March 19, 2024
Dr V N Shinde article on Air Pollution
Home » आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून सेंद्रिय खते तयार करायला हवी. खतांमुळे जमिनीची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. आपणही ऊसतोड झाल्यानंतर पाचट जाळणे थांबवायला हवे, नाहीतर, दिल्लीतील परिस्थिती आपल्या गावात आणि भागात येऊ शकते.

डॉ. व्ही. एन. शिंदे

मानवाने प्रगती केली की अधोगती, हा नेहमी वादविवादाचा विषय राहिला आहे. आपले जीवन सुखकर बनवण्यासाठी हजारो वर्षांपासून मानवाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेतीची सुरुवात, भटके जीवन सोडून वस्ती करून राहणे, प्रत्यक्षात आल्यानंतर मानवाने गतीने प्रगती केली. सतराव्या शतकानंतर प्रगतीचा वेग आणखी वाढला. त्यातून आजचे तंत्रज्ञान आणि सुखासीन जीवन अस्तित्वात आले. आज कोणत्या राष्ट्रातील नागरिक किती ऊर्जा वापरतात, यावर त्या राष्ट्राचा प्रगती निर्देशांक ठरतो. ऊर्जा मिळवायची तर त्यासाठी इंधन वापरावे लागते. अजूनही अनेक राष्ट्रे अपारंपरिक ऊर्जा संसाधनांचा वापर करत नाहीत. ऊर्जा मिळवण्यासाठी इंधन जाळावे लागते. इंधन जाळल्यानंतर धूर, अज्वलनशील घटक आणि अर्धवट जळालेले अनेक प्रदूषके वातावरणात मिसळू लागली.

मानव जास्तीत जास्त ऊर्जा प्राप्त करण्यासाठी लाकूड, खनीज तेल, दगडी कोळसा, आणि शक्य असेल अशा इतर गोष्टींचे ज्वलन करू लागला. जास्त ऊर्जा मिळवण्याची शर्यत सुरू झाली. ऊर्जाप्राप्ती सर्व राष्ट्रांचे अंतिम साध्य बनले. आपले जीवन सुखकर बनवणे, याच एका गोष्टीचा ध्यास सुरुवातीपासून मानवाने घेतला. सुख म्हणजे कमी कष्ट, ही संकल्पना निश्चित झाली. तीच संकल्पना घेऊन मानव आजही वागतो. त्यातून दळणवळणासाठी वापरली जाणारी वाहने, त्यामुळे होणारे प्रदूषण असो किंवा शेतातील कचरा कमी करण्यासाठी त्यांचे ज्वलन असो. कमी कष्ट हेच उद्दिष्ट ठरले. परिणामी इंधनाचा वारेमाप सुरू झाला. कचरा नष्ट करण्यासाठी त्याला जाळणे हा कमी कष्टाचा मार्ग वापरात आला. भारतही याला अपवाद नाही. याचे परिणाम भारताच्या राजधानीत दरवर्षी दिसतात. दरवर्षी डिसेंबर महिना आला की एकच विचार मनात येतो यावर्षी दिल्लीचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ किती होणार? यावर्षीही सर्वोच्च न्यायालय या मुद्द्यावर लक्ष देणार का? दरवर्षी डिसेंबरमध्ये येणारी वेळ, यावर्षी दोन महिने अगोदरच आली.

दिल्लीचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ इतका खालावला आहे की, कोरोनाप्रमाणे लॉकडाउनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. लोकांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रकारची बांधकामे थांबवली आहेत. ज्याठिकाणी बांधकामे सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले, त्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला. कोळसा किंवा लाकूड जाळण्यास बंदी आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विद्युत संसाधनांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. फटाके वाजवण्यासही मनाई करण्यात आली आहे. मुलांच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय घातक पातळीवर पोहोचला आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक निश्चित करताना हवेतील प्रमुख प्रदूषकांचे प्रमाण विचारात घेण्यात येते. हवेतील कार्बन मोनोऑक्साईड, धुलीकण, भूस्तरांजवळचे ओझोनचे प्रमाण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचे प्रमाण मोजण्यात येते. हे सर्व घटक पर्यावरणातील मानवांसह सर्व सजिवांना घातक आहेत. हवेची गुणवत्ता सहा गटात विभागण्यात येते. हवेची गुणवत्ता, हवा व आरोग्याचा विचार करून ठरवण्यात येते. हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पर्यंत असल्यास हवेची गुणवत्ता चांगली मानली जाते. मानवी आरोग्याला या हवेमुळे कोणताही धोका नसतो. हा निर्देशांक ५१ ते १०० असेल्यास हवेचा दर्जा ठिक असतो. मात्र आजारी लोकांसाठी यातील काही घटकांचा त्रास होऊ शकतो. विशेषत: श्वसनाचा आजार असणाऱ्या लोकांना ओझोनचे प्रमाण वाढल्यास त्रास होतो. हा निर्देशांक १०० ते १५० पर्यंत असल्यास हवा संवेदनशील बनते. सर्वसामान्य आरोग्य असणाऱ्या लोकांना या हवेचा फारसा त्रास जाणवत नाही. मात्र ओझोनचे प्रमाण वाढल्यास मुले, प्रौढ आणि फुफ्फुसांचा आजार असणाऱ्या लोकांना मोठा त्रास जाणवतो. धुलीकणांचा हृदयरुग्णांना त्रास होतो. हवा गुणवत्ता निर्देशांक १५१ ते २०० असल्यास हवेचा दर्जा अस्वस्थ प्रकारचा मानला जातो. या हवेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच रूग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हवा गुणवत्ता निर्देशांक हा २०१ ते ३०० असेल तर अशी हवा अतिशय अस्वस्थ आणि आरोग्यास घातक मानली जाते. निरोगी लोकही आजारी पडतात. कष्ट करणाऱ्या ज्येष्ठांना आणि मुलांना याचा मोठा फटका बसतो. अशा हवेत बाह्य कष्ट करणे जोखमीचे ठरते. हवा गुणवत्ता निर्देशांक हा ३०० पेक्षा जास्त असणे धोकादायक मानले जाते. भारतातील अनेक शहरात हा ३०० पेक्षा जास्त् असतो. दिल्लीसारख्या शहरात तर तो ४५०च्यावर आहे. यामुळेच देशाच्या राजधानीच्या शहरात ही परिस्थिती उद्भवली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक जास्त असणे म्हणजे हवेची गुणवत्ता चांगली नसणे.

हवेची गुणवत्ता खालावण्यामागे वाहनांचा अमर्याद वापर हे प्रमुख कारण आहे. पन्नास टक्के हवा प्रदूषण वाहनांमुळे होते. वाहनांची काळजी न घेणे, गाड्यांचा वेग वाढवणे, इंधनातील भेसळ आणि इंधनाची गुणवत्ता अशी अनेक कारणे आहेत. दिल्लीच्या आजूबाजूच्या भागात गहू आणि इतर पिकांचा कचरा जाळण्यात येतो. दिल्लीतील हवा खराब आहे. आमचा काय संबंध. असे म्हणून चालत नाही. हवा वाऱ्याच्या दिशेने सतत जागा बदलत असते.

हवेची गुणवत्ता खालावण्यास जी कारणे आहेत त्यातील काही कारणे आपण टाळू शकतो. वाहनांचा वापर पूर्ण थांबवता येणे शक्य नसले तरी सार्वजनीक यंत्रणांचा प्रभावी वापर व्हायला हवा. कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून सेंद्रिय खते तयार करायला हवी. खतांमुळे जमिनीची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. आपणही ऊसतोड झाल्यानंतर पाचट जाळणे थांबवायला हवे, नाहीतर, दिल्लीतील परिस्थिती आपल्या गावात आणि भागात येऊ शकते.

Related posts

झाडीपट्टीतील प्रख्यात संस्कृत नाटककार – कवी भवभूती

घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !

Leave a Comment