September 9, 2024
sagalech-rutu-dagabad-kavita-nanvare-book-review
Home » सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती
मुक्त संवाद

सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती

सगळेच ऋतू दगाबाज हा कविता ननवरे यांचा कवितासंग्रह वर्तमान वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर धरतो. त्यांची कविता अनुभवाच्या व्यामिश्रतेला पुऱ्या ताकदीनिशी भिडते. त्यामुळे हा संग्रह मराठी काव्यप्रवाहात आपली ओळख मिळवेल आणि आपलं स्थानही निर्माण करेल अशी खात्री आहे.

 ऐश्वर्य पाटेकर

आपल्या चिंतन जाणीवा अतिशय प्रखर आणि स्पष्ट असलेली, आपल्या कवितेला स्वतंत्र आणि ठसठशीत व्यक्तिमत्व बहाल करणारी आपल्या भूमिकेपासून कुठल्याही दबावाला न डरता तसूभरही न हलणारी. आपली भाषा आपल्या करारावर घडवणारी व्यवस्थेच्या आणि प्राप्त परिस्थितीच्या झिट्या धीटपणे धरणारी एकमेव कवयित्री मराठी वाड्मय प्रवाहात होऊन गेली; ती म्हणजे कविता महाजन. तितक्याच तीव्र आवाजात आपलं म्हणणं काळाच्या दगडावर छिन्ही हातोड्याने ठोकत अतिशय खमकी कवयित्री वाड्मयीन प्रवाहात ‘सगळेच ऋतू दगाबाज’ नावाचा संग्रह घेऊन दाखल झाली आहे. नव्हे व्यवस्थेला थपडा देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्या कवयित्रीचं नाव कविता ननवरे.

‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवयित्री कविता ननवरे यांचा पहिलाच कवितासंग्रह असूनही त्यात नवखेपणाच्या खुणा जाणवत नाहीत. त्या जाणवू नये म्हणून तिने पुरेशी खबरदारी घेतली आहे. कवीला असणारा भाबडेपणाचा शाप तिने सपशेल भिरकाऊन दिला आहे. ते करताना आपल्यातल्या कवीला धक्का लागू नये म्हणून आपल्या संवेदनशीलतेला सतत जागतं ठेवलं आहे. बिघडलेल्या समाज व्यवस्थेची दुरुस्ती करण्याचं हत्यार कविताच आहे हे ती पुरतं जाणून आहे. शिवाय मानवी जीवनातून गहाळ झालेल्या जीवनमूल्यांचा तपास कविताच करू शकते या आपल्या विचारावर ती ठाम असल्याने तिची कविताच धारदार झाली आहे. आपल्या प्रतिमा प्रतीकांच्या जोरावर वर्तमान वास्तवाचा तळ तिने अक्षरश: ढवळून काढला आहे. तो काढताना आपल्या कवितेच्या आशयाचं सूत्र ती जराही हलू देत नाही. आशयाच्या पकडीत घट्ट धरून ठेवलेला शब्दांचा कासरा ती जराही सैल होऊ देत नाही. ती तिच्या तऱ्हेनं आपलं म्हणणं मांडून मोकळी होते. म्हणूनच तिची कविता अस्सल तर उतरतेच, पण कवितेतील शब्द आपण जराही इकडे तिकडे करू शकत नाही, अशी फटच तिने ठेवली नाही. आता ही कविताच उदाहरणादाखल पाहा. वर वर समंजस जाणीव पेरत गेलेली ही कविता, शेवटात खाडकन् आवाज करत आपल्या हातात असे काही ठेवते की आपण त्या कवितेत गुंतून पडतो.

आपण कवी आहोत याचं सतत भान असलं तरच त्याच्या हाताला काहीतरी मोलाचं लागत असतं. कविता ननवरे मधला कवी- हो कवीच! कवी आणि कवयित्री अशी सरळ सरळ स्त्रीलिंगी अन् पुलिंगी विभागणी आपण करीत असतो आपल्या सोयीसाठी. पण अशी विभागणी कविता ननवरेची कविता तपासताना गैरलागू आहे असे माझे स्पष्ट मत आहे. अनुभवाला आपण साच्यात टाकू पाहातो, पण ती संधी कविता ननवरे जराही घेऊ देत नाही. तिचा एक विशेष सुरुवातीलाच मला नोंदवावा लागेल, तो म्हणजे स्त्रीवादाचे अंगडे टोपडे ती तिच्या कवितेला चढवत नाही. म्हणजे तिच्या कवितेत स्त्रीवाद आला नाही असे नाही! तो आलाय. पण उगाच ती त्याचे लाडकोड पुरवत नाही. म्हणूनच निखळ स्त्रीवादी वर्गणीकरणात तरी तिची कविता टाकताच येणार नाही. तिची कविता एकांगी नाहीच! तुम्ही तसे करायचे ठरवल्यास, तिचीच एकपान आड येणारी कविता तुम्हाला तसं करण्यापासून अडवेल. याचे मुख्य कारण काय असेल तर ती सर्वहाराच्या जीवनजाणिवांना सरळ सरळ भिडते. तसे भिडल्यामुळे तिची कविता व्यापक आशय शब्दांच्या चिमटीत पकडणारी झाली आहे. मग तिची प्रेम कविता असू दे नाहीतर स्त्रीदु:ख, स्त्रीशोषणाची जाणीव असू दे!

पोरी..
तू टाकतेस बुलेटवर टांग
उधळतेस वारा प्यायलेल्या जनावरासारखी
तू ढुंकूनही पाहात नाहीस स्पीडब्रेकरकडे
तू फुंकतेस सिगारेट भररस्त्यात रिचवतेस पेगवर पेग
सकाळी बाहेर पडलेली तू
कधीच परतत नाहीस सातच्या आत घरात..

या कवितेचा शेवट पाहण्यासारखा आहे-

पण

पोरी एक ध्यानात घे
जरी तू राहिलीस उभी सनातन वाटांच्या
छाताडावर पाय ठेवून मुजोरपणे
तुझ्याआत खोलवर भिनवलंस
बेफिकीर नादान पुरुषीपण.
कापलास गळय़ातील काचणारा दोर
पण अजूनही नाही होता आलं तुला
स्वत:च स्वत:चा मोर.

आता ही कविता तपासताना या कवितेत स्त्रीवाद आला का? तो किती प्रमाणात आला? या गोष्टीच मला फजूल वाटतात. कवीला मुळातून असे काही चष्मे लावून तपासूच नये. त्याची कविता किती अस्सल उतरली आहे. त्याने अनुभवाला कशा पद्धतीने समोर ठेवले आहे. त्याच्यातल्या कवितेची कमी अस्सल प्रत शोधावी लागते. हा अनुभव विधानात्मक आहे. जेव्हा एखाद्या कवितेत विधानामागून विधाने येऊ लागतात तेव्हा त्यातील कवितेला धोका निर्माण होऊन कवितेतून आशयच हरवून जाण्याची शक्यता असते. पण कविता ननवरेचं कौतुक मला यासाठीच आहे की, विधानांच्या डोलाऱ्यावर कविता उभी राहूनही तिच्यातील कवितापण जराही बाजूला सरकू दिलेलं नाही. हे तिने नक्कीच ठरवून केलेले नाही, त्यामुळेच इतकी नितांत सुंदर कविता तिच्या हातून लिहून झाली. दर कवितेपाशी ती रसिकवाचकाला विस्मय चकित करून सोडते. तिने मांडलेले अनुभव फार वेगळे आहेत असे नाही, ते परंपरेतूनच आले आहेत. त्या अनुभवांना तिने आपला हवा तसा चेहरा दिल्याने ती कविता फक्त कविता ननवरेची ठरली. यात तिच्या कवितालेखनाचं यश सामावलेलं आहे असे मला वाटते.

‘‘जो आत्महत्या करत नाही तो कवीच नाही.’’
एक कवीमित्र म्हणाला,
‘‘कवी आत्महत्येची तयारीच तर करत असतो कवितेतून.’’
दुसऱ्याने पहिल्याची री ओढली
तिसरा आधीच्या दोघांना दुजोरा देत तत्त्वज्ञानी आवेशात म्हणाला,
‘‘कवीची प्रत्येक कविता ही त्याची आत्महत्या पोस्टपोन करत असते.’’

अतिशय आशयघन संवादावर उभी राहिलेली ही कविता दर संवादात ‘एक स्वतंत्र’ कविता म्हणून उभी राहते. ही संपूर्ण कविताच अभ्यासण्यासारखी आहे. पण इथे जागेची मर्यादा असल्याने मला ती अर्ध्यात सोडावी लागते, मात्र तिचा शेवट तुमच्यासमोर ठेवल्याशिवाय मला राहवणार नाही.

‘मला भीती वाटत नाही
कवी करतील आत्महत्या नजिकच्या काळात
एकेकटय़ाने अथवा सामूहिक
मला फक्त लिहायचीय कविता
कवींच्या आत्महत्येवर शेवटची
जिची सुरुवात असेल
‘रेस्ट इन अ पोएम
ओह पोएट ! रेस्ट इन अ पोएम.’

आता असा अनुभव जर तिच्यातला कवी मांडत असेल तर तिला कुठल्या वर्गवारीत टाकणार? तिच्या कवितेखाली नाव न टाकता जेव्हा आपण प्रश्न करू की ही कविता स्त्रीने लिहिली आहे की पुरुषाने साहजिकच आपले अंदाज चुकतील. म्हणून मुळातून कवी हा जसा जातीपातीच्या वरती उगवून आलेला असतो त्यास आपण जातीचं लेबल लावतो. तसंच लिंगभेदाच्या वरतीच उगवून आलेली असते, हे कविता ननवरेच्या कवितेच्या अनुषंगाने ठासून सांगता येते.

या कवितेतील प्रतिमांचं निराळेपण डोळ्यात भरणारं आहे. कविता खरी तपासायची असते ती तिच्या प्रतिमांच्या मांडणीत. तिथे खरा कवी ओळखता येतो. कविता ननवरे यांच्या कवितेत ज्या प्रतिमा आल्या त्यांनी कविताच्या कवितेला स्वतंत्र चेहरा देण्यास मदत केली आहे. उदा. ‘शत्रूशी हातमिळवणी करणारा दिवसाचा क्षण’, ‘क्षणाक्षणांवर गोंदवलेलं अवहेलनेचं दुखरं गोंदण’, ‘चहुबाजू पसरलेला स्वप्नांच्या प्रेतांचा खच’, ‘दगाबाज होणारे ऋतू’, ‘अगणित गर्भपातांचं थारोळं’, ‘फासावर लटकवलेला धूडासारखा लोंबकाळणारा चार्जर’, ‘हव्याहव्याशा जिवलग प्रियकरासारखा अंधार’ ‘बाईपणावरचा वाझोंटा ढग’, ‘विझलेल्या स्वप्नांच्या अर्धवट जळालेल्या वाती’, ‘अगणित स्वप्नभ्रूणांचे हिशेब’, इत्यादी. अशा कितीतरी प्रतिमा कविता ननवरेच्या कवितेत येतात त्या स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करतात.

कविता ननवरे यांची कविता वर्तमान वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर धरते. अनुभवाच्या व्यामिश्रतेला पुऱ्या ताकदीनिशी भिडते. त्यामुळे हा संग्रह मराठी काव्यप्रवाहात आपली ओळख मिळवेल आणि आपलं स्थानही निर्माण करेल अशी खात्री आहे.

पुस्तकाचे नाव – ‘सगळेच ऋतू दगाबाज’
कवयित्री – कविता ननवरे
प्रकाशक – शब्द पब्लिकेशन,
पाने- ११२, किंमत- १९५ रुपये.
पुस्तकासाठी संपर्क – 9820147284


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शिकली सवरली..

डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading