February 22, 2024
The feeling of love in the Gita is enlightening
Home » गीतेतील प्रेमाची अनुभुतीच ज्ञानी बनवते 
विश्वाचे आर्त

गीतेतील प्रेमाची अनुभुतीच ज्ञानी बनवते 

तैसी भक्ता गीतेसी । भेटी करी जो आदरेसी ।
तो देहापाठी मजसी । येकचि होय ।। १५१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपातानंतर मद्रुपच होईल.

आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असते. त्यांचे हे नाते अतुट असते. असे नाही की ती आई जन्माने त्या मुलाची आई असायला हवी. जन्माने नसणाऱ्या मातेच्या प्रेमाच्या नात्याची अनेक उदाहरणे देता येतील. देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला अन् गोकुळात यशोदेने कृष्णाला वाढवले. यशोदा आणि कृष्णाच्या प्रेमाने गोकुळात सुखाचा सागरच निर्माण झाला होता. प्रेम कधी कोणावर होईल ? कसे होईल ? सांगता येत नाही. प्रेम हे सांगून किंवा ठरवून होत नसते. ते असावे लागते. आंतरिक ओढ असावी लागते.

आपणाला आपला गाव किंवा जुने घर सोडताना मन भरून येते. असे का होते ? कारण त्या मातीशी, त्या वास्तूशी आपले नाते जुळलेले असते. त्या वास्तूने आपणास प्रेम दिलेले असते. ती वास्तू अचल, अबोल असली तरीही ती वास्तू आपणाशी एक नाते निर्माण करते. ते नाते प्रेमाचे असते. कित्येक वर्षे शहरात राहून गावाकडे गेल्यावर त्या वास्तूतील प्रेमाच्या आठवणी आपणास प्रोत्साहित करतात. म्हणजेच निर्जीव वास्तूतही प्रेम करण्याची ताकद आहे. ही प्रेमाची अनुभुती आपण अनुभवायला हवी. गीते वरील प्रेम म्हणजे पुस्तकावरील प्रेम आहे. हे पुस्तक निर्जीव जरी असले तरी त्यातील प्रेमाचे शब्द आपल्यामध्ये उर्जा निर्माण करतात हे विसरता कामा नये. ही उर्जा अनुभवायला हवी. याचा बोध घ्यायला हवा.

आईच्या प्रेमाने महान व्यक्तीमत्वे घडतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आईच्या प्रेमाची चादर अंगावर असेल तर कितीही समस्यांची थंडी पडली तरीही त्यावर मात करण्याचे सामर्थ्य त्या मायेच्या उबीमध्ये असते. मायेची उबच यशाचे मोठे शिखर गाठण्यास प्रोत्साहित करते. प्रेमाचे चार शब्दच मनातील सर्व दुष्ट विचार दूर करू शकतात. इतकी प्रेमाच्या शब्दाची ताकद आहे. सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राच्या शब्दातही हीच ताकद आहे. यासाठी मंत्राच्या शब्दाचे प्रेम अनुभवता यायला हवे. तरच त्या शब्दाची ताकद समजू शकेल. त्या शब्दांचे सामर्थ्य अनुभवाला येईल. शब्दाची साधना ही प्रेमाने करायला हवी. यातून मिळणारे प्रेम अनुभवायला हवे. ते प्रेमच ज्ञानाचा सागर असते त्यात डुंबायला शिकावे.

ज्ञानेश्वरी, गीता हे ग्रंथ अनुभवायचे आहेत. एकातरी ओवीची अनुभुती यायला हवी. माऊलीच्या ओव्यातून ओसंडून वाहणारे प्रेम अनुभवायला हवे. हे प्रेमच आपणास सामर्थ्य देते. बलवान बनवते. आत्मज्ञानी करते. पाणी गरम आहे की थंड, हे पाहण्यासाठी त्या पाण्याला स्पर्श करावा लागतो. तसे गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा स्पर्श मनाला झाला, तरच त्या ओव्यातील प्रेमाची अनुभुती होईल. ते प्रेमच मग आपणास आत्मज्ञानाकडे, अमरत्वाकडे नेते. यासाठी त्या प्रेमाची अनुभुती घ्यायला हवी. प्रेमाने त्यात डुंबायला हवे.

Related posts

विक्रमी ऊस उत्पादनासाठी…

पर्यावरण संवर्धनाचे आदर्शवत उपक्रम

…यासाठीच अंतःकरणास घालायला हवी शपथ

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More