January 26, 2025
Need for awareness at the grassroot level against elephantiasis
Home » हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज
विशेष संपादकीय

हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज

भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर समस्येचा धांडोळा.

प्रा. नंदकुमार काकिर्डे,
पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार

जगभरातील समशितोष्ण प्रदेशात म्हणजे आफ्रिका, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका, भारत व चीन या देशांमध्ये गेल्या अनेक वर्षात लिम्फॅटिक फिल्यारियासिस म्हणजे ज्याला आपण हत्तीरोग म्हणतो त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. ज्याप्रमाणे भारत सरकारने पोलिओ तसेच देवींविरुद्ध अनेक दशके व्यापक मोहीम हाती घेऊन त्याचे समूळ उच्चाटन केले. त्याच धर्तीवर या हत्तीरोगा विरुद्ध व्यापक प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र त्याबाबतची जागरूकता सर्वसामान्यांमध्ये व तळागाळातील सर्व घटकांमध्ये त्याची माहिती देणे आणि त्याला वेळीच आळा घालणे हे अत्यंत आवश्यक आहे.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक तज्ञ डॉ.चंद्रकांत लहारिया व दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगातील तज्ञ डॉ. भूपेंद्र त्रिपाठी यांनी केलेल्या एका पाहणीनुसार आपण या दुर्लक्षित रोगाकडे खरेच दुर्लक्ष केले तर देशातील सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग होण्याचा गंभीर धोका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 51 टक्के पेक्षा जास्त हा आकडा असल्याने जनजागृतीसाठी त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. मुळामध्ये हत्तीरोग डासांमुळे होतो व पसरतो. एक प्रकारे हत्तीरोग परजीवी संक्रमणामुळे होतो. दोन वर्षांपूर्वी देशभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते.मात्र खूप प्रतिकूल आणि तुटपुंज्या सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा असतानाही आपण त्याच्यावर यशस्वीपणे मात करू शकलो. त्यामध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या कोव्हिशील्ड या लसीचा त्यात सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे हत्तीरोगाविरुद्धही आपण असाच लढा जास्त गंभीरपणे देण्याची गरज आहे.

देशाच्या काही राज्यांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागांमध्ये या हत्ती रोगाचा जास्त प्रादुर्भाव आहे. अनेक ठिकाणी त्याचा संक्रमण दरही जास्त आहे. बरेच लोक आयुष्यभर हा रोग घेऊन जगतात असे निदर्शनास आले आहे. या रोगामुळे फुफ्फुसांमध्ये तीव्र त्रास.जननेंद्रियातील वेदनादायक सूज, त्यामुळे येणारा ताप श्वासोस्वासामध्ये विविध समस्या निर्माण होत असल्याचे आढळले आहे.अनेक वेळा लठ्ठपणामुळे सुद्धाहत्ती रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याचे काही ठिकाणी आढळले आहे.एका माहितीनुसार भारतातत्वचेखालील लिम्फेटिक प्रणाली व तंतू यांना बोर्गीया माली व वुकेरेरिया बंकरोफ्टी नावाच्या परजीवींमुळे हा रोग जडतो. हा रोग कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष यापैकी कोणालाही तो प्रभावित करतो असे आढळलेले आहे. या रोगाची लक्षणे पाहायला गेले तर अनेक वेळा प्रासंगिक ताप,अंगाला कंप सुटणे, अंगदुखी, अंगावर सूज येणे व वेदनादायक लसिका गाठी शरीरावर निर्माण होणे,त्वचेचे विघटन होणे किंवा त्वचा जाड व कठोर बनतात. अनेकदा स्त्री-पुरुषांच्या हातापायावर ही सूज दिसते. रात्री मध्ये वारंवार खोकला येणे किंवा घरघर लागल्यासारखे वाटणे श्वसनहीनता, अशक्तता वजन कमी होणे, यकृताला सूज येणे अशी विविध लक्षणे आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन व्यक्तीची संबंधित व्यक्तीची हालचालीची व काम करण्याची क्षमता कमी होते.

भारतातील हत्ती रोगाचे दुसरे लक्षण म्हणजे तो गरीब लोकांना तसेच तळागाळातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर बाधित करतो असे लक्षात आलेले आहे. ज्याप्रमाणे डेंग्यू किंवा मलेरियाची लक्षणे लगेच दिसून येतात तशी या हत्ती रोगाची लक्षणे लगेचच लक्षात येत नाहीत व जवळजवळ दहा-पंधरा वर्षांनी त्याची त्याचा उद्रेक झालेला जाणवतो. जागतिक आरोग्य संघटनेने सन 2000 मध्ये या हत्तीरोगाविरुद्ध जागतिक मोहीम हाती घेतली होती व पुढच्या सात-आठ वर्षात म्हणजे 2030 पर्यंत हत्ती रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे. भारतानेही गेली दोन दशके त्यावर व्यापक जनजागृती व परिणामकारक औषधांचा प्रसार हाती घेतला आहे. आपण तर पुढील चार वर्षातच त्याचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे परंतु त्यातील बाधित लोकांची संख्या लक्षात घेता यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज आहे.चालू वर्षात आपण पाच प्रमुख गोष्टींवर त्याचा भर दिलेला आहे त्यात व्यापक प्रमाणावर औषधांचा वापर करणे ज्याला मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात त्याचा मोठा भाग आहे.त्यासाठी विशिष्ट औषधांचा वर्षातून किमान एकदा वापर करूनकरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.यामुळे हत्तीरोगाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. पोलिओ प्रमाणे प्रादुर्भाव झालेल्या प्रदेशातील व्यक्तींना दोनदा डोस दिले जातात.या रोगामुळे निर्माण होणारे अन्य रोगांचे व्यवस्थापन( मॉरबिडीटी मॅनेजमेंट),तसेच अपंगत्व प्रतिबंधासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात केलेल्या परिणामकारक उपाययोजनांमुळे आपणही या हत्ती रोगाच्या उच्चाटनाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत.मात्र देशातील एकूण बाधित लोकांचा आकडा पाहता व आजवरचा या सार्वजनिक आरोग्य सेवेचा अनुभव लक्षात घेता पोलिओ प्रमाणेच अत्यंत प्रभावी औषध देण्याची योजना अमलात आणली पाहिजेशास्त्रीय दृष्ट्या भारत देशातून अन्य रुग्णांप्रमाणेच या हत्तीरोगाचे समोर उपचार होण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.10 ऑगस्ट पासून विविध ग्रामीण भागातील जागरूकता व समस्यांचे निराकरण मोहीम हाती घेतली आहे.मात्र देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत या रोगाची लक्षणे त्यावरील उपाययोजना याची माहिती पोहोचवली तर त्याचे निर्मूलन शंभर टक्के यशस्वी होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading