ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अर्जुन या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- अर्जुन
अर्जुन ही कॅम्बेटसी कुळातील वनस्पती सदाहरित वनस्पती आहे. या वनस्पतीची वाढ प्रामुख्याने जंगलामध्ये होते. अनमोल उपयोगामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हा वृक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, बंगाल, हिमालय, मध्य प्रदेश, इत्यादी राज्यामध्ये आढळून येतो. सह्याद्री आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये आढळून येणारी ही बहुवार्षिक झाड वनस्पती आहे. कोकणातील देवरोहटयात तसेच दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूटमध्ये ही वनस्पती पहावयास मिळते. हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.
औषधी उपयोग-
या वृक्षाच्या सालीमध्ये टोनीन, टोनीक अॅसीड, ग्लूकोसाईड, सोडियम, कॅल्शियम कार्बोनेटस, पायटो वूटेचोल, अर्जुननॉइन, अर्जुननेटीक आदी रासायनिक द्रव्ये आहेत. ही द्रव्ये माणसातील निरनिराळ्या रोगांवर उपयोगी आहेत. सालीचे चूर्ण पोटात मुका मार लागला तर दुधात मिसळून घेतात. सालीचा काढा हृदयरोगावर अत्यंत उपयोगी असून त्याला हृदयाचे टोनिक म्हणतात. झाडे मोडली तर सांधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पानाचा रस कान दुखत अस्र्ल तर उपयोगी पडतो. याने रक्तशुद्धी चांगली होते. रक्तस्राव बंद होण्यासाठी अर्जुन सादडा पोटात देतात. मार, ठेच, व्रण दोष, हातपाय मोडणे,या गोष्टी बरया करण्यासाठी यासारखे दुसरे औषध नाही. दरवर्षी सुमार २००० टन सालीची मागणी सर्व भारतभर आहे.
हवामान व जमीन-
अशा बहुपयोगी आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असणाऱ्या या वृक्षाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. मात्र पाणी साचणाऱ्या आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये याची लागवड केल्यास त्याची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. साधारणपणे जास्त आर्द्रता असणाऱ्या आणि दमट ह्वामांच्या जागेत. शिवाय १००० ते ४००० मिमी. पाऊस पडणाऱ्या ठिकाणी लागवड करणे फायद्याचे आहे. उष्ण आणि समशीतोष्ण तापमानामध्ये व समुद्रसपाटीपासून १००० मी. उंची असणाऱ्या जागेत हि वनस्पती चांगली वाढते. दरी-खोऱ्यातील निवाऱ्याची जमीन या झाडास चांगली मानवते. खडकाळ आणि डोंगर उतारावरील आणि उताराच्या जमिनीत हा वृक्ष चांगला वाढत नाही.
रोपे तयार करणे –
बियापासून रोपे तयार करणे कधीही योग्य. वजनदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. रोपे तयार होण्यापासून ६ ते ८ महिने लागतात. १ किलोमध्ये ४५० इतके बियाणे असतात. बी २ ते ४ सेमी. लांब असते. गादी वाफ्यावर अलगद पेरणी करून रोपे तयार करावीत. बियांवर ज्यादा माती टाकू नये. त्यामुळे उगवण चांगली होत नाही. या व्र्क्षाची अभिवृद्धी रोपांपासून छाट कलमाद्वारे अथवा गुटी कलमाद्वारे करता येते. रोपे तयार करण्यासाठी एप्रिल महिन्यात वाफ्यावर बियाणे पेरावे. अर्जुनाची फळे ४८ तास पाण्यात भिजवून नंतर उथळ चारयामध्ये ठेवतात. कोंब फुटल्या बरोबर पेरणी करावी किंवा फळे उकळणाऱ्या पाण्यात टाकून टी थंड होऊ द्यावी व त्याच पाण्यामध्ये ६/२ तास भिजत ठेवल्यास उगवणशक्तीमध्ये निश्चितच वाढ होते. अशाप्रकारे बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची उगवण ८ते१० दिवसात सुरु होते. प्रक्रिया केलेले बियाणे ३० सेमी. अंतरावरील ओळीत ५ सेमी. या अंतर ठेवून पेरावे. वाफ्यांना नियमित पाणी द्यावे व आवश्यकतेनुसार बेणणी करावी. रोपे ५ सेमी. उंचीची झाली की टी अगोदर भरलेल्या पिशवीत लावून द्यावी.
रोपांची लागवड –
रोपांची उंची ५० सेमी झाल्यानंतर पावसाच्या सुरवातीस किंवा जून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात १० गुणिले १० मी. अंतरावर ३० गुणिले ३० गुणिले ३० मीटरचे खड्डे खोदून करावी. हेक्टरी १०० रोपे लागतात. जुलैत रोपांची लागवड स्वतंत्र करावी. लागवड करताना मुळा भोवतालच्या मातीच्या गोळ्यासहित रोप लावावी. लागवड करतेवेळी शेंड्याकडील पानांची जोडी तशीच ठेवून बाकीची पाने काढून टाकावीत. जुलै महिन्यात साधारणतः १५ महिने वयाच्या रोपांपासून छाट कलमे तयार करून लागवड करावी. छाट कलमांची जाडी साधारणतः १.२ ते २.५ सेमी असावी. रोपाभोवती पाणी साचणार नाही याची काळजी ग्यावी. वर किंवा खूप उताराची जमीन असेल तर रोपांना आधार द्यावा. पहिले ३ ते ५ वर्षे आंतरपीक म्हणून अन्नधान्याची पिके/झुडूपवर्गीय औषधी वनस्पतीची लागवड करता येते.
लागवडीनंतरची काळजी –
या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी मिश्र खताचा १० ग्रॅम (१५:१५:१५ ) स्फ्ता द्यावा. खतांना प्रतिसाद देणारी हि वनस्पती आहे. हे झाड खूप कणखर असल्यामुळे कमीत कमी घेतल्याने जगण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. नियमित पाणीपुरवठा केल्यास वाढ चांगली होते. दरवर्षी शेणखत/भर तरी द्यावी.
काढणी –
या झाडाचे ३० ते ३५ वर्षांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. याची साल दर तीन वर्षांनी आपोआप गळून पडते. कुऱ्हाड/कोयत्याने साल काढू नये. एप्रिल/मे महिन्यात फुले येतात. ऋतू नुसार फुले येण्याचा काळ बदलतो. साल गोळा करून त्याची भुकटी तयार करून उत्पन्न मिळते. झाडाच्या वयानुसार ५०० ग्रॅम ते १० किलोपर्यंत साल मिळते.
दर –
साधारणपणे १२ ते १५ रुपये/ किलोप्रमाणे दर मिळतो व चूर्ण केल्यास २२ ते ३० रुपये/ किलो दर मिळतो. शिवाय आंतरपीक म्हणून झुडूप वर्गीय औषधी वनस्पतीची लागवड केल्यास जास्त फायदा मिळतो. सध्या याची लागवड रोजगार हमी योजनेमध्ये केली असता हेक्टरी १४.३०१ इतके सरकारी अनुदान मिळते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.