December 13, 2024
Book review of Dr Alka Chidgopkar book
Home » मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा
मुक्त संवाद

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच सर्व प्राणिमात्रांबद्दल निरपेक्ष प्रेमभावना असते.

डॉ. अनुराधा सुधीर कुलकर्णी

रात्रीच्या प्रशांत समयी निरभ्र आकाश असताना आपण त्यात असंख्य तारका चमचमताना पाहतो. त्यातील काही ठळक तारा म्हणजे सप्तर्षी, ध्रूव, मंगळ, शुक्र आदींना आपण ओळखतो पण बाकीच्या कितीतरी तारका आपल्याला अज्ञात असतात. तसेच काही सन्माननीय अपवाद वगळता स्त्रीसंतसाहित्याच्या आकाशातील अगदी सातआठच संतकवयित्री सर्वांना माहीत असतात. बाकी कितीतरी संतहृदयी कवयित्रींच्या परिचयालाही आपण मुकलेले असतो.

ती आपली कमतरता बऱ्याच अंशाने डॉ. अलका चिडगोपकर यांनी भरून काढली आहे. त्यांनी अथक परिश्रमाने, संशोधनपूर्ण अभ्यासाने थोड्याथोडक्या नाहीत तर एकूण ५४ मध्ययुगीन मराठी संतकवयित्रींच्या काव्यरसाची धारा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. लेखिकेने आपल्या मनोगतात नमूद केल्याप्रमाणे त्यांची विचारधारा जाती, धर्म, पंथ, संप्रदाय निरपेक्ष असल्याने त्यांनी सर्व मध्ययुगीन संत कवयित्रींरूपी तारकांचे एकत्र दर्शन आपल्या या ग्रंथरूपी आकाशात घडविले आहे. मात्र या स्त्रीसंतांची गुरुपरंपरा लेखिकेने आवर्जून दिली आहे.

महानुभाव पंथाचे श्रीचक्रधरस्वामी यांच्या शिष्या, वारकरी पंथाचे श्रीज्ञानेश्वर, श्रीनामदेव, श्रीचोखामेळा, श्रीतुकाराम यांच्या शिष्या, रामदासीपंथाचे समर्थ रामदासस्वामी, कल्याणस्वामी, वेणास्वामी, बाळनाथस्वामी यांच्या शिष्या, नाथपंथाचे गैबीनाथ, रामचंद्रमहाराज तिकोटेकर यांच्या शिष्या या वर्गीकरणानुसार सर्व मध्ययुगीन चोपन्न स्त्रीसंतांचे निवडक काव्य तसेच त्यांचा अल्पपरिचय लेखिकेने आपणास उपलब्ध करून दिला आहे, पण त्याआधी लेखिकेने १५६ पृष्ठांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेली आहे.

स्त्रीसंतसाहित्यपर माहितीपूर्ण असे एखादे स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल, अशी ही मौलिक प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेने त्या त्या संत कवयित्रींची सर्वांगीण ओळख आपल्याला होते, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आपल्यासमोर उलगडतात. या संत कवयित्रींची श्रद्धास्थाने, त्यांना मिळालेल्या प्रेरणा, लौकीकाकडून परमार्थाकडे झालेली त्यांची वाटचाल आणि त्यांच्या काव्यातून जाणवणारा आत्माविष्कार, गूढ आध्यात्मिक अनुभूती या सर्वांचे उत्तम चित्रण लेखिकेने आपल्या प्रास्ताविकात केले आहे. त्याचप्रमाणे आपणास या प्रत्येक स्त्रीसंतांचे साहित्य कोठून उपलब्ध झाले, याचाही लेखिका कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.

खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच सर्व प्राणिमात्रांबद्दल निरपेक्ष प्रेमभावना असते. त्यांच्या अविरत चालणाऱ्या भक्तिसाधनेमुळे त्यांना विलक्षण आध्यात्मिक अनुभव येतात, सर्वत्र दाटलेल्या ईश्वरीय चैतन्यतत्त्वाने संतहृदय भरून गेलेले असते.

अशावेळी आपल्या हळुवार भावतरंगाना संत जेव्हा प्रकट करतात तेव्हा त्यांच्या शब्दांना उत्स्फूर्त काव्याचे रूप आलेले असते. हे काव्यशब्द त्यांना शोधावे लागत नाहीत, परतत्त्वस्पर्शाने हे काव्यशब्द संतमुखी ते स्वतःहून उतरतात. “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’’ या संत तुकोबांच्या वचनांप्रमाणे संतांकडून अत्यंत स्वाभाविकपणे काव्यनिर्मिती होते..

स्त्रीहृदय तर मुळातच हळुवार तरीही सहनशील अशा तितिक्षा वृत्तीचे असते. संतत्व पावलेली स्त्री विशेषच कोमल व सखोल अंतःकरणाची असते. स्त्रीसंतकाव्यात मातृत्वाच्या मुलायमतेचा प्रत्यय येतो. जसे संतजनाबाईंना विठोबाच्या रूपात लेकुरवाळी माउलीच दिसते,
विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
आई मुलाच्या भल्यासाठी जशी कठोर होते, त्याच कठोरतेने स्त्रीसंत समाजाला त्याचे दोष दाखवून उपदेश करतात. संत विठाबाई भक्तिहीन ज्ञानी माणसाला सुनवतात,
कोडेयाचे बहुत आहे गोरेपण । अहंकारी ज्ञान तैसे समजा ।।
भक्त नसता भजन कीर्तन हे सारे । ऐसे व्यर्थ बा रे भक्तीविणे ।।

मुक्ताईच्या ताटीच्या अभंगात तर ज्ञानदेवदादांना क्रोध दूर करण्याचे केवढे मृदुल पण जाणते आवाहन आहे,
विश्व रागे झाले वन्ही । संत सुखे व्हावे पाणी ।।
असे हे स्त्रीसंतकाव्याचे माहात्म्य जाणून लेखिकेने जणु सर्व स्त्रीसंतांच्या काव्यहृदयीच जणु हात घातला. हा हात सखोल अध्ययनाचा होता. संतसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्रित बांधलेले मध्ययुगीन मराठी स्त्रीसंताचे काव्य आणि त्यावरील अभ्यासपूर्ण विवेचन उपयागी पडावे, हा तळमळीचा विचार त्यामागे होता. या तळमळीतून हा ग्रंथराज अवतरला आहे.

पुस्तकाचं नाव : मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा
लेखिका : डॉ. अलका चिडगोपकर
प्रकाशन : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२० – २४४७२५४९, ९४२३६४३१३१)
पृष्ठं : ५९२, मूल्य : ८०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading