October 6, 2024
The Mystery of the Stepping Stone J D Paradkar article
Home » Privacy Policy » पायरीच्या दगडाचे रहस्य…
मुक्त संवाद

पायरीच्या दगडाचे रहस्य…

पूर्वीच्या काळी घरांच्या रचना अशाच पद्धतीच्या असत. दगड मातीच्या भिंती आणि चौथर्‍यासाठी परिसरातच जांभ्या दगडाची घडाई करून ते लावले जात. दगड मातीच्या भिंतींची जाडी कमीत कमी दोन ते अडीच फुटांची असे. यामध्येच कोनाडे तयार केले जात. या कोनाड्यांचा वापर दिवे ठेवण्यासाठी केला जाई.

जे. डी. पराडकर 9890086086

घराचा चौथरा उंच असला, तर घरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्यांची रचना करावी लागते. कोकणच्या ग्रामीण भागात अशी उंच चौथरा असलेली घरे पाहायला मिळतात . घराचा चौथरा उंच असण्यामागील मुख्य कारण म्हणजे, चारही बाजूने असणाऱ्या पडव्या, ओटी, माजघर आणि देवघर यांचा उंचावर असणारा भाग. आमच्या आंबेडखुर्द येथील घराचा चौथरा मुख्य अंगणापासून जवळपास पाच फूट उंचीचा आहे. अंगणातून मुख्य दरवाजात प्रवेश करताच पहिली लांबलचक पडवी लागते. या पडवीतून ओटीवर जाण्यासाठी परत अडीच फूट उंचीचा आणखी एक चौथरा आहे.

पूर्वीच्या काळी घरांच्या रचना अशाच पद्धतीच्या असत. दगड मातीच्या भिंती आणि चौथर्‍यासाठी परिसरातच जांभ्या दगडाची घडाई करून ते लावले जात. दगड मातीच्या भिंतींची जाडी कमीत कमी दोन ते अडीच फुटांची असे. यामध्येच कोनाडे तयार केले जात. या कोनाड्यांचा वापर दिवे ठेवण्यासाठी केला जाई.

सध्याच्या पिढीला कोनाडा म्हणजे काय ? हे चित्रात दाखविण्याची वेळ आली आहे. ओटीचा आकार छोटा असला, तरी ओटीचे महत्त्व मात्र सर्वात अधिक मानले जायचे. ओटीच्या दुतर्फा कपडे , पिशव्या, टोप्या अडकविण्यासाठी लाकडी खुंट्यांची भिंतीतच रचना केलेली होती. पडवीतून ओटीवर जाण्यासाठी आमच्या घरी ज्या दोन पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत, त्या काळ्या पाषाणाच्या आहेत.

या पायरीच्या दगडाचे रहस्य मला नुकतंच आमचे ९२ वर्षांचे चुलते ‘ आबा ’ यांच्याकडून कळलं. आमचा पुतण्या हर्ष याची नुकतीच रत्नागिरीत मुंज झाली. या मुंजीच्या समारंभा निमित्त आम्ही सर्व पराडकर कुटुंबीय एकत्र आलो होतो. कुटुंबीय एकत्र आल्याने परस्परात संवाद घडतो आणि प्रत्येक वेळी हाती काहीतरी नव लागतं . यावेळी आबांच्या पोतडीतून मला ओटीच्या पायरीला असणाऱ्या दगडाचे रहस्य समजले. पूर्वीच्या माणसांच्या अंगी असणारी ताकद आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडली होती, याचीच प्रचिती मला हा प्रसंग ऐकल्यानंतर आली. आंबेड खुर्द येथील घरामध्ये असणाऱ्या ओटीच्या पायरीचा दगड आता खरोखरच भाग्यवान म्हटला पाहिजे.

आमचे आंबेड खुर्द येथील घर म्हणजे अनेकांचे आश्रयस्थान होते. नातेवाईकांच्या व्यतिरिक्त देखील, कोणीही यावे आणि मनाला वाटेल तेवढे दिवस आरामात रहावे आणि आमच्यातलाच एक होऊन जावे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला योग्य तो सन्मान आमच्याकडे दिला जायचा. खरंतर ही सारी मंडळी, ज्यावेळी आमच्याकडे येत असत त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. या अलौकिक व्यक्तीमत्त्वांच्या कथा आबांच्या तोंडून ऐकताना, आपण त्यावेळी नव्हतो, याची नक्कीच खंत वाटते. आमचे पूर्वज दीडशे वर्षांपूर्वी आंबेडखुर्द येथे आले.

आमचं मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील उमरे हे आहे. या गावात आमचा आजही चौथरा उभा असल्याचे आम्हाला पाहायला मिळते. काही कारणाने आमच्या पूर्वजांनी उमरे या गावातून स्थलांतर केले, ते थेट आंबेडखुर्द या गावी. उमरे या गावातही आम्हाला मोठा मानसन्मान होता. आजही आम्ही त्या गावात गेलो, तर गावकरी मंडळी आम्हाला पूर्वीचाच मान सन्मान देतात हे आम्ही दोन ते तीन वेळा अनुभवले देखील आहे. उमरे गावातील भाटवडेकर आमचे उपाध्ये म्हणून काम पहात. आम्ही आंबेड खुर्द गावात स्थलांतर केल्यानंतरही अनेक वर्षे उमरे येथून भाटवडेकर आमच्या घरी येऊन सर्व प्रकारची देव कार्य करत असत. उमरे गावाशी असणारे आमचे ऋणानुबंध त्या गावातून स्थलांतर केल्यानंतरही कायम राहिले. पराडकर आणि भाटवडेकर यांच्या पुढील पिढ्यांनी हे ऋणानुबंध आजही जपलेले आहेत.

आंबेड खुर्द येथील घरी येणाऱ्या प्रत्येकाजवळ आमचे चुलते आबा यांची खास सलगी असायची. आबांचा स्वभाव हा मिश्किल असल्याने लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत त्यांची चेष्टा मस्करी चालायची. आबा आणि आमची प्रमिला काकू घरी येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करत, त्यांना आनंदाने जेवू खाऊ घालत. आंबेडच्या घरी एक-दोन दिवसांसाठी कोणी येतच नसे. येणाऱ्या प्रत्येकाचा आठवडाभरासाठी मुक्काम ठरलेलाच असायचा. आमचे आंबेड खुर्दचे घर हे येणाऱ्याला आपले, दुसरे घरच वाटे.

उमरे येथून आमचे उपाध्ये शंकर भाटवडेकर चातुर्मासात सलग चार महिने अंबेडलाच मुक्कामाला असत. या चार महिन्यात दररोज सकाळी देवाची पूजा करणे, सायंकाळी धुपारत करणे, अधून मधून देवांवर एकादशणी करणे अशा साऱ्या देवकार्याचा यामध्ये समावेश असायचा. शंकर भाटवडेकर म्हणजे एक धाडसी आणि अवलिया असे व्यक्तिमत्व होते. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही. जवळपास साडेपाच फुटांची उंची, पांढरा सदरा – धोतर , पायात चामड्याच्या वाहणा, विडीचे व्यसन असल्याने कानाला एखादी विडी अडकवलेली. हातात पिशवी, पिकलेले आणि बारीक केस, कृष शरीरयष्टी, भारदार आवाज, आयुर्वेदिक औषधांची उत्तम माहिती, कमालीचा आत्मविश्वास, देवाचे नामस्मरण जप जाप्य, पूजा अर्चा यावर अधिकाधिक भर, गप्पिष्ट स्वभाव, त्यामध्ये मिश्किलपणा ओतप्रोत भरलेला, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी, पडवीत असणाऱ्या झोपाळ्याजवळ तासनतास उकिडवे बसून गप्पांचा फड रंगविण्याची सवय, कितीही अंतर पायी चालत आपल्या मुक्कामी पोहोचण्याची असणारी तयारी, कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाण्याची असणारी आवड, ओतप्रोत भरलेला प्रामाणिकपणा, न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची असलेली तयारी, चांगुलपणा बरोबरच थोडा तिरकस पणा भरलेला असल्याने त्यांच्यातील करारीपणाही दिसणारा त्यांचा चेहरा, म्हणजे आमचे उपाध्ये असणारे शंकर भाटवडेकर गुरुजी.

