दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून दुःखावर मात त्यांना करायची असते. खरेतर हा देव, हे सद्गुरु आपल्या हृदयातच आहेत. आपल्यातील देवाला, सद्गुरुंना आपण कधी जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण आपणाला त्याची जाणीवच होत नाही. ही जाणीव करून घेऊन त्यांची नित्य अनुभुती घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया ।
तरसील माझिया । प्रसादास्तव ।। १२७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईटगतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील.
संसारात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग घडत असतात. त्याचा त्रास आपणास होत असतो. कधी कधी हा त्रास विकोपालाही जातो. असे नाही की फक्त गरीबांनाच दुःख असते. श्रीमंतानाही दुःख होत असते. रात्री झोप लागत नाही हे सुद्धा एक दुःखच आहे. सुखापेक्षा दुःखाचे प्रसंग जीवनात अधिक असतात तेव्हा ते आव्हान म्हणून स्वीकारायचे असते. दुःख हे रोजचे रडगाणे असते. सुख मात्र कधीतरीच होत असते. यासाठी सुखाच्या क्षणाचा आनंद घेऊन त्यात डुंबायचे असते अन् नित्य असणाऱ्या दुःखाला विसरायचे असते. तरच जीवनात यशस्वी होता येते.
दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून दुःखावर मात त्यांना करायची असते. खरेतर हा देव, हे सद्गुरु आपल्या हृदयातच आहेत. आपल्यातील देवाला, सद्गुरुंना आपण कधी जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण आपणाला त्याची जाणीवच होत नाही. ही जाणीव करून घेऊन त्यांची नित्य अनुभुती घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. म्हणजे आपले जीवनच बदलून जाईल. देवाचा खरा प्रसाद, सद्गुरुंचा खरा प्रसाद कोणता आहे हे जाणून घ्यायला हवे. सद्गुरुंची नित्य अनुभुती हाच सद्गुरुंचा खरा प्रसाद आहे. त्यांच्या विचाराने चित्त भरून जाणे. त्यांचे नित्य अस्तित्व जाणणे, अनुभवने यातूनच सगळे दुःख दूर होते. जे घडले ते त्यांच्यामुळे घडते अन् जे घडणार आहे हे सुद्धा त्यांच्यामुळे घडते. आपण फक्त निमित्तमात्र आहोत. ही अनुभुती घेऊन जीवन जगत राहील्यास दुःख हे कशाचेच होणार नाही. जीवनाचा खरा आनंद आपणाला उपभोगता येईल.
एखादी वाईट घटना घडली किंवा नको असलेली घटना घडली तरी दुःखी व्हायचे नाही. त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने, विचाराने पाहून यावर मात करायची असते. यात गुंतून पडायचे नाही. म्हणजे याचा त्रास आपणाला होत नाही. त्या घटनेत सद्गुरुंना पाहायचे. ती अनुभुती घेऊन त्यातून आपण अलिप्त व्हायचे. सद्गुरुंनीच घडवले आहे, मग आता तेच मार्ग सुचवतील असे समजून त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे त्याच्या नित्यतेच्या प्रसादाने आपण दुःखापासून मुक्त होतो. त्यांचा हा प्रसादच आपणास या संसाराच्या रहाटगाडग्यातून मुक्त करतो हा विश्वास आपण ठेवायला हवा. चित्तात सद्गुरुंची नित्यता ह्या त्यांच्या प्रसादामुळेच आपले जीवन सुसह्य होते. सुखी होते. यासाठीच नित्य त्यांचे स्मरण ठेवायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.