असे यज्ञ करणे शक्य नाही. पाऊस पाडण्यासाठी वातावरणात तशी स्थितीही असणे आवश्यक असते. तरच हा पाऊस पडू शकतो. ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी तरी वनांची गरज भासणार आहे.
वने उभारण्याचाच संकल्प आता करायला हवा. वड, पिंपळ, शिसव, करंज असे मोठे मोठे वृक्ष लावून शाश्वत वृक्षांची जोपासना करायला हवी. पावसासाठी तोच खरा मोठा यज्ञ आहे. अवृष्टीने नेहमीच त्रस्त असणाऱ्या भागात आता वने उभारायला हवीत. दुष्काळग्रस्त भागात बाभळीची झाडे होती. आता ती दिसेनाशी झाली आहेत. पूर्वीचे काटेरी वृक्ष आता कमी होऊ लागले आहेत. ही नष्ट होत चाललेली वनसंपदा जोपासायला हवी. दुष्काळी भागात असे वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचे. पण बागायती शेतीमुळे बाभळी नष्ट झाल्या. पण आता पाऊसही घटल्याने बागायतीही नष्ट होऊ लागली आहे. चला आता एक वृक्ष नव्हे एक वनच उभारू. ते सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने उभारायला हवे. तरच अति पाऊस अन् दुष्काळी परिस्थिती यावर आपण मात करू शकू. नैसर्गिक संकटावर नैसर्गिक पद्धतीनेच मात करायला हवी. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन निसर्ग संवर्धन शक्य नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.