श्री संत अच्युत महाराजांचे सुविचार, शुभचिंतन, नामस्मरण याद्वारे आसपास असणाऱ्या लोकांमध्ये विचार लहरी प्रवाहित होऊन सर्व भक्तगण सुद्धा पावन झाला. एवढं महान सामर्थ्य असणारी जी गुरुदेव शक्ती ती म्हणजे “श्री संत अच्युत महाराज”
पुष्पा सुनिल वरखेडकर,
परिवेक्षिका, पी डी कन्या शाळा, वरूड
तपाचे सामर्थ्य । तपिंनला अमुप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ।।
या ज्ञानेश्वराच्या हरिपाठातील ओवी प्रमाणे, जीवाचे रान करून श्री संत अच्युत महाराजांनी अविश्रांत अहोरात्र जीवनाची होळी करून त्या परमपदाला पोहोचण्याकरता आपले आयुष्य खर्ची घातले.असा हा तपस्वी आज अनेक कल्पापर्यंत वैकुंठामध्ये चिरंजीव पदास प्राप्त झाला.
स्वामी विवेकानंदाप्रमाणे, देव कुठे आहे या शोधात रानोमाळ भटकंती केली. भक्त प्रल्हादाप्रमाणे अनेक अग्नी दिव्यातून त्यांना जावे लागले. बाळ ध्रुवाप्रमाणे ऊन वारा पाऊस यांचा मारा सहन करून श्री संत अच्युत महाराज अढळ पदाला पोहोचले. कारण समाज फक्त सत्ता व पैसा यांच्या मागे फिरणारा आहे. हे त्यांनी जाणले.
श्री संत अच्युत महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीधरपंत व आईचे नाव अन्नपूर्णा. वैभव संपन्नता जाऊन दारिद्र्याचे दुष्टचक्र सुरू झाले. सदा सर्वदा ईश्वर चिंतन, कथा, कीर्तने प्रवचने यात रममान होणारा बालक शाळेत प्रत्येक वर्षी वर्गात चांगल्या गुणांनी पास होत असे. अन्नपूर्णा माता बालपणीच अनंतात विलीन झाली. अन्नपूर्णा माता अनंतात विलीन झाल्यावर हा बालक पोरका झाला. मायेचे छत्र हरवल्यावर श्री संत अच्युत महाराज स्वतःला अंधाऱ्या कोठडीत तासंतास कोंडून घेणे, ग्रंथ वाचन, कथा कीर्तने श्रवण करणे या विश्वात या कोशात स्वतःला अडकून घेतल्यामुळे वैराग्य अधिकच उभारीला आले.
श्री संत अच्युत महाराजांनी गौतम बुद्धाप्रमाणे, ध्रुवाप्रमाणे गृहत्याग केला. समर्थ रामदासाप्रमाणे सावधानतेचा इशारा देत देवाला शोधण्याकरिता डोंगर, दरी , जंगल, नदी, नाले यांचा आश्रय घेऊन ध्यान साधनेला सुरुवात केली. समाधी ध्यानधारणा, प्रत्याहार, प्राणायाम, आसन नियम व यम इत्यादी अष्टांगयोगाची साधना करून इंद्रिय व मनावर विजय मिळविला. सिद्ध महात्मा लोककल्याणासाठी विश्वाच्या अंगणात सिद्ध झाला.
जनसेवेचे बांधूणी कंकण ।
त्रिभुवन सारे घेई जिंकून ।
अर्पुनी अपुले निज सिंहासन ।
नित भजतो मानवतेला ।।
याप्रमाणे तपोवनातील कुष्ठ मुक्तीच्या महान कार्याला चार तपेपर्यंत दादासाहेब पटवर्धनांना हातभार लावला. रात्रंदिवस जनहिताची तळमळ त्यांच्या हृदयात होती. आपला परका, जात धर्म यांचा विचार न करता हे विश्वचि माझे घर हा ज्ञानेशाचा संदेश ऊरी बाळगला. आपल्यामध्ये असणाऱ्या कुप्रवृत्ती, कुविचार, दुर्वासना, दुष्ट प्रवृत्ती यांचे बीज संतांच्या विचारांनी जळून जाते. आपल्यामध्ये असणारी शक्ती मर्यादित असते पण संतांच्या तपसामर्थ्यामुळे शक्तीचा मोठा पुंज व स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीतून, वाणीतून, स्पर्शातून आपल्या सामान्य जीवावर कृपादृष्टी होत असते.
संत चरण रज । लागता सहज । वासनेचे बीज जळूनी जाय ।
त्याला वैज्ञानिक कारण आहे संताच्या पाय धुळीत जे परमाणु असतात. ते सुद्धा कल्याणकारी असतात.
श्री संत अच्युत महाराजांचे सुविचार, शुभचिंतन, नामस्मरण याद्वारे आसपास असणाऱ्या लोकांमध्ये विचार लहरी प्रवाहित होऊन सर्व भक्तगण सुद्धा पावन झाला. एवढं महान सामर्थ्य असणारी जी गुरुदेव शक्ती ती म्हणजे “श्री संत अच्युत महाराज” असे थोर संत वरुड नगरीत जन्माला आले. त्यांच्या पावन पदस्पर्शाने वरुड नगरी तीर्थक्षेत्र बनली. तपोनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, ज्ञानोपासक आत्मभान असणारा असा संत पुरुष होणे नाही. समईतला नंदादीप शांततेवत राहून आपल्या तेजोवलयाने प्रकाश देणारा हा संत महान होय.
ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र सारखे असते .पण कुठेही लिप्त होत नसते .त्याप्रमाणे श्री संत अच्युत महाराजांचे चारित्र्य होते. वाहत्या निर्झर झऱ्याप्रमाणे जीवनात कुठेही उच्छृंखलता नाही. मरावे परी कीर्ती रूपे उरावे । यानुसार लोकवर्गणीतून त्यांनी भव्य असे हृदय रुग्णालय अमरावती येथे उघडले. अगदी विनामूल्य सेवा देऊन गरीब साधारण लोकांना जीवनदान प्राप्त करून देणारा संत म्हणजे श्री अच्युत महाराज.हे लोकोत्तर पुण्य करून ते ऋणमुक्त झाले.
संत अच्युत महाराजांना अपार बुद्धीचे वैभव लाभले होते. त्याची साक्ष म्हणजे त्यांच्या ग्रंथसंपदेतून दिसते. ते आज जरी शरीर रूपाने आपल्यात नसले तरी परमार्थ मैदानाची गंगा गावोगावी घरोघरी पोहोचवून त्या परमात्मा शक्तीला आळविण्याकरता त्या पदापर्यंत पोहोचवण्याची पायवाट सोपी करून दिली तसेच जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपले । तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेची जाणवा ।। असं अफाट कार्य त्यांनी केले.