उरावर नाच
नाच बाबा नाच, जोशात नाच
फसवणाऱ्यांच्या उरावर नाच
लुबाडणाऱ्यांच्या उरावर नाच
महिन्याला मिळतो लठ्ठ पगार
मागती सारे काही उधार उधार
भागत नाही यांची अघोरी भूक
कशाने मिळेल यांना खरे सुख?
टेबलाखालून खाती रोजच लाच
नाच बाबा नाच……
मागती मते बळे खाली वाकून
करती सारे काही तरी झाकून
देती लोकांना वचने खोटीनाटी
सारे काही चाले यांचे सत्तेसाठी
होतीच गायब पुढची वर्षे पाच
नाच बाबा नाच……
विकती बियाणी सगळी खोटी
बँकेत जमते माया मोठी मोठी
चालतो झोकात तरी काळा धंदा
खोऱ्यान ओढती बरे नगद चंदा
एक्सपायरी डेट पुन्हा पुन्हा वाच
नाच बाबा नाच……
रोजच टाकती रिकाम्या पाट्या
कामाच्या वेळी कपाळी आठ्या
वाचाया पुस्तक घरी नाही वेळ
बाहेर चालती मात्र नसते खेळ
शिकवायची नाही मुळीच आच
नाच बाबा नाच……
करती प्रवास हो बसून विमानी
फोडती गुपिते करून बेईमानी
करती लाचारी एका घोटापायी
चालते स्वार्थापायी भलती घाई
सत्याचा वाटतो नेहमीच जाच
नाच बाबा नाच……
लावती भांडणे जाती जातीत
बनती नेते महान एका रातीत
पाहती वाट झुंजती का कोणी
खातात बोके फुकटचे लोणी
जळावे दुसऱ्याचे घर हेतू हाच
नाच बाबा नाच……
जागा होशील का मतदार राजा?
हातात चाबूक घेना रे बळीराजा
विचार त्यांना वाटतात का लाजा
वाजव सगळ्यांचा चौकात बाजा
हिशोब पापांचा माग जन्मात याच
नाच बाबा नाच……
कवी – सदानंद पुंडपाळ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.