आमचा पुतण्या हर्ष याच्या मुंजी निमित्त, आम्ही रत्नागिरीत आमचे काका राहत असलेल्या सदनिकेत सारे पराडकर कुटुंबीय एकत्र आलो होतो. याच दरम्यान भाटवडेकर यांच्या पुढील पिढीतील आणि आजही आम्ही ज्यांना आमचे उपाध्ये मानतो, त्या चंद्रकांत भाटवडेकर यांचा पुणे येथून हर्षला मुंजीनिमित्त आशीर्वाद देण्यासाठी फोन आला. सहाजिकच त्यानंतर भाटवडेकर कुटुंबाचा विषय चर्चीला गेला. मनोहर पराडकर आणि मुकुंद पराडकर या आमच्या दोन चुलत्यांमध्ये त्यांच्या तरुणपणीच्या गप्पा रंगायला सुरुवात झाली.

हे दोघेही केव्हाच मनाने आंबेड खुर्दच्या घरी देखील पोहोचले. अशावेळी आपण मध्येच काही संभाषण न करता श्रवणभक्ती केलेली बरी, म्हणून मी त्यांचा संवाद मन लावून ऐकत होतो. यावेळी एकदा आमचे उपाध्ये असणाऱ्या शंकर भाटवडेकर यांनी दाखविलेल्या धाडसाचा किस्सा आबा आणि मनुकाका यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या चर्चेत रंगत गेला आणि हा प्रसंग ऐकून मी तर थक्कच झालो. आंबेड खुर्दच्या घरी ओटीवर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या नव्याने बनवण्याचे ठरविण्यात आले होते . यासाठी आमच्या घराजवळून वाहणाऱ्या ओढ्याजवळ एका भेळ्याच्या झाडात एक मोठा काळा पाषाण होता. याच पाषाणापासून ओटी वर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्याचे नक्की करण्यात आले होते. मात्र दूर अंतरावरून हा पाषाण घरी आणायचा कसा ? यावरच मोठ्या चर्चा सुरू होत्या.

गावातील अनेक गडी माणसांचा आमच्या घरी कायम राबता असे. घर परड्यात असणारी पोकळीची मोठी बाग, विस्तारलेली शेती, आंब्या फणसांची अनेक झाडे, शेती व्यतिरिक्त घेतली जाणारी विविध प्रकारची उत्पादने, गोठ्यात असणारी असंख्य गुरे यामुळे आंबेडच्या घरी गडी माणसांचा नेहमीच राबता असायचा. एक दिवशी आबांनी कामासाठी आलेल्या आठ गड्यांना ओढ्या जवळ असणाऱ्या भेल्याच्या झाडा नजीकचा काळा पाषाण, ओटीवर जाणाऱ्या पायरीसाठी घेऊन येण्याचे फर्मान सोडले. सकाळी चहा घेतल्यानंतर आवश्यक हत्यारे सोबत घेऊन आठ गडी भेल्या जवळील काळा पाषाण आणण्यासाठी निघूनही गेले.

दुपार झाली तरी पायरीसाठी हवा असणारा दगड, घरी का आला नाही? हे पाहण्यासाठी आबा भेळ्याच्या झाडाजवळ गेले. समोरचे दृश्य पाहून आबा देखील अचंबित झाले. आठ गडी सकाळपासून मेहनत करत असताना देखील हा काळा पाषाण हलायला तयार नव्हता. सारे गडी घामाने चिंब भिजले होते. “ आबानु , काय बी केल्या हा दगड काय, जागचा हलिया बगत नाय, आता काय करयाचं हं तुमीच सांगा. ” उत्तर दाखल आबांनी ‘ बर ’ असं म्हटलं आणि त्यांनी घर गाठलं. घरी आल्यानंतर आबांनी घडला प्रकार घरात सांगितला. देवघरात पूजा करणाऱ्या शंकर भाटवडेकर गुरुजींनी हा प्रकार ऐकला. पूजा करता करताच शंकर भाऊंनी देवाजवळ काय प्रार्थना केली, ती त्यांची त्यांनाच माहित.

देवघरातून पूजा आटपून ओटीवर आलेल्या शंकर भटजींनी, “ पायरीच्या दगडाचे दुपारी जेवल्यानंतर पाहूया ” असे सुतोवाच आबा जवळ केले. आता जे काम आठ गड्यांना जमत नाही, ते शंकर भटजी काय पाहणार ? असे आबांच्या देखील मनात आले खरे.

आबांना शंकर भटजींच्या ताकदीची पूर्ण कल्पना होती. शंकर भाऊ जरी दिसायला काटक असले, तरी त्यांची ताकद मात्र अफाट होती. याबरोबरच जपजाप्याच्या सामर्थ्यावर त्यांनी विशिष्ट अशी शक्ती देखील प्राप्त केलेली होती. या शक्तीची अनुभूती आंबेडच्या घरातील अनेकांनी वेळोवेळी घेतली होती. गावात कोणाला एखाद दुसरी अडचण आली, तर त्यावर आपल्या मध्ये असणाऱ्या शक्तीच्या सामर्थ्यावर शंकर भाटवडेकर गुरुजींनी उपाययोजनादेखील केलेल्या होत्या. पायरीचा दगड आणण्यासाठी गेलेले गडी देखील दुपारी रिकाम्या हाताने घरी परतले. गडी माणसांसह घरातील सर्वांचे भोजन उरकले आणि सर्वांनीच थोडा वेळ आराम केला.

थोड्याशा वामकुक्षीनंतर सर्वांनी चहा घेतला आणि शंकर भटजींनी एक विडी शीलगावली. त्यानंतर काही क्षणातच देवाचे नामस्मरण करून, “ चला उठा सर्वांनी, दाखवा मला तो पायरीचा दगड ” असे म्हणत शंकर भटजी गड्यांबरोबर चालू लागले. आम्हाला आठ जणांना सर्व ताकद पणाला लावून जो दगड हलला नाही, तो आता शंकर काका कसा काय हलवणार ? याबाबतचे कुतूहल गड्यांना वाटत होते. शंकर काका भेल्याजवळ गेले आणि त्यांनी त्या काळ्या पाषाणाला हात लावून नमस्कार करत प्रार्थना देखील केली. उपस्थित सारेच शंकर काकांच्या या कृतीकडे आश्चर्याने पाहत होते. काही वेळातच शंकर काकांनी हा काळा पाषाण हलवला आणि सर्वांचीच बोलती बंद केली. सर्वांनी मिळून हा काळा दगड उचला आणि माझ्या खांद्यावर द्या. मी एकट्याने घेऊन जातो, असे शंकरकाका म्हणाले आणि खरोखरच सर्वांनी मिळून हा दगड उचलून शंकर काकांच्या खांद्यावर दिला.

भेल्याच्या झाडाजवळून तडक ते, न दमता, त्यांचे पाय न लटपटता थेट पडवीत आले आणि त्यांनी तेथे तो दगड ठेवला. शंकर काकांची ही कृती पाहून सर्वांनी आश्चर्यचकित होत अक्षरशः तोंडात बोटं घातली . त्यांच्याकडे एवढी ताकद कोठून आली ? याचे कोडे कधीच कोणाला उलगडले नाही. त्यांच्या नावात शंकर असल्याने साक्षात शंभू महादेव त्यांच्या मदतीला धावले की काय ? अशी शंका आमच्या घरातील सर्वांनाच आली. पडवीतून ओटीवर जाताना असणारा पायरीचा हा काळा भला मोठा दगड त्या दिवसापासून सतत माझ्या डोळ्यासमोर उभा राहू लागला. माझे मन त्या काळापर्यंत पोहोचवून हा प्रसंग कसा काय घडला असेल ? याची कल्पना करत, या विषयावर लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न आपल्यासमोर ठेवला आहे.

ओटीवर जाणारी आमची पायरी खरोखर किती भाग्यवान असेल, असे मला त्या दिवसापासून दररोज वाटू लागले. एखाद्या प्रसंगाच्या मागे, किती मोठे रहस्य असू शकते ? हेच मला यातून कळले. पूर्वीच्या काळी अशा अनेक गमतीदार आणि रहस्यमय घटना घडत असत. हे सारे समजण्यासाठी मात्र कुटुंबात अधून मधून एकत्र येणे आणि परस्परांजवळ मोकळा संवाद करणे खूप महत्त्वाचे ठरते. आमच्या आंबेड खुर्दच्या घरी अशी अनेक रहस्य दडली आहेत. ही सारी रहस्य जाणून घेऊन त्यावर लिहिण्याचा मी भविष्यात नक्कीच प्रयत्न करणार आहे. एखाद्या घटनेमागील रहस्य जाणून घेतल्यानंतर, आपल्या भावना त्यामध्ये गुंतत जातात. पायरीच्या दगडाबाबत माझ्या भावना अशाच गुंतून गेल्या आहेत. शंकरकाकांना वंदन !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading