शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गणेश आत्माराम वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे, नामदेव कोळी यांच्या कविता संग्रहांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती मराठी विभागाचे प्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी दिली आहे.
मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्यानावे मराठीतील काव्यसंग्रहांना पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार दोन वर्षांतून एकदा पंडित आवळीकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून दिले जातात. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक आणि शिवाजी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
पुरस्कारप्राप्त कविता संग्रह असे…
२०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालावधीतील एकूण चार कवितासंग्रहांना हे पुरस्कार जाहीर केले आहेत. २०१४-१५साठी गणेश आत्माराम वसईकर यांच्या मधल्या मध्ये या कवितासंग्रहास, २०१६-१७साठी दिनकर मनवर यांच्या अजूनही बरंच काही या कवितासंग्रहास, २०१८-१९ साठी सुप्रिया आवारे यांच्या न बांधल्या जाणाऱ्या घरात तर २०२० साठी नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या कवितासंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गणेश वसईकर सुप्रिया आवारे दिनकर मनवर नामदेव कोळी पंडित आवळीकर काव्य पुरस्कार
या पुरस्कारांसाठी परिक्षक म्हणून प्राचार्य गोविंद काजरेकर आणि प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
मधल्या मध्ये चा परिचय रवीन्द्र लाखे यांच्या शब्दात
मधल्या मध्ये ( कविता संग्रह) – कवी गणेश वसईकर
आपण उपस्थितीतात असतो. तेव्हा साधी विचारपूस करत नाही कुणी. अनुपस्थित असलो तर म्हणतात तू असतास तर मजा आली असती. उपस्थित नि अनुपस्थित ह्यांच्या दरम्यान म्हणजे मधल्या मध्ये आपण असतो. ही गणेश वसईकरची कविता आहे. मला ह्या संग्रहात कवीचा माणूस म्हणून एक प्रवास दिसतो. जगण्याचा प्रवास. जीवनजाणिवांचा प्रवास. ह्या कवितामध्ये असलेला उद्वेग, चीड, मनस्ताप उरबडवा नाहीय. पण स्फोटक आहे. मेलोड्रामा नीट वापरला गेला तर त्याच्या शक्तीचा प्रत्यय येतो. ह्या कवितांत तसं घडलं आहे. १० मिन्ट ह्या कवितेपासून ते मूड ऑफ ह्या कवितेपर्यंत असा ह्या संग्रहाचा प्रवास आहे.
परमेश्वर कविता…
परमेश्वर ह्या कवितेच्या शेवटी कवी म्हणतो देवाला की ‘तू नामशेष हो प्रार्थनेतूनप्रार्थनेसकट.’ प्रार्थनेतून देव नामशेष होऊ दे पण प्रार्थना का नामशेष व्हावी असा मला प्रश्न पडला. ही सगळी कविता मुंबई शहराच्या पर्यावरणातली आहे. मुंबईत जगायला आलेल्या प्रत्येक तरुणाची कविता आहे. इथं पाय घट्ट रोवण्याच्या त्याच्या कष्टाची आहे. स्थिर होताना झालेल्या ससेहोलपटीची आहे. हे सगळं व्यक्त केलं जाताना एक मेलोड्रॅमॅटिक सिनिकनेस कवितेत आला आहे. त्यामुळे अलिप्ततता नि लिप्तता दोन्हीचा अनुभव वाचकाला येतो.
रुटीन रूट ह्या कवितेत कवी म्हणतो ‘प्रार्थना करणारा असतो प्रार्थना असते देव असतो’ परमेश्वर कवितेचा शेवट खोडून काढणारा हा या कवितेचा शेवट कवीच्या कुठल्या अनुभवातूनयेतो? असे मध्ये त्याला कुठले अनुभव येतात की तो ही श्रद्धा व्यक्त करतो?ते सारे अनुभव मधल्या कवितांतून सूक्ष्मपणे येतात. इथेही तो मधल्या मध्ये आहे. वाटताहेत त्या सर्व भावभावना जीवनजाणिवा व्यक्त करायला कविता अपुरी पडते आहे. ह्याची खंत सर्व संग्रहभर दिसून येते. अशी खंत प्रत्येक जातीवंत कवीलाच वाटते. पुढे उद्धृत केलेली भूमिका ही कविता मला ह्या संग्रहाच्या केंद्रस्थानी ठेवावी वाटते. भूमिका हो मान्य आहे मला मी नाही म्हटलं होतं पण आता माझा प्रश्न आहे तेंव्हा तुमचा प्रश्न काय होता?
मूड ऑफ कवितेबाबत…
संग्रहाच्या शेवटी मूड ऑफ ही कविता आहे. ह्या कवितेची शेवटची ओळ आहे’तरीसुद्धा मी कविता लिहिणार नाही’ ही ओळ चमकदार वाटते.तिच्या चमकदारपणाचे खूप केलं गेलं आहे. ते त्या ओळीवर अन्याय करणार आहे पण या ओळीत एक भयाण पोकळी दडलेली आहे. रुटीन रूट ह्या आधीच्याच कवितेत पाहाल तर कवी स्थिरावलेला आहे. इतका सश्रद्ध झालेला आहे की तो म्हणतो’ह्या कवितेतलाएकही शब्द माझा नाही ज्याच्या नावाने पेटंटत्याची नाही गाठभेट तोपर्यंत चालायचंच’तर मूड ऑफ कविता ही स्थिरावलेल्या सुखावलेल्या माणसाची कविता आहे. रोजमर्रा जिंदगी जगताना मनाकडे लक्ष द्यायला त्याच कोड नि लाड करायला मूडकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आता खुर्ची आहे, टेबल आहे, घर आहे, कागदच कागद आहेत, पेनं आहेत, वेेळच वेळ आहे, तरीसुद्धा मी कविता लिहीणार नाही. की लिहू शकणार नाही? कारण मूड नाही. कविता लिहिण्याचा मूड नसणं ही एक भयाण पोकळी आहे. जी प्रत्येक कवी त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनुभवतो. ह्या कवितेला कुठलंही लेबल लावू शकत नाही. कवीला फक्त व्यक्त व्हायचं होतं ते त्यानं केलं नि मोकळा झाला आहे. वाचकानेही तेवढं मोकळं व्हावं.