September 24, 2023
Knowledge of self-realization is useful in stressful life article by rajendra ghorpade
Home » धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त
विश्वाचे आर्त

धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त

साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।190 ।। ज्ञानेश्वरी अध्याय ४ था

ओवीचा अर्थ – तें ज्ञान अंतःकरणांत स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो.

आत्मज्ञान प्राप्तीची एक पायरी आत्मबोधाची आहे. पण हा आत्मबोध कसा होतो ? यासाठी काय करावे लागते ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. मी आत्मा आहे. हे ज्ञान जेव्हा होते. याची अनुभूती जेव्हा येते. तेव्हा या ज्ञानाची प्रतिष्ठापना हृदयात होते. सोऽहमचा जप जेव्हा हृदयात प्रकट होतो. श्वासावर जेव्हा आपले नियंत्रण राहाते. तेव्हा मन स्थिर होते. या स्थितीमध्ये मनात शांतीचा अंकुर फुटतो. यातूनच आत्मबोध वाढतो. हा अंकुर जसजसा वाढेल तसा आत्मबोध वाढतो. याचे वृक्षात रूपांतर होते. त्याला मग आत्मज्ञानाची फळे येतात. यासाठी साधना ही महत्त्वाची आहे.

सद्गुरूंनी सांगितलेली सोऽहम साधना नित्य करणे आवश्यक आहे. साधनेत मन रमवायला हवे. पण नेमके हेच होत नाही. धकाधकीच्या जीवनात तर आता हे अशक्यच वाटत आहे. गुरूकृपेशिवाय हे शक्य नाही. मुळात ही साधनाच सद्गुरू करवून घेत असतात. यासाठी त्यांच्याकडे ही विनवणी आपणच करायला हवी. तर मग आपोआपच ते ही साधना करवून घेतील. फक्त आपण सवड काढायला हवी. धावपळीच्या जीवनात सवडच मिळत नाही. खरंतर आता या धावपळीत गप्प बसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे मनाला गप्प बसण्याचा, निवांतपणाचा विचारच डोकावत नाही. थांबला तो संपला. अशी अवस्था झाली आहे. यामुळे साधना करण्याकडे लोकांचा ओढा कमीच होत चालला आहे.

साधना करणे म्हणजे फुकट वेळ घालविणे अशी समजूत आता होऊ घातली आहे. पण प्रत्यक्षात निवांतपणा, विश्रांतीही जीवनाला आवश्यक असते. प्रवास करताना काही ठिकाणी थांबे हे घ्यावेच लागतात. तरच प्रवास सुखकर होतो. नाहीतर अंगदुखी, अंग अवघडणे हे प्रकार सुरू होतात. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. त्यामध्येही काही थांबे घ्यायला हवेत. सततच्या कामात विरंगुळा हा हवाच. यासाठी पर्यटन आपण करतोच. पण दिवसभराच्या कामातही विरंगुळा हवा. थांबा हवाच. यासाठी दहा पंधरा मिनिटे साधना करायला हवीच.

साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायाम नसल्याने अनेक आजार उत्पन्न होत आहेत. यासाठी मनाचा हा व्यायाम तरी नियमित करायला हवा. यामुळे मन ताजेतवाने होऊन नवनव्या कल्पनांना चालना मिळू शकेल. यासाठी तरी साधना करायला हवी. हीच वाट आत्मज्ञानाकडे निश्चितच नेईल.

Related posts

ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवा

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

अध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते

Leave a Comment