शोध प्रतिजैविकाचा !
रूग्णाच्या लक्षणावरून आणि तिव्रतेवरून प्रतिजैविक द्यावयाचे किंवा नाही हे निश्चित करण्यास अनेक वर्षाचा कालावधी जावा लागला. मात्र पूर्वीच्या अघोरी पद्धतीने रक्त शरीराबाहेर न काढता शरीरातच औषधे देऊन रूग्णांना बरे करता येणे शक्य झाले. मृत्यूदर घटण्यामागे पेनिसिलिनचा शोध हे महत्त्वाचे कारण ठरले.डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
माणसाचे असेल किंवा अन्य कोणत्याही जीवाचे, थोडीसी काळजी नाही घेतली तर आजारपण निश्चित. आजारपण घालवायचे तर उपचार घ्यायला हवेत. भारतात आजारच उद्भवू नयेत म्हणून जीवनप्रणालीच तशी बनवली होती. एखाद्या ऋतूमध्ये काय खावे, कसे खावे, किती खावे याचे नियम घालून देण्यात आले होते. होते म्हणण्याचे कारण आज आपण यातील अनेक गोष्टींना तिलांजली दिली आहे. मात्र त्यामध्ये अनेकदा खंड पडायचा. पाण्यात बदल व्हायचा आणि पूर्वीही माणसे आजारी पडायची. त्यावर नैसर्गिक घटक वापरून उपचार केले जायचे. रूग्ण बरा व्हायचा.
भारताप्रमाणेच पाश्चात्य राष्ट्रातही मानवाच्या शरीरात अनावश्यक घटक गेल्याने माणूस आजारी पडतो, असे मानले जात असे. पाश्चात्य राष्ट्रातही काही वनौषधींचा वापर केला जात असे, मात्र तो अपवादानेच. शरीरात गेलेले अनावश्यक घटक रक्तात असतात, असाही समज होता. रूग्णाला बरे करायचे तर शरीरातील रक्त बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी रूग्णाच्या पायाजवळील भागात किंवा डॉक्टरला योग्य वाटेल अशा जागी कापले जात असे. त्यातून रक्त बाहेर पडले म्हणजे रूग्ण बरा होणार असेच शिकवण्यात येत असे आणि तसेच उपचारही केले जात असत. अनेकदा यातून रूग्ण दगावतही असत. ही पद्धत तशी अघोरी होती. ही पद्धती चूकीची असल्याचे वाटल्यानेच सॅम्युअल हनेमन या डॉक्टरने स्वत:च्या विचारातून नवी चिकित्सा आणि उपचारपद्धती ‘होमिओपॅथी’ विकसित केली. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. मात्र सर्वसाधारणपणे याच पद्धतीने रूग्णांवर उपचार करण्यात येत.
अगदी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीपर्यंत हीच पद्धती पाश्चात्य राष्ट्रात असताना दुसरीकडे भौतिक आणि रसायनशास्त्राचे संशोधन शिगेला पोहोचले होते. त्याचा परिणाम जीवशास्त्र आणि वैद्याकशास्त्रावरही होत होता. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध हा यातील सर्वात महत्त्वाचा शोध. सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने उघड्या डोळ्यांना न दिसणारे दिसू लागले आणि अनेक संशोधक तास न तास या नव्या उपकरणाबरोबर घालवू लागले. अनेक अवयवांच्या उतींच्या रचना, रक्तात काय आहे, कांद्याच्या पापुद्रे आणि मध्यल्या छोट्या पडद्यांच्या रचना कशा बनलेत हे शोधले जाऊ लागले. या यंत्राचा वापर केवळ संशोधकच करत नव्हते तर या यंत्राची माहिती मिळालेले अनेक लोक या यंत्रासोबत कुतूहल म्हणून खेळत होते. याच यंत्राचा वापर करून पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक शोधण्यात आले आणि याचे श्रेय जाते स्कॉटिश संशोधक अलेक्झांडर फ्लेमिंग यांना.
फ्लेमिंग यांचा जन्म ६ ऑगस्ट १८८६ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर फ्लेमिंग यांनी एका जहाज कंपनीत चार वर्षे काम केले. मात्र त्यांच्या भावाला त्यांनी आपल्याप्रमाणेच वैद्यक व्यवसायात यावे असे वाटत होते. काका आणि भावाच्या मदतीने त्यांनी अखेर १९०६ मध्ये वैद्यकशास्त्रातील पदवी प्राप्त केली. त्यांनी सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये बॅक्टेरियावरील अल्मर्थ राईट यांच्यासह संशोधनास सुरुवात केली. पुढे १९१४ मध्ये ते शिक्षक झाले. पुन्हा ते संशोधन कार्यात आले आणि अखेर १९२८ मध्ये ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक झाले.
अल्मर्थ राईट यांचे प्रामुख्याने सैनिकांच्या युद्धात झालेल्या जखमावर संशोधन सुरू होते. सैनिकांच्या जखमा बऱ्या होण्यासाठी त्या काळात आजच्यासारखी औषधे उपलब्ध नव्हती. मात्र जखमामुळे इतर भाग सडू नये, जखम पसरू नये, यासाठी काही अँटिसेप्टीक वापरत असत. तरीही काही जिवाणू यातून अलगदपणे, आरामात आत पोहोचून सैनिकांच्या मृत्यूचे कारण बनत. हे का घडते याचे कारण ज्ञात नव्हते. अशा त्या काळात फ्लेमिंग यांचे संशोधन सुरू होते. ते शिस्तबद्ध नव्हते. त्यांचे सहकारी एलिसन यावरून त्यांना चिडवत.
मात्र पुढे एलिसन म्हणत, ‘गबाळेपणामुळे आणि बेशिस्तपणामुळेच अलेक्झांडर यांना दोन महत्त्वाचे शोध लावता आले’. १९२१ पासून फ्लेमिंग बॅक्टेरियाच्या वाढीवर संशोधन करत होते. बॅक्टेरिया मुख्यत: अश्रुतून मिळवत असत. नाकातील पदार्थ घेऊनही त्यानीं काही प्रयोग केले. मात्र त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होत नसल्याचे आढळून आले. त्यांनी दुषीत रक्त लघवीचे नमुने असे विविध पदार्थ वापरूनही आपले प्रयोग केले.
एकदा असेच प्रयोग संपवून आपल्या बेशिस्तपणास अनुसरून सर्व डिश तशाच ठेवून ते सुट्टीवर गेले. सुट्टीवरून परतल्यावर त्यांनी साफ न करता तशाच ठेवलेल्या डिशचे निरीक्षण सुरू केले असता, एका डिशमध्ये हवे तसे बॅक्टेरिया वाढले नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यातील घटकांचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केले असता, काही भागात बुरशी वाढली असल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात काही राष्ट्रात विशेषत: इजिप्तमध्ये सैनिकांच्या जखमावर ब्रेडवरील बुरशी लावत. मात्र यासंदर्भात वैज्ञानिक प्रयोग करून शोध लावण्याचे श्रेय जणू फ्लेमिंग यांची वाट पहात होते. या डिशमधील विविध भागांचे निरीक्षण केल्यानंतर बुरशी आणि बॅक्टेरिया एकत्र आणल्यास बॅक्टेरिया अर्धमेले होतात आणि जास्त काळ राहिल्यास किंवा बुरशीचे प्रमाण जास्त झाल्यास मरतात, असे लक्षात आले. यातून त्यांनी पेनिसिलीन या पहिल्या प्रतिजैविकाचा १९२८ मध्ये शोध लावला. या संशोधनावर लिहिलेला शोधनिबंध त्यांनी मेडिकल रिसर्च क्लबमध्ये सादर केला. मात्र या संशोधनाचे महत्त्व कोणाच्याही लक्षात आले नाही. संशोधकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे फ्लेमिंग नाराज झाले नाहीत. त्यांचे यावर आणखी संशोधन सुरूच होते. हे औषध मोठ्या प्रमाणात निर्मितीचे तंत्र विकसित करावयाचे होते. तोपर्यंत ही बातमी कर्णोपकर्णी अमेरिकेत पोहोचली. या संशोधनाचे महत्त्व ओळखून हे प्रतिजैविक मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेतील प्रयोगशाळांनी विकसित केले.
हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. अनेक सैनिक जखमी होत होते. त्यांच्यावरील उपचारासाठी १९४४ पासून पेनिसिलीन मोठ्या प्रमाणात वापरले गेले. तोपर्यंत सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने विविध आजारांचे मूळ असलेले जिवाणू आणि विषाणू शोधण्याचे कार्य पूर्णत्वास आले होते. पेनिसिलिन निर्मितीच्या प्रक्रियेप्रमाणे प्रक्रिया राबवून विविध बुरशींचा वापर करून, विविध कल्चर वापरून प्रतिजैविके बनवली जाऊ लागली. औषधनिर्माणशास्त्रामध्ये औषधांच्या निर्मितीचे एक नवे दालन उघडले गेले.
रूग्णाच्या लक्षणावरून आणि तिव्रतेवरून प्रतिजैविक द्यावयाचे किंवा नाही हे निश्चित करण्यास अनेक वर्षाचा कालावधी जावा लागला. मात्र पूर्वीच्या अघोरी पद्धतीने रक्त शरीराबाहेर न काढता शरीरातच औषधे देऊन रूग्णांना बरे करता येणे शक्य झाले. मृत्यूदर घटण्यामागे पेनिसिलिनचा शोध हे महत्त्वाचे कारण ठरले. रुग्णांना आणखी आयुष्य जगता येणे शक्य झाले. मानवी जीवनासाठी पेनिसिलीन हे एक वरदान ठरले आणि हा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांना नोबेल मिळवून देत अजरामर करणारा ठरला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.