April 30, 2025
Actor Kiran Mane article on the Father film
Home » माजिद मजीदीच्या वाटेवर…!
मनोरंजन

माजिद मजीदीच्या वाटेवर…!

आपल्याकडं ‘तेंडल्या’, ‘मदार’, ‘पळशीची पीटी’,’म्होरक्या’,’त्रिज्या’,’ख्वाडा’सारख्या फिल्मस् पहाताना किंवा ‘भट्टी’,’पॅम्फ्लेट’,’द ड्रेनेज’सारख्या शाॅर्टफिल्मस् बघून मनोमन आशा वाटते की हे लोक माजिद मजीदीच्या वाटेवर चालणारे आहेत.

किरण माने, अभिनेता

“मेहरूल्ला तू घरी यायला खूप उशीर केलास. तुझ्या आईनं एका पोलीस इन्स्पेक्टरबरोबर दूसरं लग्न केलंय.” हे ऐकल्यावर त्या तेराचौदा वर्षांच्या कोवळ्या पोराला, मेहरूल्लाला धक्काच बसतो. वडिल अकाली गेल्यानंतर आई आणि बहिणीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन तो नोकरीसाठी मोठ्या शहरात गेलेला असतो. थोडे पैसे कमावून पुन्हा गावी येताना त्याचा मित्र त्याला ही बातमी सांगतो.

‘द फादर’ ! गेली पंचवीस वर्ष माझ्या मनात घर करून राहिलेल्या इराणी सिनेमाची ही सुरूवात… दिग्दर्शक माजिद मजीदी !

आईनं लग्न केलं हे ऐकून मेहरूल्ला मुळापासून हादरतो. चिडतो. आईला भेटतो पण घरी रहात नाही. मशिदीत जाऊन झोपतो. आईला खूप वाईट वाटतं. ती त्याच्यासाठी जेवण तयार करून, त्याच्या मित्रासोबत मशिदीत पाठवते. संतापलेला मेहरूल्ला जेवणाला हातही लावत नाही… पण मित्र कशीतरी समजूत काढून जेवायला लावतो. मेहरूल्ला जेवतो, पण मनाशी काहीतरी ठरवतो.

…दूसर्‍या दिवशी मेहरूल्ला आईला भेटतो. आई आणि बहिणीसाठी त्यानं शहरातून आणलेल्या वस्तू त्यांना देतो. तिथंच रहातो. पण आतून धुसफुसतोय. आता त्याच्या मनात एकच विचार – ‘सावत्र बापाचा सूड घ्यायचा.’ ! त्याला रात्री झोप लागत नाही. खूप अस्वस्थ होतो…रात्री उठून तो सावत्र बापाच्या युनिफाॅर्ममधून पिस्तूल चोरतो आणि शहरात पळून जातो.

‘पिस्तूल चोरीला जाणं’ म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरच्या इज्जतीचा पंचनामाच ! तो मोटारसायकल घेऊन मेहरूल्लाला शोधायला शहरात जातो. मेहरूल्लाला शोधून काढतो, आणि त्याला घेऊन परत निघतो…

इथून पुढं सावत्र बाप आणि मुलाचा जो भन्नाट, जबराट, अद्भूत प्रवास सुरू होतो ! हळूहळू या प्रवासात त्या दोघांमध्ये अतिशय तरल भावनिक बंध कसे तयार होऊ लागतात, हे केवळ अनुभवायचं

‘फादर’ हा माजिद मजीदीचा दूसराच सिनेमा ! मजीदीच्या सिनेमानं अख्ख्या जगाचं लक्ष इराणकडं वळवलं. देशात सर्वत्र अत्यंत विपरित परिस्थिती असताना, हुकूमशाहीचा कहर सुरू असताना, टोकाच्या धर्मांधतेमुळे कलाक्षेत्रावर अनेक बंधनं असतानाही कमी बजेटमध्ये, नांव नसलेले अभिनेते घेऊनही माजिद मजीदीच्या अनेक क्लासिक सिनेमांनी जगभर नांवलौकिक मिळवला. ऑस्कर अवाॅर्डपर्यन्त मजल मारली.

आपल्याकडं ‘तेंडल्या’, ‘मदार’, ‘पळशीची पीटी’,’म्होरक्या’,’त्रिज्या’,’ख्वाडा’सारख्या फिल्मस् पहाताना किंवा ‘भट्टी’,’पॅम्फ्लेट’,’द ड्रेनेज’सारख्या शाॅर्टफिल्मस् बघून मनोमन आशा वाटते की हे लोक माजिद मजीदीच्या वाटेवर चालणारे आहेत. पुढील काळात खर्‍याखुर्‍या मराठी माणसाची आणि त्याच्या जगण्याची ओळख जगाला करून देण्यात यांचा मोलाचा वाटा असेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading