July 27, 2024
Marathi Boli Conservation article by Laxman Khobragade
Home » भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद
विशेष संपादकीय

भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद

बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला नाही. अर्थ तोच आहे. मग भाषेच्या नावाखाली बोलीची गळचेपी ही संस्कृतीची विटंबना आहे.

लक्ष्मण खोब्रागडे

जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर

भाषेने मानवी जीवन फुलवले. जीवनाच्या भावविश्वाला पैलू पाडत व्यवहाराच्या रथाचे सारथ्य भाषेने चोख बजावले आहे. मानवाच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक बनून, भाषा व्यक्तिमत्वाची जडणघडण घडवीत असते. अनन्य साधारण महत्व असलेल्या भाषेविना व्यवहार विकलांग होऊन बसते. त्यामुळे भाषा टिकवण्यासाठी प्राचीन काळापासून आजतागायत प्रयत्नांची मालिका सुरू होती. आणि यापुढेही त्यात कसूर होणार नाही, हे तितकेच सत्य आहे. येनकेनप्रकारेण भाषेचे संगोपन करण्यासाठी मानवाची धडपड चाललेली असते. मानव जितका स्वतःवर प्रेम करतो, तितकाच आपल्या भाषेवर जीव जडवुन घेतो. जीवन आणि भाषा यापासून फारकत घेता येत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोबत असणारी भाषा, जीवनसांगिनी बनून वावरत असते. जीवनसागरात भाषेच्या आधाराने व्यवहाराची नौका पार होत जाते. इतके मौल्यवान रत्न जोपासणे काळाची गरज आहे.

भाषा संवर्धनासाठी लिखित माध्यमाचा वापर केला जातो. या प्रवासात लिखित भाषेला सजवण्यासाठी, बोलली जाणारी बोली महत्वपूर्ण भूमिका बजावते. बोली असेल तशी भाषा फुलत जाते. भाषा हे फुल असेल तर बोली वेल आहे. वेल चांगला पसरला तरच फुलांचा ताटवा शोभून दिसतो. भाषेचा मुकुट सजविण्यासाठी बोलीच्या मण्यांची आरास करावी लागते. मणी गळून पडले की मुकुटाचे मूल्य कमी होत जाते. कदाचित दुर्लक्ष होण्याचा संभव टाळता येत नाही. बोलीमुळे भाषेला शोभा येते. बोलीचा इतिहास पुसल्यास, भाषेतील शब्दांच्या अर्थाला अवकळा येऊन भाषा मोडकळीस पडते. भाषा शरीर मानले तर बोली आत्मा आहे. बोलीचा आत्मा भाषेत प्राण भरून अर्थाचा श्वास फुकतो. भाषेच्या मुळाशी जाऊन पहा, त्यात बोलीचाच ओलावा दिसून येईल. ओलावा नष्ट करण्याचा मूर्खपणा केल्यास, वाढलेला वृक्ष कोलमडून पडेल. मूल जन्माला आले की त्यावर वातावरणानुसार संस्कार घडत जातात, म्हणून ज्या उदरातून जन्म घेतला त्याला पोरका थोडाच होतो ? ज्या गर्भात वाढला त्या गर्भाची माया तोडून असंवेदनशीलतेची पायाभरणी घातल्यासारखे होईल.

