April 20, 2024
Promoter of Readers Movement Pratibha Lokhande
Home » वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रयत्नशील प्रतिभा
विशेष संपादकीय

वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रयत्नशील प्रतिभा

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज प्रतिभा लोखंडे यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..९

अतिशय बिकट परिस्थितीत वाढलेल्या, चार बहीण भावंडातील सगळ्यात लहान, बारावी डी.एड होताच वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाले. विवाहानंतर एम. ए. (मराठी) एम. ए. (शिक्षण शास्त्र) एम. एड. एम.फिल. केले. अतिशय लहान वयात संसाराची जबाबदारी पेलत सावित्रीबाईंची ही लेक शिक्षण व वाचनाचा प्रचार प्रसाराचा वसा घेऊन आज देशाचा गौरव वाढवित आहे असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

सुप्रसिद्ध लेखिका, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या सदस्या, उत्तम वाचक, समीक्षक, आदर्श, उपक्रमशील शिक्षिका, शिक्षण क्षेत्रामधील तज्ञ मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समूहाच्या समूह संस्थापक, वाचनवेड्या..नागपूरस्थित प्रतिभाताई लोखंडे. एक महिला काय करू शकते ? हा विचार केला तर खूप काही करू शकते. अशा अनेक महिला पाहिल्या की हे लक्षात येते. फक्त व्हीजन व सकारात्मक दृष्टी हवी.

कोरोना काळात सर्वांनाच काय करावे हा प्रश्न पडला होता पुस्तक वाचण्याची आवड असल्यामुळे प्रतिभाताईंनी पुस्तक वाचून फेसबुकवर पोस्ट केले. आणि पुस्तक वाचण्यामध्ये जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा म्हणून त्यांनी आपल्या सखींनाही पुस्तक वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रेरित केले. पुस्तकामुळे आपल्याला जग कळत, विचार समृद्ध होतात, पाहण्याची दृष्टी लाभते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो यातूनच प्रतिभाताईच्या संकल्पनेतून ‘ महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समूहाची ‘ स्थापना झाली.

आज या समूहाचे ८००० च्या वर सभासद आहे. माझा व ताईंचा परिचय वाचन साखळी ग्रुपमुळेच..!. ग्रुपवरील प्रत्येक सदस्याचे असलेले सातत्य, परस्परांविषयीचा आदरभाव, जोडले गेलेले भारतभरचे सदस्य, त्यात लेखक, साहित्यिक, कवी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा किंवा विविध उपक्रम, प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट वाचक शोधणे त्याला पुस्तक रूपी बक्षीस व आठवण म्हणून प्रशस्तीपत्र घरपोच पाठवणे व त्यासाठी प्रायोजक मिळणे ही सोपी गोष्ट नाही. प्रायोजक नसेल तर पदरमोड ठरलेली. इतर सभासदांनाही वाचनाची, लेखनाची गोडी लागावी, वाचनसंस्कृती वाढावी म्हणून त्यांनी १०० पुस्तक वाचून आणि त्यावर समीक्षण पूर्ण करणार्‍या वाचनसाखळीतील सभासदाला ‘ वाचनयात्री’ पुरस्काराने सन्मानित करणे सुरू केले. समूहातील आत्तापर्यंत ४ सभासद १०० पुस्तकाचे समीक्षण पूर्ण करुन ‘वाचनयात्री’ पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहे. हे सगळं पाहाताना मला फार कौतुक वाटते ताईंचे..!

अनेक शिक्षक केवळ नोकरी करतानाही ‘बे एके बे’ करणारे आहेत. शालेय कामाव्यतिरिक्त इतर काही करायला वेळ नाही ही सबब सतत सांगितली जाते. शिक्षक असतानाही ‘अवांतर वाचन’ हे कित्येकांचे स्वप्नच असते. अशा परिस्थितीत ताईंनी फक्त नोकरी व ‘चूल आणि मूल ‘ ही ओळख तर पुसलीच पण त्यांच्या नावातच ‘प्रतिभा’ असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेलं प्रतिभा हे नाव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने,यशाने आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे असे दिसते.

स्व. साखळे गुरुजी उच्च प्राथमिक शाळा मनपा, नागपूर येथे कार्यरत असलेल्या आणि आपल्या अंगभूत कलाकौशल्याने अवघ्या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुपरिचित असलेल्या, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून शैक्षणिक कार्याबद्दल प्रशस्तीपत्र मिळविणार्‍या, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ { बालभारती } पुणेच्या सदस्य, महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०१३, शिकू आनंदे ‘ या शैक्षणिक उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल प्राथमिक शिक्षण संचालक प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन ताईचे कौतुक झाले.

जागतिक महिला दिनानिमित्त ताईच्या ‘ महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समूह ‘ या वाचनसंस्कृतीला समर्पित असलेल्या समूहाची आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर, ता.फलटण, जि.सातार यांच्यावतीने सन्मानपत्र, प्रमाणपत्र देऊन ताईच्या कार्याचा गौरव झाला. ATM परिवार (कृतीशील शिक्षक महाराष्ट्र )च्या जिल्हा समन्वयक, अॅक्टिव्ह टिचर फोरमच्या प्रयोगशील शिक्षिका.. किती कार्य सांगावे.? हा प्रश्न पडावा.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवितात असे ताईंचे मत आहे. आपण वाचलेली पुस्तके आणि आपल्याला भेटलेली माणसे या दोन गोष्टीवर प्रतिभाताईंचा अढळ विश्वास आहे. याच बळावर त्यांनी अनेकांना वाचण्यासाठी प्रेरीत केलेले आहे. शिवाय लिहिण्यासाठी अनेक हातही त्यांनी तयार केलेले आहेत. ताईंच्या साहित्य, शैक्षणिक कार्याव्यक्तिरिक्त सामाजिक कार्यही कौतुकास्पद आहे.

देहविक्रीचा व्यवसाय करणार्‍या महिलांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वतः आर्थिक सहकार्य करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. देशातील पहिलं पुस्तकाच गाव असलेल्या भिलार येथे वाचनवेड्या ५ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेट दिली. मुलांमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासाठी स्वतः पदरमोड करुन त्यांनी शेकडो पुस्तके आजवर बक्षीसरुपात दान केली. त्याचबरोबर निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेणार्‍या आणि मनसोक्तपणे भटकंती करणार्‍या प्रतिभाताई तितक्याच सुंदर विचारांच्या आणि सुंदर मनाच्या आहेत. आपले विचार सुंदर असतील आणि कर्मही तितकेच निष्काम असेल आणि विचारही तितकेच चांगले व प्रगल्भ असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मुलांवर होत असतो असे त्यांना मनापासून वाटते. म्हणूनच,प्रतिभा ताईची संसारवेल तृप्ती आणि वैभवने आपल्या कर्तृत्वाने फुलविली आहेत.तृप्ती अमेरिकेमध्ये आपल्या संसारामध्ये सुखी आहेत तर वैभव इंजिनिअर बनून आपल्या आईवडीलांचे नाव उज्ज्वल करत आहे.

अशा कर्तृत्वसंपन्न,ज्ञानादानाचं पवित्र कार्य करणार्‍या,आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणार्‍या प्रतिभाताई, वाचनवेड मनापासून जपणार्‍या आणि इतरांनाही वाचनाचं वेड लावणार्‍या व वाचकांची योग्य ती दखल घेणाऱ्या या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!!

Related posts

कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व

गुरुदाविलिया वाटा…

चार, पाच, सहा मार्च रोजी महाराष्ट्रात उकाड्यात वाढ – माणिकराव खुळे

Leave a Comment