‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले यांनी लिहिलेल्या या कथा वाचताना बालवाचकासोबत आणि प्रौढ वाचकालाही भानावर आनल्याशिवाय राहत नाही.
गुलाब बिसेन, सितेपार (ता. तिरोडा, जि. गोंदिया)
मो. नं. 9404235191
बालभारती इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘कठीण समय येता’ या पाठाचे लेखक मनोहर यांचा ‘मक्याची कणसं’ हा नवीन कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. मनोहर भोसले या संवेदनशील लेखकाच्या लेखनीतून साकारलेला हा कथासंग्रह वाचताना वाचक या कथेतील पात्र आपल्या सभोवती असलेल्या नानातऱ्हेच्या व्यक्तिरेखांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. जणू ती पात्रे आपल्या सभोवतीच आहेत. त्यांचा आणि आपला काहीतरी संबंध आहे असा भास निर्माण करतात. इतक्या जिवंतपणे ह्या कथा मनोहर भोसले यांनी कागदावर उतरवलेल्या आहेत.
‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहामध्ये तेरा कथांचा समावेश आहे. यातील काही कथा यापूर्वी यूट्यूब चॅनेलवरती प्रसारीत झालेल्या आहेत. सरप्राईज, खच्चाक, सुनिता आणि वनिता, मुलाखत, माफ केलेले अपराध, मक्याची कणसं, पिको फॉल, ध्येय चांगलं असेल तर, आश्रय, न फेडता येणारे उपकार, आई-आई असते, शिक्षण आणि प्रशिक्षण, केस घेणार केस, पावनेर या कथांचा संग्रहात समावेश आहे. लेखकाची जडण घडण ग्रामीण भागात झालेली असल्यामुळे या कथांमध्ये ग्रामिण जीवनाशी जुळलेली नाळ पदोपदी बघायला मिळते.
दोन वेण्या घालण्याच्या कडक शिस्तीविरोधात बंड पुकारणाऱ्या सायली आणि तिच्या मैत्रिणी. वरून फणसासारख्या काटेरी वाटणाऱ्या परंतु आत गरासारख्या मधुर असणाऱ्या, मुलींना सरप्राईज देणाऱ्या त्यांच्या मुख्याध्यापिका यांच्यातील द्वंद्वाची ही कथा वाचताना एकीकडे शिस्त हवी असे वाटत असताना सायलीची अडचण तिच्या परिस्थितीची जाणीव करून देते. फोटोग्राफर बापाला आपल्या लेकीच्या कलेची प्रसंगातून होणारी ओळख ‘खच्याक’ या कथेतून वाचायला मिळते. लाखो युवकांचे प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘ध्येय चांगलं असेल तर’ ही कथा वाचकाला प्रेरित करून जाते.
लेखक मनोहर भोसले यांनी या कथांमधून परस्पर मानवी नाते संबंध वृदिधंगत करण्याच्या उदात्त भावनेतून मांडणी केलेली दिसून येते. पिको फॉल या कथेत विधवा मैत्रीणीला कुणाच्या दयेवर अवलंबीत न ठेवता मुंबईला नेऊन कापड शिलाईचे प्रशिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभी करणारी वर्षाराणी मनात रेंगाळत राहते. आश्रय – न फेडता येणारे उपकार ही कथा गावखेड्यातील माऊलीने लेखकाला पावसात सापडल्यावर रात्रभर आपल्या घरात दिलेल्या आश्रयाची कथा सांगून जाते. एखाद्या अनोळखी इसमाला संकट समयी नवरा घरात नसतानाही मनात कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता आश्रय देणारी माऊली आपल्या साधेपणाची साक्ष या कथेतून देते.
‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले यांनी लिहिलेल्या या कथा वाचताना बालवाचकासोबत आणि प्रौढ वाचकालाही भानावर आनल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे धावपळीच्या या काळात स्वतः मध्ये गुरफटलेल्या जगाला भानावर आणण्याचे काम हा कथा संग्रह करेल असा विश्वास आहे.
पुस्तकाचे नाव – मक्याची कणसं
लेखक – मनोहर भोसले
प्रकाशक – हृदय प्रकाशन, कोल्हापूर
एकूण पृष्ठे – 72
किंमत – 125 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

उरावर नाच