विदर्भातील सातव्या स्मृतिगंध काव्य संमेलनामध्ये डॉ प्रतिमा इंगोले यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश..
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्व. विणा आडेकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते ही गोष्टच मला खूप नवलाची वाटते. एक नाही दोन नाही तब्बल सहा संमेलने या प्रतिष्ठानने आतापर्यंत आयोजित केली आहेत. हे सातवे संमेलन आहे. याचे नावही मला आवडून गेले. “सातवे स्मृतिगंध काव्य संमेलन”. या संमेलनाचे अध्यक्षपद देऊन संयोजकांनी माझा खूप सन्मान केला आहे. त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. हे सातवे संमेलन आहे. सात आकडा लोकसाहित्यात आणि जनमानसात खूप शुभ समजला जातो. सात आसरा असतात, सात पाताळ असतात.. लग्नात सात फेरे घेतात. लग्नात गेठे बांधतात सात गाठी बांधतात. आणखीही बरेच सप्तगुण असतील पण माझ्या दृष्टीने आपल्या सात कुळांचे आद्य सात ऋषी खुप महत्वाचे आहेत. ज्यांच्या नावे आकाशात सात तारका आहेत. ज्यांना आम्ही “बुढीचे खाटले” असे वऱ्हाडीत म्हणतो. कारण काव्याचा जन्म ऋषीमुळेच झाला. त्या आपल्या पूर्वसूरींच्या भावनांच्या उद्रेकामुळे आपण कवी म्हणून मिरवतो. तेव्हा त्यांचे स्मरण तसे महत्वाचेच ठरते. त्यामुळे मला सातव्या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले, यात मला खूप सार्थकता वाटते. तसेही आपण स्वानुभूती स्वानंदप्राप्ती करिता चपखल शब्दात व्यक्त करतो तो कवी असे म्हटले आहे. दुःखानुभूतीही चपखल शब्दात कवी व्यक्त करतो. जसे क्रौंच पक्षांच्या प्रणयप्रसंगी एकाचा बाण लागून मृत्यू होतो आणि ऋषींना श्लोक सुचतो. तेव्हा हर्ष आणि शोक दोन्हींची अनुभूती काव्यात मांडतो तो कवी. आता विद्रोही कवितेत कवी विद्रोह मांडतो. त्यामुळे हे म्हणणे बरोबर आहे की, कधी सुकोमल कधी रसाळ, कधी परखड तर कधी सडेतोड शब्दांनी व्यक्त होतो तो कवी. अशा कवींचे हे संमेलन आहे. इथे संध्या पवार, ना. गो. थुटे सारखे मान्यवर कवी उपस्थित आहेत. त्यामुळे हे काव्यसंमेलन खूप उंचीवर जाऊन पोहोचणार आहे. अशा संमेलनाचे अध्यक्षपद तुम्ही मला प्रदान केलेत हा तुमचा मोठेपणा आहे.
माझ्या लेखनाची सुरवात कवितेपासूनच झाली. माझे नवेनवे लग्न झालेले असतांना आम्ही दुचाकी वरून नातेवाईकाकडे जात होतो. तेव्हा एका शेतात पेरणी चालू होती ते पाहून मला “नवायी येल” कविता सुचली. तिला विदर्भ साहित्य संघाचे पारितोषिक मिळाले. ती पाचव्या वऱ्हाडी संमेलनात खूप गाजली. अजुनही तरूणांना खूप आवडते. पण नंतर माझ्या अनुभवांच्या कक्षा विस्तारत गेल्या आणि भी कथा कवितांकडे वळले. नंतर कादंबरी लेखनही केले. तसाही मला पूर्वीपासून लोकगीते गोळा करण्याचा छंद होता. मी लग्नापूर्वीपासूनच लोकगीते गोळा करण्यास सुरूवात केली होती. माझे वडील लहानपणी वारल्यामुळे मी आईच्या वडिलांकडे वाढले. त्याचे गाव “दानापूर” ते निसर्गरम्य व सातपुड्याच्या कुशीत आहे. त्या गावात माझ्या बालपणी लोकगीतांची गंगा झुळझुळती होती. वाड्यातील स्त्रिया जात्यावर दळायच्या. ओव्या गायच्या, लग्नात लग्नगीते म्हणायच्या. आगाडे पागाडे म्हणून थट्टामस्करी करायच्या. गावात बहुरूपी यायचा, गाणी गायचा. गव्हाची पेरणी झाल्यावर वाफ निघायची. तेव्हा तिफणीची आरती म्हटली जायची. लोक करमणुकीसाठी शंकराचा हुरळ्ळा, भजन गायचे. सणाउत्सवात लोकआरत्या म्हटल्या जायच्या आणि हे सगळे शब्दभांडार मला थक्क करायचे. त्यातुन माझे आजोबा कवी होते. ते पाठ्यपुस्तकातील कविता गाऊन म्हणायचे. त्यातून मला कविता आवडू लागली, आणि नंतर मी कविता लिहूही लागली. तुमच्या झाडी मंडळात आणि आमच्या कळासपट्टीत लोककवितांचे अखंड भांडार आहे. झाडी मंडळ हा लोकगीतातीलच शब्द आहे. मी लोकगीते गोळा केली. त्यातील एक ओवी.
“संभाले लागलं पान गोट्याच्या गराळात
शायनी पाराबती पतरं पाठोते झाळी मंडळात “
आपण आता “झाळी बोली” म्हणतो. ती तुमच्या झाळीच्या प्रदेशातील दमदार व श्रीमंत बोली आहे. पण लोकगीतात ह्या प्रदेशाला झाडीपट्टी आणि झाडीमंडळ असे पूर्वीपासूनच म्हणण्यात येत होते. तसेच आमच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या प्रदेशाला पूर्वी पासून लोकसाहित्यात कळासपट्टी म्हणत होते. “कळासपट्टीनं देऊ नये लेकबाय गोट्यावरी पळे पाय तथी आठवते माय” अशी एक ओवी आहे. लोकगीतातील ही बाई म्हणते. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात आपली लेक देऊ नये. कारण तिथे गोटेच गोटे असतात. आणि नदीकाठी गोठाडी असते. पाणी भरताना गोट्यावर पाय पडला की माय आठवते. पण आता डॉक्टर म्हणतात गोट्यावर पाय पडला की, प्रेशरपॉईंट दाबले जातात. जे आरोग्याला चांगले असतात. म्हणूनच पहिल्या ओवीतही म्हटले आहे “संभाले लागलं पानं, गोट्याच्या गराळ्यात” हा गोट्याचा गराळा आमच्या भागात आहे तर तुमच्या भागात झाडंच झाडं आहेत. म्हणूनच पूर्वापारचा ऋणसंबंध व्यक्त करण्यासाठी मी इथे आवर्जून आले आहे. मूलच्या महिला संमेलनात मला यायचे होते. पण पुण्याला असल्यामुळे ते जमले नाही. आता दानापूरला होते त्यामुळे येता आले. आपणा सर्वांना भेटता आले.
काव्याची व्याख्या उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्गार अशी केली जाते. पण आता ही व्याख्या बदलावी लागेल कारण बरेचदा कवितेत कारागिरी दिसते. गझलेत तर ती दिसतेच. पण आताच्या मोबाईलयुगामध्ये निरनिराळ्या ग्रुपवर दिलेल्या विषयांवर कविता वा चारोळ्या केल्या जातात आणि मग कवितेचा वा चारोळ्यांचा पाऊस पडतो. अर्थातच कवींना त्यातून प्रोत्साहन मिळते. एकमेकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थपित होतात हे सर्व ठीक ! पण कवितांचं म्हणाल तर विषय देऊन लेख वा निबंध लिहिता येतो पण कथा वा कविता सुचावी लागते. कदाचित बदलत्या पर्यावरणामुळे आणि इंटरनेटयुगामुळे हा समज खोटा ठरावा, कारण एकदा मी या अशा कवितांची परीक्षक होती आणि त्यांनी चांगल्या कविता लिहिल्या होत्या. त्यामुळे पूर्वीचा समज विसरावा लागेल. शब्दांच्या बाबतही असे बरेचदा घडते.
काव्याच्या प्रतिमाही आजकाल बदलत राहतात. पूर्वी कवितेतील प्रतिमा ठराविक होत्या. जसे मुलीचा चेहरा म्हणजे गुलाब, चंद्र अथवा काश्मिर. या काश्मिरवरून आठवले. मला लहानपणी “बी” कवींची एक कविता होती. ह्या कवितेची आठवण झाली ती माझी “पुन्हा एकदा” कविता पाठयपुस्तकात होती त्यावरून ! तेव्हा लेखक तुमच्या भेटीला असे कार्यक्रम ठेवत होते. एकदा माझाही असा कार्यक्रम नाशिकच्या नामांकित ज्युनियर कॉलेजमध्ये ठेवला. कार्यक्रम छान पार पडला. चहापानाच्या वेळी ती कविता शिकविणाऱ्या बाई म्हणाल्या. आम्हाला कविता शिकवितांना छान वाटते. पण तिच्यातील शब्द जड वाटतात. मी मॅडमला म्हटले, बरोबर आहे तुम्हाला मराठी कठिण वाटते आणि इंग्रजी सोपी वाटते. पण माझ्या कवितेतील मराठी सुलभ आहे. आता आठवले म्हणून सांगते. आम्हाला लहानपणी एक कविता होती. बहुतेक तिचे नाव “माझी कन्या” असावे. तिचे कवी “बी” हे अकोला येथील होते. आमच्या मराठीच्या शिक्षकांनी ती कविता शिकविली. त्या कवितेत ओळी होत्या.
“उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात
ह्या ओळींचा अर्थ आमच्या शिक्षकांनी असा सांगितला ” आपल्या महाराष्ट्रात नाशिक नावाचे शहर आहे. तिथे उष्ण वारे वाहतात आणि ते वाहत जाऊन काश्मिरातील गुलाबाला सुकवितात.” माझा भूगोल चांगला होता. तेव्हा मला मनात वाटले की, आपण तर भूगोलात शिकलो की, नाशिक हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि गुरूजी तर सांगतात उष्ण हवेचे आहे. तेव्हा काहीतरी गडबड होते आहे. पण गुरूजींना प्रश्न विचारायची तेव्हा पध्दत नव्हती. शिवाय मला मनात असेही वाटले की, जर नाशिकातून गरम वारे वाहत असतील तर नाशिकपासून काश्मिर तर खूप दूर आहे मग ते काश्मिरपर्यंत थंड होऊन जात असतील ? मग काश्मिरातील गुलाबाला कसे सुकवतील ? काहीतरी नक्कीच गफलत होते आहे.
घरी आल्यावर माझे आजोबा जे उत्तम कवी आणि शिक्षक होते. ते माझा अभ्यास घ्यायचे. मला जे शिकविले त्याची उजळणी घ्यायचे. तर घरी आल्यावर त्यांनी विचारले, आज काय शिकविले ? मी म्हटले ‘बी’ कवींची कविता. तसा त्यांना खूप आनंद झाला. कारण ‘बी’ कवी त्यांचे आवडते होते. शिवाय त्यांच्याच अकोला जिल्ह्यातील होते. ते म्हणाले “आण आण पुस्तक आण आणि ती कविता काढ. सांग मला काय शिकवले ते ?”
मी पुस्तक आणले. पान उघडले. कविता पण काढली. कविता म्हणायला व अर्थ सांगायला सुरूवात केली. ती ओळ आली. ‘उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मिरात’ अर्थ सांगितला. आपल्या महाराष्ट्रात नाशिक नावाचे शहर आहे. तिथे उष्ण वारे वाहतात. ते जाऊन काश्मिरातील गुलाबाला सुकवितात. आजोबांनी कपाळावर हात मारून घेतला. आणि मग मला ती संपूर्ण कविता उलघडून दाखविली. कवी “बी” यांना एकच कन्या असते. पण तेव्हाच्या कवींच्या परिस्थितीप्रमाणे त्यांची परिस्थिती गरिबीची असते. एकदा ही मुलगी रूसते. हट्ट करते मला मोत्याची माळ पाहिजे. तेव्हा ‘बी’ कवी संपूर्ण साहित्य विश्वाला या कवितेच्या रूपात सुंदर ‘मोत्याची माळ’ बहाल करतात. मुलीचा हट्ट तेव्हा ते पूर्ण करू शकत नाहीत. त्या रूसलेल्या मुलीचे हे वर्णन आहे. “उष्ण वारे वाहती नासिकात” म्हणजे रूसल्यामुळे मुलीचा श्वासोच्छवास जोरात होतो. रागामुळे हा श्वास गरम होतो. “गुलाबाला सुकविती काश्मिरात” त्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरचे गुलाब सुकतात. त्याकाळी कवी अशी प्रतिमा व प्रतिके वापरीत. गालाला गुलाब म्हणत. चेहऱ्याला चंद्र वा काश्मिर म्हणत. मुलीचा चेहरा काश्मिर आणि या काश्मिरातील गुलाब म्हणजे गाल. रागवल्यामुळे ते कवीला सुकल्यासारखे वाटतात. पण आजकालचे कवी ह्या पूर्वीच्या प्रतिमा वा प्रतिके वापरीत नाहीत.
तसाही कवी एक कलावंत असतो. कल्पना, प्रतिमा, प्रतिके, वापरून त्यांच्याशी वास्तवाचा मेळ जुळवून तो सुंदर कलाकृती निर्माण करीत असतो. कवी एक द्रष्टा असतो असे आपण मानतो. याचा प्रत्यय आपणास बहिणाबाईंच्या काव्यातून येतो. त्या म्हणतात.
“बीय टरारे भुईत, सरवे कोंब आले वन्हे
गारलं शेत मायं, आंगावरती शहारे”
त्या म्हणतात, पेरणी झाल्यावर “बी” जमिनीत फूगते. हा बदल म्हणजे निर्मिती प्रक्रियाच असते. नंतर सर्व कोंब वर येतात. ह्या शेताची तुलना बहिणाबाई गर्भार स्त्रीशी करतात. त्या म्हणतात गर्भार स्त्रीला गर्भातील बाळाची हालचाल जाणवताच तिच्या अंगावर सुखाचे शहारे येतात. ती गहिवरून येते तसंच माझं शेतही कोंब वर येताच गारलं, म्हणजे गहिवरून येते आणि शेताच्या अंगावर गर्भार स्त्री प्रमाणे शहारे येतात. कारण नुकतेच उगवलेले कोंब बहिणाबाईला तसे दिसतात. त्या अशिक्षित असतात. त्यांचा निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास नसतो. तरीही त्या कल्पनेनेच प्रतिकं आणि प्रतिमा वापरून सुंदर काव्यनिर्मिती करतात.
त्यामागे निसर्गदत्त प्रतिभाशक्ती असते, जी कवीला लाभते. म्हणूनच बहिणाबाई श्रेष्ठ कवयित्री ठरतात. ज्ञानेश्वरांचेही तसेच आहे. त्यांनीसुध्दा गर्भार स्त्रीचे मनोगत नेमके जाणले आहे. ते म्हणतात याला प्रतिभा लागते.
“माहेविणी प्रयत्नसे चुकविती सेजे जैसी”
शेवटी कवी शब्दांचे शेले विणून कविता करतो.
शब्दांचे विणतो शेले, मी कबीर झालो आहे. जगण्याचा उत्सव सजला मी अबीर झालो आहे. कवी खरोखरच जगण्याचा उत्सव साजरा करीत असतो. पण आता तेही कठीण झाले कारण प्रत्येकच संवेदनशील माणूस आज खंतावतोय. कवी तर नक्कीच.
“आता मीही काढतो
सेल्फी गावाची
आणि करतो पोष्ट
व्हॉटस्अॅप, फेसबुक
इन्स्टाग्रामवर….. सगळेच करतात लाईकच लाईक
पण साला….. माणूस हरवल्याची
नोंद कोणीच कसे
घेत नाही ?”
आजच्या कवितेचे हे वास्तव आहे. कवी माणूसपण शोधतो आहे आणि शब्दात हरवतो आहे. पण किमान अशा संमेलनातून माणसांना भेटता येईल म्हणून मीही धडपडते आहे. खरंच आज संवाद हरवला आहे. याचे दुःख कवीला आहे.
“संवाद कमी होत चाललाय हल्ली किंबहुना गरजच वाटत नाही आजच्या पिढीला त्याची…. आणि आता सगळंच झालं की ऑनलाईन…. एका क्यू आर कोडवरून लगेच इकडचे पैसे तिकडे ट्रान्सफर करता येतात….. पण असं एका स्कॅनवर
या मनातलं त्या मनात
जात नसतं कधीच
त्यासाठी संवाद जिवंत
ठेवला पाहिजे….
खरंच या देशात काय काय हरवलंय
याची मोजदाद करता येत नाही.
संवाद हरवलाय. तसंच माणुसकी हरवलीय,
संस्कृती जी या देशाची खास होती ती पण हरवलीय.
पर्यावरण हरवलंय पण त्याची कोणालाच खंत वा खेद नाही.
या सर्वांचं वर्णन मी माझ्या “गढी” कथेत केलं जी आता बारावीला व अमरावती विद्यापीठात भाग एकला आहे. त्यांचीच कविता आहे. (स्व. बापूसाहेब ढाकरे)
” गाताना थकले अनेक,
प्रतिभासंपन्न मोठे कवि
ऐसी चालत ये पुरातन, महाराष्ट्रा ।
तुझी थोरवी तू होतास म्हणून धर्म जगला,
भंगेन ती संस्कृती स्वातंत्र्योत्सुक
सुप्त तेज प्रगटे, ही काय आता गती”
सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. आणि कवींना देशातील अराजक बघून खंत वाटते आहे.
“स्वातंत्र्य देशाला मिळालं,
पण आपल्याला घेता आलं नाही वर्षानुवर्षे
वय वाढत राहिलं, पण मनासारखं जगून झालं नाही
ही जाणीव कुरतडते काळीज, खोल आतल्या आत.
असे एक कवी म्हणतो आणि ते अक्षरशः खरे आहे. स्वातंत्र्यलढ्यात जे शहीद झाले त्यांचीही संपूर्ण नोंद नाही. अथवा ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला पण ज्यांना तुरूंगवास झाला नाही. त्यांचीही कुठेच नोंद नाही. फक्त तुरूंगातील सैनिकांची नोंद तेही इंग्रजांनी ठेवली म्हणून आहे. आता तर त्याबद्दल कोणालाही खेद वा खंत वाटत नाही. स्वातंत्र्याची फळे मात्र चाकताहेत. स्त्रियांबाबतही तेच आहे. त्यांना कायद्याने स्वातंत्र्य मिळाले पण प्रत्यक्षात काय आहे ? माझी नुकतीच प्रकाशित झालेली “राशाटेक” कादंबरी याच विषयावर आहे. आईने कर्णफुलं मोडून बांधलेल्या घरात ती माघारी परतल्यावर अंगणातील एक ‘“तस्मा” जागा द्यायलाही भाऊ तयार होत नाहीत. हा खरे तर कायद्याचाही पराभव आहे.
“जात्यावरची गं ओवी
जात्यामध्ये भरडली
तिच्या पोटात वेदना
तिची तिनंच दळली”
एक दिवस येतो आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा ! तसेच सावित्रीच्या जयंतीचा !
“एक दिवस सावित्रीचा
त्या दिवशी सावित्री
तरारून उगवते रानभर
फोटोत… रांगोळीत… चित्रात
निबंधात…. वृत्तपत्राच्या रकान्यातून सावित्री पाझरत राहते
बाकी वर्षभर सावित्री गोंधळात
मी सतीसावित्री….
वटसावित्री
कि…. फुल्यांची सावित्री
नव्या ज्योतिबाने आखलेल्या
सोनेरी वर्तुळात हरवून स्वतःला शोधायचं आहे
हेही विसरते सावित्री….
हे आजचे वास्तव आहे. नवशिक्षित महिला घरचे, दारचे करताना थकून जाताहेत. त्यांची स्थिती मजूर स्त्रियांपेक्षा वेगळी नाही. पुरूष मात्र तिच्या कडून जुन्याच अपेक्षा बाळगत आपले पुरूषत्व कवटाळून बसलाय ! ही सावित्रीने महिलांना शिक्षित करून दिलेल्या वस्याचीही शोकांतिका आहे. त्यामुळे खरेतर अशा साहित्य संमेलनाची गरज आहे. संमेलनातून काहीतरी कानावर पडते आणि त्यातून विचारांना प्रेरणा मिळते. खूप लांबड न लावता माझे विचार तुमच्यासमोर मांडले आहे.
तुमच्या नगरीचेच नाव “भद्रावती” आहे. म्हणजे चांगले करणारी नगरी ! अभद्र म्हणजे वाईट, अशुभ आणि भद्र म्हणजे चांगले, शुभ, कल्याणकारी ! माझे पाय या नगरीला लागले, तेव्हा माझे कल्याण होईल, हा मला विश्वास वाटतो. शिवाय या ऐतिहासिक नगरीच्या मातीला मला वंदन करता आले. हेही भाग्यशाली ! तुम्हा सर्वांना वंदन करून थांबते, धन्यवाद !
प्रतिमा इंगोले
संमेलनाध्यक्ष
सातवे स्मृतिगंध काव्य संमेलन भद्रावती जिल्हा चंद्रपूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.