गुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा
अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेही मनास वाफसा येतो. सद्गुरू बीजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।। 491 ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा
ओवीचा अर्थ – आणखी सोन्यासारखा अवधानरुपी वाफसा मिळाला, म्हणून श्री निवृत्तीनाथांस पेरण्याची इच्छा झाली.
जमिनीत वाफसा असेल, तर शेतात पेरणी होऊ शकते. दलदल किंवा कठीण जमिनीत पेरणी होऊ शकत नाही. धूळ पेरणी करतानाही जमिनीची योग्य मशागत झालेली असणे आवश्यक असते. बियाण्यांची पेरणी करताना जमीन पेरणी योग्य आहे का नाही याची पाहणी केली जाते. जमीन पेरणी योग्य नसेल तर, पेरणी केली जात नाही. पेरणीस अयोग्य असणाऱ्या जमिनीत पेरणी केली तर त्यातून योग्य उत्पन्न येईल याची शाश्वती देता येत नाही. अशा जमिनीत बियाणे उगविण्याचीही शक्यता नसते. यासाठी केलेली पेरणी वाया जाणार नाही याची काळजी घेऊनच शेतकरी शेतात पेरणी करतो.
सद्गुरूही अनुग्रह देण्यापूर्वी भक्ताची हीच स्थिती तपासतात. गुरूमंत्राच्या बीज पेरणीस भक्त योग्य आहे की नाही, त्यामध्ये ती पात्रता आहे की नाही. हे पाहतात. जर भक्त बीज पेरणीस योग्य नसेल तर त्यास अनुग्रह प्राप्ती होत नाही. यासाठी भक्तांनी स्वतःचा विकास पेरणी योग्य करून घ्यायला हवा. याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मनात झालेली विषयांची दलदल दूर करायला हवी. वाईट विचार काढून टाकायला हवेत. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आवश्यक आचरण करायला हवे. रागाचा चढलेला पारा उतरवायला हवा. कामाचा मोह टाळायला हवा. मनाची स्थिती सुधारायला हवी.
पण असे करूनही अनेकदा अनेकांना अनुग्रह प्राप्ती होत नाही. असे का होते ? तर ही स्थिती म्हणजे वाफसा नव्हे. वाफसा येण्यासाठी आवश्यक असणारे हे घटक आहेत. या घटकांचे ऐक्य हवे. मन त्यावर नियंत्रित व्हायला हवे. वाफशाची स्थिती कायम राहायला हवी. यासाठी अवधान हवे. जागरूकता हवी. वाफसा आला आणि गेला असे नको. ती स्थिती नित्य राहायला हवी. त्यात सातत्य हवे.
अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेही मनास वाफसा येतो. सद्गुरू बीजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात. तो यावर दृढ आहे की नाही, हे पाहतात. पण ही स्थितीही त्यांच्या आशीर्वादानेच येते. त्यांच्या सामर्थ्यामुळेच प्राप्त होते. पण भक्ताचे यासाठी अवधान असायला हवे.
सैनिक नेहमी सावधान स्थितीत असतात. विश्रामातही ते सावध असतात. त्यामुळे ते सीमेवर रक्षण करताना असो किंवा अन्यत्र कोठेही असोत. त्यांच्यामध्ये ही जागरूकता विकसित झालेली असते. भक्तही असा असायला हवा. विश्रामातही सावध असायला हवा. कोणत्याही स्थितीत ही जागरुकता असायला हवी. पेरणी योग्य स्थिती झाल्यावर गुरुबीजाची पेरणी करतात. सद्गुरू भक्तांच्या याच स्थितीची परीक्षा घेतात आणि यामध्ये जो उत्तीर्ण होतो त्यास सद्गुरूंची कृपा होते. अभ्यासाने मग आत्मज्ञान प्राप्तीही होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.