आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते झाले. कादंबरीद्वारे तेजस्वी व्यक्तीमत्वाचा आलेख घोणसरे येथील लेखिका नीला विवेक नातू यांनी मांडला आहे. या निमित्ताने या कादंबरीबद्दल स्वतः लेखिकेचे मनोगत…
रामशास्त्री प्रभुणे म्हणतात, की (त्याकाळी) न्याय व्यवस्थेत स्त्रियांना विशेष शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे करणाऱ्या लोकांनी आनंदीबाईंचे नाव पुढे करून आपापल्या माना सोडवून घेतल्या आहेत. मराठी रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे हे मत वाचनात आले अन ‘ध’ चा ‘मा’ केला असा शिक्का बसलेल्या आनंदीबाईंवर अन्याय झाल्याची जाणीव झाली. आनंदीबाई या कादंबरीतून कोकणातल्या तेजस्वी माहेरवाशीणीवर लागलेला कलंक काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान मात्र मला मिळाले आहे.
आनंदीबाई म्हणजे ‘ध’ चा ‘मा’. त्या पलिकडे आपल्याकडे इतिहासाचे पान सरकत नाही. तरीही प्रकाश देशपांडे यांनी आनंदीबाईवर लिहा असे सांगितल्यापासून हा विषय डोक्यात घोळत होता. त्यानंतर आनंदीबाईबद्दल वाचन करण्याचा सपाटा सुरू केला आणि जसजशी ऐतिहासिक कागदपत्रे, आनंदीबाईंची अस्सल पत्रे, पेशव्यांचा इतिहास, रियासतीचे खंड असे वाचू लागल्यानंतर आनंदीबाई डोक्यात आकार घेऊ लागल्या. त्यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर झाले. त्यातील काही धक्कादायकही होते. ते तसे का झाले वा करुन देण्यात आले याची संगती वाचन करत असताना लागत गेली आणि आनंदीबाईंविषयीचे वेगळेच चित्र तयार झाले.
अत्यंत हुशार, चतुर, देखण्या, पेशवे घराण्याची काळजी करणाऱ्या, सर्वांशी नातेसंबंध जोडून पेशवाईला जात असलेले तडे बुजवण्यात पुढाकार घेणाऱ्या, वेळप्रसंगी राघोबा दादांना समजावणाऱ्या आणि त्याचवेळी व्यक्तिगत आयुष्यात पतीकडून दुर्लक्ष, वेळप्रसंगी दुय्यम वागणूक, सत्ताकारणात रक्ताच्या नातेसंबंधीयांकडूनच निर्माण केलेले संशयाचे वलय, पोटच्या दोन मुलांचा मृत्यू, नानासाहेब पेशव्यासारख्यांकडून मिळालेली दुय्यम वागणूक आणि अखेरच्या काळात नजरकैदेत दिवस काढावे लागले. पोटच्या मुलीनेही संपर्क केला नाही यासह आयुष्यभर ‘ध’ चा ’मा’ करणारी म्हणून शिक्का बसला तो कायमचाच. त्यानंतर बदनामी वाट्याला आली. पुरुषसत्ता समाजाने न्याय तर दिला नाहीच उलट त्यांच्या बाई असण्याची ढाल करुन केलेल्या कारवायाचा बट्टा मात्र आनंदीबाईच्याच नावावर लागला. ही त्यांची सारी कहाणी अभ्यासल्यावर एक वेगळेच तडफदार, हुशार स्त्रीचे व्यक्तिमत्व समोर साकार झाले. त्यामुळे त्यांच्यावरच लिहावयाचे ठरविले.
अक्षर तपासले नाही
नारायणराव पेशवा याला पकडायचा होता. ठार मारायचा नव्हता. मात्र तो मारला गेल्यावर ठपका आनंदीबाईंवर ठेवला गेला आणि त्यांनी ‘ध’ चा ‘मा’ केल्याचे सांगून इतिहास तसाच लिहिला गेला. मोडी लिपिमध्ये ‘ध’ चा ‘मा’ करता येत नाही आणि बाळबोधीत म्हणजे तत्कालिन मराठीत लिहिताना ‘ध’ चा ‘मा’ करणे तितकेसे सोपेही नाही. माझे हस्ताक्षर तपासून पाहिले नाही असे एक प्रकारचे आव्हानच तिने न्याय यंत्रणेला दिले. अक्षर तपासले नाही म्हणजेच पुरावा योग्य तऱ्हेने न करता तिच्यावर ठपका ठेवण्यात आला.
आनंदीबाईंना स्वकियांनीही फसवले अथवा ती बाई असल्याचा फायदा घेत, तिला पुढे करीत आपल्या कुटिल कारवाया तडीस नेल्या. त्यामुळेच ज्याला पकडायचा त्या नारायणरावाला ठार मारला गेला, ज्यांचे हे इप्सित होते त्यांनी ते साध्य केले आणि बळी मात्र आनंदीबाईचा दिला. तत्कालीन पुरुषसत्ताक पद्धतीचाही आनंदीबाई बळी ठरली, ती खलनायिका निश्चित नव्हती. नायिका होती की नाही, याची साक्ष इतिहास ठसठशीतपणे देत नाही; मात्र इतिहासात रंगविल्यापेक्षा आनंदीबाई कितीतरी वेगळी होती, असा निष्कर्ष माझ्या अभ्यासातून निघाला.
या कादंबरीचा पट लक्षात घेऊन इतर पात्रेही आली आहेत. तिच्या आयुष्यातले अनेक दुवे जोडताना मी काही प्रमाणात स्वातंत्र्य घेतले असले तरी ते इतिहासाशी इमान राखूनच घेतले आहे. मस्तानीनंतरची ती सर्वांत देखणी स्त्री असाही उल्लेख आनंदीबाईंबद्दल आहे. ऐतिहासिक घटना आणि पुरावे यांच्यापासून कोठेही फारकत घेतलेली नाही, असा माझा दावा आहे.
पेशवे घराण्याचे दप्तर आणि ऐतिहासिक कागदपत्रे तपासताना चिकाटीची कसोटी लागली. ती पाने इतकी जीर्ण झाली आहेत की, उलटतानाही फाटतात. त्यामुळे प्रत्येक पानाचा फोटो काढायचा, त्यातील हवे ते ठेवायचे आणि नको ते डीलिट करायचे, अशा तऱ्हेने आवश्यक ऐतिहासिक मजकूर गोळा केला. मराठा कालखंडावरती केलेले लेखन, वाचून टिपणे काढली. आनंदीबाईवर स्वतंत्र मोठ्या प्रमाणावर लिखाण झालेले नाही. त्यामुळे ते संदर्भ मिळवताना यातायातच करावी लागली. चार वर्षांच्या लिखाणाच्या कालावधीत ज्या ज्या ठिकाणापर्यंत पोहोचणे शक्य आहे तेथपर्यंत अगदी कोपरगावच्या वाड्यापर्यंत मी जाऊन आले.
पेशवे दप्तर वाचताना भाषा सापडली
ऐतिहासिक कागदपत्रांच्या दुसऱ्या वाचनानंतर आनंदीबाईंवर काय लिहायचे ते सापडले. त्या काळातील भाषा कशी असेल, याबाबत डोक्यात निश्चित काही ठरत नव्हते; मात्र साधनांच्या वाचनकाळात पेशवे दप्तरात ही भाषा सापडली. त्याच्यानंतर तेथील भाषा, विशिष्ट शब्द, वाक्यरचना, पात्र आणि त्या पात्रांची विशिष्ट भाषा समोर आली. तत्कालीन व्यवहारात आणि मराठीत सहजपणे वापरले जाणारे दीडशे फारसी शब्द वापरले आहेत; मात्र सध्या ते वापरले जात नाहीत. पेशवे दप्तराचे बारा खंड तपासताना हे शब्द समजावून घेऊन त्याचे अर्थही समजावून घेतले आणि मगच त्यांचा वापर केला.
नाना फडणवीसांकडूनच छळ
नजरकैदेत आनंदीबाईंसह तिघांचाही छळ झाला. त्यांना उपाशी ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांनी पत्र लिहून उपाशी मरण्यापेक्षा आम्हाला विष द्या, असा निरोप लिहिला होता. कोपरगावला नजरकैदेत त्या असताना त्यांची मुलगी दुर्गा आईला भेटायलाही गेली नाही, याचे दुःख तिने भोगले. तिचा मुलगा दुसरा बाजीराव त्याचे शिक्षणच होऊ दिले नाही. तो जाणीवपूर्वक अडाणी ठेवला गेला याची जाणीव आणि खंतही तिला आहे. नाना फडणवीसांकडूनच छळ झाल्याचा इतिहासाचा दाखला आहे.
आनंदीबाईंचे हे मोठे दुःख आहे.
आनंदीबाई अत्यंत हुशार ,चतुर आणि दूरचे बघणारी स्त्री होती. संक्रांतिनिमित्ताने तीळ शर्करा पाठवून “फिरांग्यांशी सलूख नको..तुमची अटकेपर्यंत तळपणारी तलवार आता इतिहासजमा झाली कि काय ?” असे खोचकपणे मुलगा दुसरा बाजीराव याचे नावाने पत्र लिहून ती पतीला जाब विचारते. तो ऐकत नाहीसे पाहिल्यावर इंग्रज घरात येतोय तेव्हा काहीही करा, माझ्या नवऱ्याच्या कलाने कसे घ्यायचे ते ठरवा, पण ही फिरंगी ब्याद दौलतीत येऊ देऊ नका, असे ती सखाराम बापू यांना कळवळून लिहिते आहे. इतकी नजर तेव्हा किती मुत्सद्दी म्हणवले गेलेल्यांकडे होती? असा सवाल नीला नातू यांनी केला. त्याकाळी सवत ही गृहीत धरायची अशी या स्त्रियांची मनोभूमिका दिसते. पण तरीही आनंदीबाईने राघोबांच्या बेचाळीस नाटकशाळा (रक्षा) सहन केल्या. त्याचे वागणे तिला कमालीचा मनस्ताप देणारे होते हे तिच्या पत्रांवरून दिसते. राघोबादादा बायकोच्या मुठीत नव्हता. अत्यंत चंचल वृत्तीच्या या बेभरवशी नवऱ्याबरोबर संसार करणे हे खरोखर सतीचे वाण शेवटपर्यंत तिने निभावले.
हे पुस्तक जरी आनंदीबाईंबद्दल असले तरी रघुनाथराव हे पेशवे घराण्यातील खासे माणूस. त्यामुळे रघुनाथरावांबद्दल लिहिलेच पाहिजे. तसेच ओघाने येणाऱ्या पेशवे घराण्यातील इतर पात्रांबद्दल लिहिणे गरजेचे वाटले. त्यामुळे काही घटना, काही प्रसंगांची संगती लावता येणे शक्य होईल. त्यामुळे आनंदीबाईंना समकालीन आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीं, त्यांच्या आपसातील नातेसंबंधाबद्दल प्रसंगानुरूप लिहिले. या घटना त्यावेळचे राजकारण माहिती झाले तरच राघोबा व आनंदीबाई यांच्या मनस्थितीचा आणि वागण्याचा अर्थ कळतो.
कोकणातल्या तीन माहेरवाशिणी
कोकणातल्या तीन माहेरवाशिणी इतिहासात प्रसिद्ध आहेत. सर्वात अलीकडची झाशीची राणी. ही तर ध्रुवताऱ्याप्रमाणे इतिहासात कायम तेजाने लखलखत राहील. तिच्या काही काळ आधीची आनंदीबाई. हिच्या वाटेला आली फक्त आणि फक्त बदनामी. तिच्याही आधीची येसूबाई संभाजीराजे भोसले. हिचे सुरुवातीचे आयुष्य शिवछायेत गेले. संभाजी राजेंना औरंगजेबाने आत्यंतिक क्रूरपणे मारले गेले. येसूबाईचे पुढचे सगळे आयुष्य लहानग्या शाहू समेवत औरंगजेबाच्या कैदेत गेले. औरंगजेबाच्या मृत्युनंतर तिचा पुत्र शाहू छत्रपती झाला तरीही तुरुंगातच होती. या तिन्ही स्त्रिया दुर्दैवीच म्हणाव्या लागतील.
पुस्तकाचे नाव – आनंदीबाई रघुनाथराव
लेखिका – नीला विवेक नातू, संपर्क – 84128 84321
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे
किंमत – ४८० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 84128 84321
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.