March 29, 2024
Dr Geetali Tilak Vic Chancellor of TMV Pune
Home » टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक
काय चाललयं अवतीभवती

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली असून, गुरुवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, टिमवि ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणति टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजीत जोशी, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडिलकर उपस्थित होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे कुलगुरू निवडीची प्रक्रिया पार पडली. यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक संशोधनातील महत्त्वाचे योगदान आणि नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभारी कुलगुरू या नात्याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठात केलेली प्रभावी अंमलबजावणी अशा निकषांवर कुलगुरुपदावर डॉ. गीताली टिळक यांची पाच वर्षांकरिता निवड केली आहे. गेली दोन वर्षे डॉ. गीताली टिळक या प्रभारी कुलगुरू म्हणून काम करीत होत्या.

डॉ. गीताली टिळक या संगणक शास्त्राच्या पदवीधर असून, त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन त्याचबरोबर मुद्रितमाध्यम या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. या दोन्ही विषयांत त्यांनी पीएच.डी. मिळवली. मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटीत त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या कल्पना आणि प्रेरणेतून मासकॉम विभागात उभा राहिलेला अद्ययावत स्टुडिओ हे संपूर्ण विद्यापीठासाठी वैशिष्ट्य ठरले आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आधुनिक शास्त्रे व व्यावसायिक कौशल्य विभागाच्या त्या अधिष्ठाता आहेत. टिमविच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य, क्रीडा समितीच्या संचालक, कौशल्य विकास शिक्षण केंद्राच्या अध्यक्ष, लोकमान्य टिळक संशोधन व विकास केंद्राच्या अध्यक्ष अशा विविध जबाबदार्‍यांचा त्यांना अनुभव आहे.

केसरी-मराठा संस्थेच्या विश्वस्त-व्यवस्थापिका, छावा साप्ताहिकाच्या संपादक, मराठा त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याशिवाय, टिळक स्मारक ट्रस्ट, अनाथ हिंदू महिलाश्रम, महिला पुनर्वसन केंद्र, इंदुताई टिळक कला केंद्र, पुणे रोझ सोसायटी, वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे ज्युदो असोसिएशन अशा अनेक संस्थांशी त्या निगडित आहेत

शैक्षणिक गुणवत्ता आणि विस्ताराला प्राधान्यः डॉ. गीताली टिळक

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा आहे. लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक असलेल्या या विद्यापीठाच्या विस्तारास आणि शैक्षणिक गुणवत्ता जपण्यास आपले प्राधान्य राहील, असे डॉ. गीताली टिळक यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नमूद केले. त्या म्हणाल्या, ‘ज्येष्ठ नेते आणि लोकमान्यांचे नातू कै. जयंतराव टिळक यांच्या पाठपुराव्यामुळे 1987 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. आताचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी त्यांच्या कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाचे नाव आणि प्रतिष्ठा उंचावली. दूरदृष्टीतून त्यांनी अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले. विद्यापीठाची सुरू असलेली वेगवान वाटचाल त्यांच्या आणि विद्यापीठातील अन्य ज्येष्ठांच्या व सर्व सहकार्‍यांच्या मदतीने कायम राखण्याचा प्रयत्न करेन. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिखर ठरेल, हा मला विश्वास वाटतो

Related posts

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

यशस्वी होण्यासाठी बुद्धीमान अन् हुशार यातला फरक जाणा…

ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवा

Leave a Comment