July 27, 2024
Nagbali fruit tree article by V N Shinde
Home » टोचणारे काटे आणि गोड फळांची कार !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोचणारे काटे आणि गोड फळांची कार !

मराठीमध्ये कार, किरमा तर संस्कृतमध्ये नागबली या नावाने ओळखली जाणारी झुडुपवर्गीय वनस्पती. या झाडाचे टोकदार काटे हीच त्याची ओळख बनल आहेत आणि या काट्यामुळेच ते नावडतेही बनले. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होते की काय, असा प्रश्न पडतो. मात्र या झाडाची फळे गोड आणि चविष्ट असतात. ही फळे म्हणजे बालपणीचा बाळगोपाळांचा आवडता रानमेवा. याच्या मुळांचा उपयोग सर्पदंशावर केला जातो. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. अशा या बहुगुणी रानमेव्याविषयी….संपूर्ण लेख

डॉ. व्ही. एन. शिंदे

कुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

बालपण समृद्ध होते. शाळा शिकणे जसे सुरू होते, तसेच जंगलात फिरणे आणि अनुभवणेही सुरू होते. त्यातून विविध वनस्पतींची ओळख झाली. त्यातील जे जे माणसाने खाण्यासाठी योग्य अशा सर्व गोष्टी चाखता आल्या. टेंभूर्णीची फळे, धामणे, इरामणे, करवंदे, बोरे, चारे, गोदणे, हुंबाटे, कामिन्या, निळुंब्या अशा अनेक वनस्पतींची फळे बालपणी खायला मिळाली. त्यातीलच एक आठवण बनलेले झाड म्हणजे कार. सोलापूर, मराठवाडा भागात या झाडाला कारीचे झाड म्हणतात. मात्र कोल्हापूर भागात, कोकणात ही झाडे फारशी दिसत नव्हती. मुळात सोलापूर भागातही ही झाडे आता कमी दिसतात. या झाडाची ओळख धुसर होत असतानाच एक दिवस एका झुडुपावर बुलबुल पक्ष्याचा दंगा पाहायला मिळाला. बुलबुलचा आनंद शोधताना, हे झाड दिसले आणि आठवणीच्या पानावरील धूळ क्षणात दूर झाली.

Nagbali fruit tree article by V N Shinde
Nagbali fruit tree article by V N Shinde

या झाडाची कार नावाने बालपणापासून ओळख झालेली असली तरी या झाडाचा शोध घेताना त्याचे किरमा आणि कडबार ही मराठीतील अन्य नावे समजली. तसेच हे झाड इतके दुर्लक्षित आहे की त्यावर मराठी भाषेत साहित्य दिसून आले नाही. इंग्रजीमध्ये मात्र अनेक शोधनिबंध आणि त्याच्या औषधी गुणधर्माबाबत संदर्भ मिळाले. संस्कृतमध्ये नागबला, गंगेरूकी ही नावे आहेत. कोकणीमध्ये या झाडाला कायली म्हणतात. कन्नडमध्ये करेमुल्लू, ओल्लेपोडे, कारे-गीडा, मल्याळममध्ये मधाकरा, निरूरी, सेरूकरा, कारामुल्लू, कट्टरामुल्लु, कंटककारा, कंडाकारा, ओडिसरमध्ये तुतीडी, तमिळमध्ये थेरवाई, सेंगराई, थेर्नाई, नल्लक्कराई, मुल्लुकराई, कुडीराम, करायचेडी, तेलगूमध्ये बालुसू, सिन्नाबालूसू नावाने ओळखले जाते. त्याला किरनी, कंडाकारा, नल्लाकराई, कोरोमंडल बॉक्सवूड, कराईचेड्डी ही इतर काही नावे मिळाली आहेत. इंग्रजीत याचे बारसे कॅरे चेड्डी, वाईल्ड जेस्सामीन या नावाने करण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव कँथियम कोरोमँडेलिसम असे आहे. शेतात फिरताना शेळ्या आणि मेंढ्या वगळता इतरांची या झाडाशी दोस्ती केवळ फळे असतानाच असे. एरवी सर्वजण कारीपासून फटकून राहणेच पसंत करतात. झुडुपवर्गीय काटेरी वनस्पती असूनही, उंची कमी असल्याने यावर पक्ष्यांची घरटी क्वचितच आढळतात.

हे झाड मूळ भारतातील आहे. आजही याचे अस्तित्व भारतासह, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान या देशापुरताच मर्यादित आहे. उष्ण आणि समशितोष्ण वातावरणामध्ये हे झाड वाढते. पाण्याची निचरा होणारी, मुरमाड जमिनीत ही झाडे आढळतात. झाडाची उंची सहा ते बारा फूट होते. झाडाची रोपे बियापासून तयार होतात. रोप तयार होताना सुरुवातीला एक कोंब वर येतो. जमिनीपासूनच पाने आणि काटे दिसू लागतात. दोन काटे एकाच उंचीवर परस्परविरूद्ध बाजूला असतात. शेजारी असणाऱ्या काट्याच्या जोड्या बरोबर काटकोनात असतात. हे काटे सरळ आणि धारदार असतात. काटे टणक आणि चार ते पाच सेंटिमीटर लांब असतात. काटेही सुरुवातीला पिवळे, नंतर पोपटी आणि शेवटी हिरवे होतात. त्यानंतर त्यांचा रंग वाळलेल्या लाकडासारखा करडा – काळसर होतो. मात्र काट्याच्या टोकाला असणारी धार सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच असते. काट्याच्या खाली काही अंतरावर पाने असतात. पाने गळाल्यानंतर धारदार, लांब काटे असणारे सरळ लाकूड हे एखाद्या शस्त्राचे रूप धारण करते.

Nagbali fruit tree article by V N Shinde
Nagbali fruit tree article by V N Shinde

खोडाचा आणि काट्यांचा रंग काळसर करडा असतो. मुख्य खोडसुद्धा फार मोठे होत नाही. पाच ते सहा सेंटिमीटर व्यासापर्यंत खोडाची वाढ होते. त्यानंतर जरी ते खोड वाळले तरी बुंध्यातून फुटलेल्या फांद्यामुळे त्या ठिकाणचे झाडाचे अस्तित्व संपत नाही. ते तेथे तसेच असते. झाडाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असते. त्याचा वापर प्रामुख्याने जळण म्हणून केला जातो. लाकडापासून मिळणाऱ्या उष्णतेचे प्रमाण जास्त असते. मात्र त्याच्या काट्यामुळे हिरवे झाड जळणासाठी तोडत नाहीत. त्यापेक्षा काट्यांचा त्रास होऊ नये म्हणून लहान रोपानाच वाढू दिले जात नाही.

कारीचे एक फळ दोन ते चार बिया धारण करते. असे बहुबीजधारी फळ खाली पडले आणि त्यातील सर्वच बिया रूजल्या, तर, प्रत्येक बी रूजून एकाच बुंध्यात तीन ते चार रोपे आलेली असतात. ही रोपे दोन – तीन फुटांची उंच होताच, त्यांना फांद्या फुटतात. काही रोपांच्या बुंध्यातून फांद्याही फुटतात. फांद्या सुरुवातीला सरळ असतात. फांद्यांचा आकार लहान असल्याने लांबी वाढताच काही प्रमाणात खाली झुकतात. फांद्या मोठ्या प्रमाणात फुटून झुडुप डेरेदार होते. येणारी कोवळी पाने पिवळ्या रंगाची असतात. पानांचा रंग प्रथम पोपटी आणि नंतर गडद हिरवा होतो. पाने साधी असतात. पक्व जून झालेली पाने पिवळी होतात आणि गळतात. पाने अंडाकृती असतात. पानांची रूंदी दोन ते अडिच सें‍टिमीटर तर लांबी तीन ते चार सेंटिमीटर असते. पानांच्या मधोमध एक शीर असते. प्रत्येक बाजूला चार उपशीरा असतात. त्यापासून लहान शीरांचे जाळे तयार होते. शीरा आणि उपशिरांचा रंग पोपटी असतो. पाने मऊ असतात. खालच्या बाजूला पानांचा रंग फिकट असतो.

या झाडांची पाने शेळ्या आणि मेंढ्यांची आवडते खाद्य आहेत. काट्याखाली असणारी पाने शेळ्या-मेंढ्या मोठ्या शिताफीने खातात. सर्व पाने कोवळ्या फांद्यावर असतात. जुन खोडावरील पाने गळतात. पानाच्या अगदी जवळून एप्रिल – मे महिन्यात कळ्या येतात. कळया थोड्या लांब असतात. कळया मध्यभागात थोड्या दबलेल्या असतात. जेथून नव्या फांद्या येतात अगदी त्याच जागी कळ्या येतात. यामुळे या कळ्यांना आणि फुलांना अक्षधारी कळ्या म्हणतात. एका देठाला तीन ते चार कळ्या येतात. या कळ्यातून छोटी, हिरवट-पिवळ्या रंगाची फुले येतात. प्रत्येक फुलामध्ये चार पुंकेसर असतात. चार निदलपुंज आणि चार दलपुंज असतात. मध्ये असणाऱ्या दांड्याच्या खाली फुलाच्या देठाजवळ अंडाशय असते. मध्यभागी असणाऱ्या दांड्यातून पुंकेसरातील परागकण बिजांडापर्यंत पोहोचवण्याचे काम कीटक करतात. तेथेच फळ आकार घेऊ लागते.

फुलांचे फळात रूपांतर होताच, फुलांचे इतर भाग गळून जातात. फळे हिरवी असतात. फळांना खाचा असतात. फळाच्या दुसऱ्या टोकाला जांभळाप्रमाणे खाचयुक्त भाग असतो. दुसऱ्या बाजूलाही देठ होते की काय, असे वाटते. मात्र जांभळावर ‘जांभूळ आख्यान’ आले तसे भाग्य या झाडाला आणि फळाला लाभले नाही. फळे मोठी होत जातात. पूर्ण वाढलेल्या फळांचा आकार दीड ते दोन सेंटिमीटर लांब आणि एक ते दीड सेंटिमीटर रूंद असतात. फळे दोन्ही बाजूला थोडी दबलेली असतात. तीन – चार महिन्यानंतर फळे पक्व होतात. जुलै – ऑगस्टनंतर फळे पिकतात. पिकताना ती पिवळी होतात. फळे कडक असतात. फळाचा अर्धा भाग बियांनी व्यापलेला असतो. बिया एका बाजूला चपट्या असतात. दुसऱ्या बाजूला गोल असतात. फळावरील आवरण चकाकणारे आणि गुळगुळीत असते. फळ पूर्ण पक्व होताच गर मऊ पडतो. फळाचा रंग प्रथम लालसर आणि नंतर तपकिरी होतो. कच्ची फळे तुरट असतात, मात्र मऊ झालेली फळे खायला खूप गोड आणि चविष्ट असतात. या फळांना खाण्यासाठी बुलबुल, मुनियासारखे पक्षी, खारूताई या झाडाकडे मोर्चा वळवतात. कीटकही या फळांचा आस्वाद घेतात. पूर्ण पिकलेले फळ झाडावर असणे जणू या जीवाना आवडत नाही. काट्याखाली आणि पानाआड लपलेली ही फळे शोधून फस्त करतात.

या झाडाच्या विविध भागांचा औषधी उपयोग होतो. काही भागात या वनस्पतीची पाने सॅलॅडप्रमाणे खातात. काही आदिवासी कारीच्या पानांची भाजी करून खातात. पायात किंवा शरीरामध्ये काटे मोडल्यानंतर कोवळी पाने उकळून काटा मोडलेल्या जागेवर बांधतात. काटे बाहेर पडण्यास त्यामुळे मदत होते. लहान मुलांना जंताचा त्रास होऊ नये म्हणून नियमीतपणे पाने खायला देतात. जनावरांच्या जखमा भरून याव्यात म्हणून पानांचा काढा करून पाजला जातो. पानामध्ये मोठ्या प्रमाणात ‘अँटिऑक्सिडंट’ घटक असल्याने पूर्वी पानांचा रस पित असत. पोटाच्या आजारावर पानातील घटक उपयुक्त ठरतात. मुळे आणि पानांचा एकत्रित वापर मूत्राशयाच्या त्रासावर, खरूज, खोकला, ताप, जंत, मधुमेह, अतिसार, मळमळ, अशक्तपणा, मूळव्याध, श्वसनविकार इत्यादी आजारावर करण्यात येतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस दुधाबरोबर मुळापासून बनवलेले औषध देण्यात येते. त्यामुळेच संस्कृतमध्ये याला नागबला म्हणतात. सालीची भुकटी बनवून ती हळद, लिंबू मिसळून डोकेदुखीवरील औषध बनवले जाते. फळ खाण्याने जंताचा त्रास होत नाही. तसेच पित्ताचा त्रास कमी होतो. मधुमेह, अपचन, अतिसार, नपुसंकत्व, ताप, स्थूलत्वावर या झाडाचा उपयोग होतो.

बालपणी माळावरच्या शेतात कारीची दोन झाडे होती. या झाडांची फळे कधी पिकतात याची आम्ही वाट पाहात असायचो. अगदी नकळत्या वयापासून फळे पिवळी होताच आम्ही ती तोडून खायचो. बडबड गीतासारखे ‘कारीचे लाडू गोड फार, जरी असले काटे धारदार’ असे पुटपुटत आम्ही झाडाच्या चारी बाजूने पिकलेली फळे शोधायचो. फळे तोडताना भरपूर काटे टोचायचे. काटे टोचले तरी ती गोड फळे खाण्याच्या नादामध्ये ते बोचणे कधीच विसरले जायचे. गोड फळाबरोबर काटे टोचवणारे हे झाड जणूकाही जीवनात सुखाबरोबर दु:ख पचवायची जणू शिकवण देत असते.

झाडाचे महत्त्व जाणणारे वडील कारीची फळे खाताना कधीही रागावत नसत. जास्त पिकलेले, मऊ झालेले फळ तोंडात टाकताच गर विरघळून जात असे. त्यांची चवही जास्त गोड असायची. या जास्त पिकलेल्या फळांना आम्ही लाडू म्हणायचो. एक तीळ सात जणांनी कसा खाल्ला असेल माहीत नाही. मात्र, एखाद्याला दोन लाडू मिळाले तर लाडू न मिळणारा त्याच्याकडे आशेने पाहात असत. सर्वजण तो मेवा वाटून खात असत. बालपणी या झाडांची फळे खाण्याचा मनमुराद आनंद घेतला असल्याने हे झाड कायम आठवणीत राहिले. याचे झाड आज पहिल्यासारखे सर्वत्र दिसत नाही. याची फळे मिळणे तर दूर. आरोग्याच्या दृष्टीने उपयोगाची असणारी ही वनस्पती तशी पूर्णत: दुर्लक्षित झाले आहे. या झाडाची रोपे कोणत्याही रोपवाटिकेत मिळत नाहीत. या झाडाला आवर्जून कोणी लावत नाही. या झाडाचे शेतात रोप उगवले, तर जगू दिले जात नाही. चुकून बांधावर उगवले आणि कोणाचे लक्ष नाही गेले तरच ते जगते. मात्र या बहुगुणी झाडाला वाढू दिले पाहिजे. बालगोपाळांना या फळांचा आनंद मिळू दिला पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस

जेंडर बजेटची व्याप्ती वाढेल का ?

कळसूबाई आणि रतनगडावर पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading