सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ला महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने…
प्रा. डॉ. नंदकुमार मोरे,
मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ
कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक
सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनचा ‘नरहर कुरुंदकर पुरस्कार’ जाहीर झाला. या पुस्तकापूर्वी त्यांचे ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ हे भाषेबद्दचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. याशिवाय त्यांचे इतर लेखन आहेच. विशेषत: त्यांनी अलीकडे एक मोठे काम केले आहे. ते म्हणजे, फ्रेंच प्रवासी बार्टलेमी ॲबे कॅरे यांच्या ‘पूर्वेकडील देशाचा प्रवास’ हे अतिशय महत्त्वाचे पुस्तक मराठीत आणले आहे. हे पुस्तक म्हणजे, महाराष्ट्राच्या मध्ययुगीन काळातील इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. एका धाडसी प्रवाशाचा चित्तथरारक प्रवास आहे. छत्रपती शिवरायांच्या तत्कालीन प्रतिमेचा आणि कार्यकर्तृत्वाचा शोध आहे. मराठी भाषेला असे मौलिक काही देत असलेल्या आमच्या ज्येष्ठ मित्रांना हा पुरस्कार मिळाल्याचं भयंकर समाधान आहे.
त्यांनी ‘कहाणी शब्दांची’मध्ये शब्दांच्या अनेक गमतीजमती सांगितल्या आहेत. शब्द ही भाषेतील खरी संपत्ती. मनातील भाव, विचार आणि कल्पना यथायोग्य पद्धतीने व्यक्त करण्याची भाषेची क्षमता शब्दांवर निर्भर करते. ती करण्यासाठी भाषा नैसर्गिकपणे शब्दांची आयात करीत असते. त्यासाठी ती कोणत्याही भाषा-बोलीला स्पृश्यास्पृश्य मानत नाही. त्यामुळे कोणत्याही भाषेचा शब्दसंग्रह तपासताना जगभरातील भाषा-बोलींमधील शब्दांचा भरणा दिसतो. १८२८ ला प्रथम प्रकाशित झालेल्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत सन १५७५ पूर्वीचे अवघे २१,८०० शब्द आहेत. आज या डिक्शनरीची शब्दसंख्या सहा लाखाहून अधिक आहे. ही डिक्शनरी खुल्या तोंडाची आहे. जगभरातील शब्दांना ती आपल्या पोटात वाट करून देते. त्या-त्या वर्षातील जगभरातील ठळक घटना-घडामोड या डिक्शनरीवरून शोधता येते. इतकी ती अद्ययावत होत असते.
२०२१ साली स्वीकारलेल्या ‘गॉब्लिन मोड’ हा शब्द आजच्या मानवी वृत्ती बद्दलचा, त्याच्या मुक्त जगण्याबद्दलचा अर्थ पकडतो. हा शब्द ‘तुम्हाला काय वाटायचे ते वाटो, मी असंच करणारेय.’ अशा अर्थाने आज वापरला जातो. कुणाचीही म्हणजे अगदी स्वत:चीही पर्वा न करता जगणाऱ्या आजच्या पिढीची वृत्ती तो टिपतो. डिक्शनरी अशी तयार होते. मराठीत त्या वर्षीचा शब्द पकडेल अशी डिक्शनरी तयार करण्याची प्रथा कोणा शब्दकोशाने सुरू केली तर यावर्षी कोणता शब्द असेल? असा एक प्रश्न शेवटी उपस्थित होतो. आता हे असे जिवंत काम कोण करेल मला माहिती नाही. परंतु, मला सदानंद कदम यांचे नाव आठवले. त्यांचे ‘कहाणी शब्दांची’ आठवले. त्यांनी मराठी भाषेत स्थिरावलेल्या शब्दांची सांगितलेली कहाणी आठवली. त्यांनी इंग्रजी डिक्शनरीप्रमाणेच मराठी भाषेमध्येही अशा पद्धतीने अनेक भाषांमधील शब्द स्थिरस्थावर झालेले आहेत, हे रंजकपणे सांगितले आहे. अशा शब्दांचे वर्णन एका अभ्यासकाने ‘घररिघे शब्द’ असे केलेले आहे. ते आपल्या घरात येऊन रुजलेलेच असतात. ते कधी त्यांच्या मूळ अर्थाने किंवा स्वत:च्या अर्थात थोडाफार बदल करून स्थिरावतात. आपली जागा निर्माण करतात. शब्दांना सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. याबरोबरच त्यांना स्वत:चा इतिहास आणि भूगोलही असतो. यादृष्टीने कदम यांनी घेतलेला शब्दांचा मागोवा अभ्यासनीय आहे.
त्यांचे पुरस्कार प्राप्त झालेले नवे पुस्तक याच पद्धतीचे आहे. ते वाक्प्रचारांची कहाणी सांगते. यातील अनेक वाक्प्रचार आज मराठी भाषेतून लुप्त होताहेत. झालेत. हे सर्व वाक्प्रचार त्यांना त्यांच्या व्यासंगात इथेतिथे भेटलेले आहेत. त्यांचे या लेखनातील सर्व संदर्भ त्यांचा इतिहासाचा, भाषेचा व्यासंग स्पष्ट करणारे आहेत. मराठी भाषेचे सौंदर्य, डौल, भारदस्तपणा या वाक्प्रचारांच्या वाचनातून समोर येतो. सदानंद कदम यांनी सांगितलेली वाक्प्रचारांची कहाणी फारच रंजक आणि उत्सुकता निर्मिण करणारी आहे. ती वाचकांना भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्वच दृष्टीने समृद्ध करणारी आहे.
‘कहाणी वाक्प्रचारांची’मधील अनेक वाक्प्रचार आज व्यवहारात वापरले जात नाहीत. त्यामुळे ते वाचताना मराठी भाषेने काय काय गमावले आहे हे ही लक्षात येते. एका वाक्प्रचाराचे विश्लेषण करताना कदम जे लिहितात ते एखाद्या ललित लेखासारखे खिळवून ठेवणारे आहे. मराठी भाषेवरील प्रेम वाढवणारे आहे. किती नवे शब्द कळतात, याची गणतीच नाही. हे वाचताना वाचक भाषिकदृष्ट्या समृद्ध होत जातो. वाचकाची भाषेची अंर्तबाह्य जाणीव वाढतेच, शिवाय तो अनेक अर्थाने समृद्धही होतो. एखाद्या अस्सल साहित्यकृतीतून मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन घडावे अगदी तसे त्याला या शब्दांतून होते. एक वाक्प्रचार म्हणजे एक कथा आहे. तिच्या अर्थाचा शोध म्हणजे लुप्त झालेला इतिहास आहे. तिचे नानाविध संदर्भ म्हणजे, समाजाची सामाजिक-सांस्कृतिक चिकित्सा आहे. मराठी मनाचा शोध आहे. मराठी जीवनाचा वेध आहे. ‘भाषा हेच जीवन’ आहे, हे मनावर बिंबवणारे पुस्तक आहे. एका एका वाक्प्रचाराचे सदानंद कदम यांनी केलेले विश्लेषण म्हणजे जीवनाचे आकलन आहे. ते वाचकाला विविध अंगाने समृद्ध करते.
‘कहाणी वाक्प्रचारांची’मध्ये मानवाच्या स्वभावाची वर्णने आहेत. त्याच्या वृत्तिप्रवृत्तीची नानाविध दर्शने आहेत. इतिहातील अनेक घटनाप्रसंग आहेत. स्वभावांची दर्शने आहेत. तर अनेक शब्दांची नव्याने ओळख आहे. काळावर भाष्य आहे. वर्तमानाचे संदर्भ आहेत. ऐतिहासिक बखरी, पत्रांचे असंख्य संदर्भ आहेत. मराठीतील विविध रचनांचा दाखला आहे. कदमांचा संदर्भ शोध मनस्वी आहे. रोचक आहे. तो त्यांचा व्यासंग दर्शवतोच. सोबत वाचकांना नव्या पुस्तकांकडे घेऊन जातो. अनेक लेखक, कवींची ओळख करून देतो. हे पुस्तक वाक्प्रचारांचे आहे. तरीही ते शब्दांमागून शब्दांची ओळख करून देत जाते. हे शब्द म्हणजेच मानवाचे दर्शन आहे. त्या अर्थाने हे पुस्तक मानवी जीवनाचे दर्शन देत जाते. ही पुस्तके वाचत असताना माझ्या भवतालात सदानंद कदम आहेत, याचा मला मनस्वी अभिमान वाटतोच. परंतु, मराठीचा शिक्षक म्हणूनही कदमांचे लेखन मला खूप शिकवून जाते. अंतर्मुख करते. भाषेच्या अथांग सागरात घेऊन जाते. या पुस्तकांमुळे मराठी माणसाची, त्याच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि मराठी मनाची ओळख होते.
पुस्तकाचे नाव – कहाणी वाक्प्रचारांची
लेखक – सदानंद कदम
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २५०
किंमत : २५०/-