मूल जन्माला आले की, त्याच्या मुखी उमटणारे स्वर, त्याच्या अस्तित्वाची सुरुवात करीत असते. कालांतराने परिस्थितीसापेक्ष जडणघडण होत असताना स्वरांवर संस्कार केले जातात. पण भावनेच्या मुळाशी असलेला अर्थ बदलत नाही. व्यक्त होण्यासाठी भाषा विकसित होताना,संदर्भ बोलीचाच असतो. भाषा आणि बोली एका नाळेत जुडलेल्या असल्याने, वेगळेपण दाखविणे म्हणजे मूर्खाच्या बाजारात जाण्यासारखे घट्ट जुळलेले बंध न ओळखता, श्रेष्ठतेच्या नावाखाली भाषेची वेगळी व्याख्या करण्याची स्पर्धा सुन्न करून जाते. ज्याला संधी मिळाली तो आपल्या परीने भाषा वाकवत गेला. पण त्यासाठी समाजजीवनातील घटना, रूढी ,परंपरा आणि चालीरीती याचा आधार घेतलेला आहे. याला कोणी नाकारू शकत नाही. आणि याचा उगम बोलीतूनच झालेला असतो. फक्त ज्याला गवसला, त्याने आपल्या पद्धतीने मांडला. बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला नाही. अर्थ तोच आहे. मग भाषेच्या नावाखाली बोलीची गळचेपी ही संस्कृतीची विटंबना आहे.

संत नामदेवांची ओवी गुरुग्रंथसाहिबमध्ये घेतली म्हणून धर्म बाटला नाही. मग भाषेत बोलीचे शब्द आल्यास, भाषा अशुद्ध कशी होते ? हा संशोधनाचा विषय आहे. भाव आणि अर्थ एक असताना शब्दाला गावंढळ ठरवण्याचा भाषिक आतंकवाद; कित्येकांच्या भावनिक दमनाला खतपाणी घालत, विचारस्वातंत्र्याची पायमल्ली करीत आहे. शालेय शिक्षणापासून कार्यालयीन कामकाजात सामान्यांची होणारी कुचंबणा या आतंकवादाचे ध्येयच बनले असावे. जरा का बोलीतील शब्द आला की, भाषिक आतंकवादी ताशेऱ्यांचा भडिमार करायला मोकळे. मग इतर नियोजित क्षेत्र तर सांगायची गोष्टच नाही. भाषिक आतंकवाद पसरवणारी टोळी गल्लोगल्ली पाहायला भेटेल. दगडाचा गोटा झाला तरी, हे आतंकवादी धोंडे फेकायला तयारच राहतात. बोलीच्या लकबीमुळे वेलांटी, उकारापासून ‘न’ आणि ‘ण’ च्या खलबती चालवून, व्याकरणाचा तर उन्माद घालायला सुरू. या तांडवात बोलीचा प्रेषित भाषेचा वापर करण्याआधीच कोंडमाऱ्याने गुदमरून जातो. हा आतांकवाद जणू विशिष्ट वर्गालाच भाषेची मक्तेदारी बहाल करीत जातो आणि इतरांनी गुलामासारखे त्यात फरफटण्याचा प्रकार आहे.

भावना, विचार व्यक्त करायला बोलीची भाषा अस्पृश्य मानली तर विशिष्ट वर्गाची बोली भाषाप्रमाण मानणे, भाषिक आतंकवादाला बळकटी देण्यासारखे होईल. अभिव्यक्त होणारी प्रत्येक भाषा ही शुद्धच असते. फक्त श्रेष्ठत्वाची चढलेली काजळी पुसल्यास, सर्व स्वच्छ दिसते. पण मनात आधीच गढूळपणा असेल तर ? कावीळ झाली की जग पिवळे दिसते म्हणतात. आता या काविळीवर उतारा शोधावाच लागेल. ह्या रोगाने भाषेचा अंत व्हायला नको असेल तर, बोलीची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. बोलीतून पाझरणारे हार्मोन्स भाषेची ताकत वाढवणार आहेत. बोलीचा हात पकडून भाषेची भरभराट होणार, ही खूणगाठ सुटता कामा नये. भाषेच्या अस्मितेवरील भाषिक आतंकवादाचा डाग पुसायचा असेल तर, बोलीचा झरा वाहता ठेवणे काळाची गरज आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रचितीगडावर जाण्यासाठी उभारली शिडी !

अन् पारगड पुन्हा सजला…

वैयक्तिक हमीदारांसंदर्भातील महत्त्वपूर्ण निकालाबाबत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading