September 19, 2024
P K Ghanekar comment on Durgjidnyasa book
Home » दुर्गजिज्ञासाबद्दल दुर्ग अभ्यासक प्र. के.घाणेकर म्हणाले…
गप्पा-टप्पा

दुर्गजिज्ञासाबद्दल दुर्ग अभ्यासक प्र. के.घाणेकर म्हणाले…

सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची ‘दुर्गजिज्ञासा’ हे श्रीमान प्रदीप संजय पाटील लिखित पार्श्व पब्लिकेशन या कोल्हापूरच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला ४४४ पानांचा व अनेक रंगीत प्रकाश चित्रे (फोटो) असणारा ग्रंथ नुसता चाळला, तरी त्याच्या लिखाणासाठी घेतलेल्या कष्टांची कल्पना येते.

मराठी मधील दुर्ग साहित्याची परंपरा सुमारे शे-सव्वाशे वर्षांची. अनेक गडकोटांची माहिती एका पुस्तकात देणे आणि एकाच किल्ल्यांची अधिक तपशीलवार माहिती पुस्तकात असणे, असे दोन प्रकार सुरुवातीच्या गडसाहित्यात दिसतात. कालांतराने त्यात काही बदल होत गेलेले दिसतात. एका विशिष्ट भूभागातील (उदाहरणार्थ:- एखादा जिल्हा) किंवा भुईकोट-जलदुर्ग अशा एकाच प्रकारच्या पण अनेक जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांची माहिती देणे, हा एक नवाप्रकार रूढ होत गेला. या वेगळ्या आणि दुर्ग साहित्यात मोलाची भर टाकणारी काही पुस्तके प्रकाशित होऊ लागली. त्यामध्ये एखाद्या किल्ल्याची माहिती देताना तिथे घडलेला एखादा समर प्रसंग अधिक विस्ताराने देणे उदाहरणार्थ:- कॅप्टन ग. वा. मोडक लिखित प्रतापगडचे युद्ध किंवा संबंधित किल्ल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ देऊन माहिती अधिक समृद्ध करणे. उदाहरणार्थ:- प्रा. डॉ. ग. ह. खरे – स्वराज्यातील तीन दुर्ग, शांताराम विष्णू आवळसकर – रायगडची जीवनगाथा इत्यादी

या व्यतिरिक्त किल्ल्यासंबंधी एखादा पैलू घेऊन त्या आधारे केलेले लिखाण उदाहरणार्थ: डॉ. मंदार दातार – महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील वनस्पती, श्री.बाळा बेंडखळे – भुयारे.

विज्ञानातील प्रगतीमुळे अनेक नवनवीन उपकरणे हाताशी आल्यामुळे गड इतिहासाबरोबरच त्यांचे अचूक सर्वेक्षण करून तयार केलेले प्रमाणबद्ध नकाशे पुस्तकात समाविष्ट करणे उदाहरणार्थ: महेंद्र गोवेकर – नकाशातून दुर्गभ्रमंती. श्रीमद रायगिरी आणि रायगड बालेकिल्ला ही गोपाळराव चांदोरकर यांची दोन पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

प्रदीप पाटील त्यांच्या ग्रंथात यातील अनेक वैशिष्ट्य पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्यावर अनेक वेळा जाऊन त्या किल्ल्याची माहिती, अनेक इतिहास प्रसंग, किल्ल्यावरील वास्तूंची मोजमापे घेऊन तयार करण्यात आलेले नकाशे, संदर्भग्रंथांची यादी असं खूप काही या एकाच पुस्तकात एकत्रितरित्या मिळतं म्हणूनच हे एक आगळ वेगळं नी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक झाल आहे. प्रदीप यांनी फक्त सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांबाबत असं केलेलं हे ग्रंथलेखन दुर्ग साहित्याला एक नवी दिशा देणारे ठरले आहे. फक्त ही सारी मोजमाप सेंटीमीटर, मीटरमध्ये आणि आकृती मधील आकडे मराठी देवनागरीत असायला हवे होते. अशा प्रमाणबद्ध वास्तुशास्त्रीय आराखडे पुस्तकात अगदी प्रथम देण्याचा मान जरी सर सिडने टॉय या इंग्लिश अभ्यासकाला जात असला, (फोर्टीफाईड सिटीज ऑफ इंडिया आणि स्ट्राँग होल्डस ऑफ इंडिया हे ते दोन ग्रंथ) तरी त्यातील पुढचं पाऊल प्रदीप यांनी टाकलं आहे. त्याचं अनुकरण व्हायला हवं.

सातारा जिल्ह्यातील तब्बल २४ गडकोट खरे भाग्यवान. कारण त्याचा असा सर्वांगीण एकटाकी अभ्यास सर्वात आधी झाला आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड, वासोटा, चंदनगड, वंदनगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड, महिमंडनगड, वर्धनगड, नांदगिरी, भूषणगड, महिमानगड, वारुगड, संतोषगड, वसंतगड, सदाशिवगड, दातेगड, मोरगिरी, भैरवगड आणि जंगली जयगड यांची रंगीत प्रकाश चित्रे दिल्याने त्यांची एकविसाव्या शतकातील अवस्था कशी होती ? याचे दर्शन भविष्यातील अभ्यासकांना घडू शकेल.

अशा या संदर्भग्रंथाचं लेखन – जुळणी आखणी करणारे प्रदीप पाटील व पार्श्व प्रकाशन ही संस्था निश्र्चितपणे कौतुकास व अभिनंदनास पात्र आहे.

पुस्तकाचे नाव – दुर्गजिज्ञासा
लेखक – प्रदीप पाटील
प्रकाशक – पार्श्व प्रकाशन, मोबाईल – 9689895289
पृष्ठे – ४४४
किंमत – ७५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – पायल बुक 9970926550


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )

मंड्या जिल्ह्यातील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading