जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या जलसाधनेला उजाळा देणारा जलसंधारण दिनविशेष…
– एकनाथ पवार , नागपूर
तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले जाते. आज जलसंवर्धनाचे महत्व ओळखून जर वाटचाल केली नाही, तर कदाचित पाण्यासाठी सुद्धा महायुद्ध पेटण्याचे दिवस दूर राहणार नाही. पाण्याच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी आज जलसंवर्धन होणे गरजेचे आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट आणि दूसरीकडे लाखो लिटर पाण्याचे अपव्यय असे चित्र आपल्याला दिसते. शिवाय दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल हे मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या अठरा टक्के आहे. आपल्याकडे जागतिक साठाच्या तुलनेत केवळ चार टक्के पाणी आहे. दिवसेंदिवस भूजलपातळीत घट होत आहे. त्यामुळे पाण्याबाबत संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. आज १० मे आपण जलसंधारण दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाचे गांभीर्य हे तितकेच महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आज ‘वाहते पाणी चालवायला शिका, चाललेले पाणी थांबवायला शिका आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका’, असे मोलाचे उपदेश देणारा आणि रक्तविहीन अमृतमय जलक्रांती घडवून आणणारा जलयोद्धा सुधाकरराव नाईक नजरेसमोर येतात.
आज जलसंधारण दिवस अर्थात जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस. हजरजबाबी , मितभाषी , आवाजात क्षात्रबाणा , तिक्ष्ण नजर , चिकीत्सकता, अंगात राजपूत शैलीचा बंद गळ्याचा कोट आणि निश्चयाचा महामेरू असा सुधाकररावांचा व्यक्तीमत्व. ‘सरपंच , पं.स. सभापती, जि.प.अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री ते राज्यपाल’ अशी क्रमवार पदावर विराजमान होणारे राजकारणातले ते एकमेव नायक ठरतात. प्रजेच्या कल्याणासाठी आपल्या दमदार निर्णयाने ते नेहमी चर्चेस राहिले. परंतु देशभरात त्यांची ‘जलनायक’ म्हणूनच खरी ओळख आहे. यामागील कारण म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारण आणि जलसाक्षरतेसाठी समर्पित केले.
पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मुलमंत्र त्यांनी आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत दिला. त्यांनी घडवून आणलेल्या ‘सुधा’समान जलक्रांतीचा हाच खरा मुलमंत्र होता. याच जलक्रांतीच्या ध्यासातून आपला महाराष्ट्र ‘सुजलाम् सुफलाम्’ म्हणून आकारास आला. दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी जलनायक सुधाकरराव नाईक यांनी रक्तविहीन जलक्रांती घडवून आणली. स्वतंत्र जलसंधारणाच्या कामांत गती देत राज्याला जलसमृद्ध केले. जलक्रांतीमधून शेतीला पाणी आणि पिण्याचे पाणी यांचे योग्य समतोल साधत जलसमृद्धीचा शाश्वत जलमार्ग साकारला. पाणलोट क्षेत्रात विकास हे नवे सूत्र नाईकांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे वसंत बंधारे व पाझर तलाव, नाला बल्डींग , वॉटर हार्वेस्टिंग , तलाव पुनरुज्जीवन, जलसिंचन निर्मितीस भरीव चालना मिळाली. पाटबंधारे मंत्री , ग्रामविकास ,कृषी, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम , पशू संवर्धन, शिक्षण अशा महत्वपूर्ण विभागाचे ते मंत्री राहिले होते. त्यात कमालीचे दूरदर्शी धोरणे त्यांनी राबवीली.
महाराष्ट्रात विनाअनुदानीत तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही ; ही बाब नाईकसाहेब जाणून होते म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचे ठरविले. महिला आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पाहता त्यांनी स्वतंत्र महिला व बालकल्याण या विभागाची तसेच महिला आयोगाची स्थापना केली. वृद्ध , वंचित आणि भूमिहीनांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. वंचित घटकांच्या विकासासाठी समाजकल्याण विभागाची निर्मिती, रामटेक येथे संस्कृत विद्यापीठाचा निर्णय , तर महानायक वसंतराव नाईक यांचे अमरावती विद्यापीठ स्थापनेचे राहिलेलेले अधुरे स्वप्न त्यांनी पुर्ण केले. अतिशय धडाडीने मुंबईतला अंडरवर्ल्ड संपुष्टात आणला. गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि साहसाचे दुसरे नाव म्हणजे सुधाकरराव नाईक असे त्याकाळी प्रचलित झाले होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक वसंतराव नाईक यांनी साकारलेल्या पंचायत राज व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
जलनायक सुधाकरराव नाईक यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द म्हणजे क्रिकेटच्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यासारखी वेगवान होती. हा वेग जनतेच्या हितासाठी राहिला. जातीधर्माचे , कुरघोडीचे संकुचित राजकारण करण्यापेक्षा त्यांनी लोकशाही सक्षमीकरणासाठी उदात्तेने समाजवादी धोरणाचा अंगीकार केला. जलसंधारणाला तात्विक आणि व्यवहार्य बैठक देत , दूरगामी स्वरुपाची धोरणे आखली; महत्वपूर्ण बाब म्हणजे जलसंधारणासाठी त्यांनी स्वतः परिश्रम घेतले. जलसंधारणाच्या चळवळाची सशक्त उभारणी केली, त्यामुळे जलनायक सुधाकरराव नाईक यांची संपूर्ण देशभरात प्रशंसा झाली. त्यांनी आखलेल्या शाश्वत जलनितीची सर्वदूर चर्चा झाली. जलसाक्षरतेला बळकटी मिळाली. जलसंधारणाच्या बाबतीत ते अतिशय आग्रही होते. जागतिक ख्यातीचे जलतज्ञ होते. त्यांची धोरणे अतिशय दूरदर्शी होते. भविष्याला पारखणारे होते, म्हणून जलक्रांती घडवून आणण्यात ते सफल झाले.
पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर झाली नाही, तर या महाराष्ट्राला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.” असे जलनायक सुधाकरराव नाईक आपल्या जल परिषदेत म्हणत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी जलसंधारण चळवळीला अबाधित ठेवले. रखरखत्या उन्हात सुद्धा त्यांनी जल परिषदाचा झंझावात कायम ठेवला. एखाद्या योद्धा प्रमाणेच ते भीषण दुष्काळ आणि पाण्याचे दूर्भिक्षषतेवर तुटून पडले. जलसंधारण चळवळीसाठी त्यांनी स्वतःला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही. आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. अखेरच्या शाश्वापर्यंत हा जलनायक जलसमृद्धीसाठी लढला. त्यांच्या जलसंधारणाच्या या क्रांतिकारी कार्याच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे जलसंधारण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाईक साहेबांच्या धोरणाला पुढे नेत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जलसंधारणाचे विविध उपक्रमही हाती घेतले. आजच्या जलयुक्त अभियानात जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या पाऊलखुणा पावलोपावली जाणवते. काळाची गरज लक्षात घेता आपल्या भावी पिढीसाठी जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाचा मुलमंत्र मनी बाळगून आपला शिवार जलयुक्त करुया. पाण्याचे प्रत्येक थेंबाचे बचत करण्याचा निर्धार करुया. शाश्वत जलसमृद्धीचा संकल्प करुया. आजच्या जलसंधारण दिनी जलक्रांतीच्या पाणीदार नायकास हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.