सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज दीपा देशमुख यांच्या कार्याचा परिचय…
ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244
जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..८
प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे. तिचे कामाचे क्षेत्र, तिची मतं, तिचा विचार, तिचा स्वभाव, तिचा पिंड वेगळा आहे. अशीच हाडाची कार्यकर्ती व संवेदनशील लेखिका दीपा देशमुख ही एक प्रतिथयश लेखिका म्हणून आज सर्वज्ञात आहे. दीपा देशमुख यांची सुमारे ३० व किंडलवर २ अशी ३२ पुस्तके आज प्रकाशित आहेत. नुकताच त्यांच्या ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाला राज्यशासनाचा सन २०२१ चा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार श्री. के. क्षीरसागर यांच्या नावाचा रू. १ लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. व सन २०२२ चा मानवाधिकार पुरस्कार सुध्दा मिळाला आहे.
दीपा देशमुख यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन संगीत विशारद, समुपदेशनातील पदवी घेतली आहे. त्यांची कॅनव्हास (चित्र-शिल्पकला),सिंफनी(पाश्चिमात्य संगीत),जग बदलणारे ग्रंथ(जगावर प्रभाव टाकणाऱ्या ५० ग्रंथांची ओळख), जीनियस(जगप्रसिद्ध वैज्ञानिकांवर १२ पुस्तिका),भारतीय जीनियस(वैज्ञानिक, गणिती,वास्तुशिल्पी आणि तंत्रज्ञ भाग १,२,३), तंत्रज्ञ जीनियस(भाग १,२,३), तुमचे आमचे सुपर हिरो या मालिकेत डॅा.अरविंद गुप्ता, डॅा.आनंद नाडकर्णी, डॅा. प्रकाश आमटे, डॅा. अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॅा. ज्ञानेश्वर मुळे यांच्याविषयीचे लेखन, पाथ फाईंडर्स भाग १ व २ मधे अनेक कर्तृत्ववान महिला व पुरूषांवरील लेख, गुजगोष्टी, नारायण धारप: एका गूढ अद्भुत चित्तथरारक जगाची सफर अशी अभ्यासपूर्ण, संशोधनपर, वैविध्यपूर्ण पुस्तके प्रकाशित आहेत. तर काही पुस्तके स्टोरी टेलवर ॲाडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. अनेक वर्तमानपत्रे व मासिकांमधून ताई शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. तसेच अनेक विशेषांकाचे संपादनही त्यांनी केले आहे. मुलाखती, पुस्तक परीक्षण आणि मुखपृष्ठाची निर्मिती करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
लेखनासोबतच त्यांचे सामाजिक काम पाहाता त्याचा आलेखही मोठा आहे. महात्मा गांधी सेवा संघ या अपंगत्वावर काम करणाऱ्या संस्थेत समन्वयक, नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांचेसमवेत सक्रिय सहभाग, डॅा. अभय बंग व डॅा. राणी बंग यांच्या ‘निर्माण’ व ‘कुमार निर्माण’ या उपक्रमांत समन्वयक म्हणून कामाचा अनुभव, ‘प्रथम’ या शिक्षणावर काम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत कंटेट क्रिएटर आणि ट्रेनर कामाचा अनुभव, सांस्कृतिक क्षेत्रात नाटक, दिग्दर्शन, अभिवाचन अशा कार्यक्रमांच सादरीकरण. संगीत, नाटक, साहित्य व चित्रकला यात त्यांना विशेष आवड आहे. विज्ञान, कला, साहित्य या विषयी महाराष्ट्रभर व्याख्याने त्या करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मासवण या आदिवासी भागात सहज शिक्षण परिवार या संस्थेत शिक्षण विभागप्रमुख म्हणून आदिवासींसाठी १५ गावात एकूण ७८ पाड्यांवर त्या कान करतात. एक महिला किती पातळ्यांवर यशस्वीपणे काम करून शकते हे दीपाताईंच्या कामाचा आलेख पाहून लक्षात येते.
दीपाताईंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणताही कार्यक्रम, नाटक, चित्रपट, कार्यक्रम, मुलाखती, वाचलेले पुस्तक याविषयीचा अनुभव मांडण्याची त्यांची ओघवती शैली. आपण एखाद्या कार्यक्रमाला नसलो तरीही तो’याचि देही याचि डोळा’ पाहिल्याची अनुभूती मिळते. माझी त्यांची आजवर प्रत्यक्ष भेट नाही पण हा अनुभव मी फेसबुकच्या माध्यमातून अनेकदा घेतलाय.
ताईंचा आजवरचा प्रवास औरंगाबाद ते मासवण, मासवण ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा झालाय. एका सरकारी अधिकाऱ्याच्या संपन्न घरातील या ताई आदिवासी पाड्यात पोहोचल्या, की जेथे मनोरंजनाचे कोणतेही साधन नाही, मोबाईल नाही, आठ-दहा तासांचे लोड शेडिंग, घरात शिरताच कधी साप तर कधी विंचूचे दर्शन, पावसाळ्यात नदीला पूर आला तर ॲाफिसातील लॅन्डलाईन कित्येक दिवस बंद, पाड्यावर जाताना गुडघ्याएवढ्या चिखलातून वाट काढायची. स्थानिक राजकारणामुळे वाट काढणे अवघड पण तेथेच काम करायचे हे ठरवून ताईंनी तिथल्या आदिवासी जीवनाशी जुळवून घेताना अत्यंत कमी गरजांची सवय लावून घेतली. शिक्षणाची जाणीव जागृती व्हावी यासाठी मुलांसाठी विविध गाणी रचली, पथनाट्य लिहिली, शिबीर घेतली.
आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, शालाबाह्य मुलांच्या समस्या, कुपोषण, डोळ्यात होणारे मोतीबिंदूचे प्रश्न, गरीबी, बेरोजगारी अशा अनेक गोष्टींचे सर्वेक्षण करून ७८ पाड्यांवरील माहिती व आकडेवारी गोळा केली. नैतिक मूल्यं, विवेकाचा आवाज, संवेदनशीलता या मानवी मूल्यांवरचा त्यांचा आवाज बुलंद करत तेथील संस्कृतीशी एकरूप होत त्या माणूस म्हणून परिपक्व झाल्या. वाचन व लेखनातून मिळालेली दृष्टी तेथे काम करताना अधिक व्यापक झाली. म्हणूनच त्यांच एकूणच लेखन पाहिले तर सामाजिक बांधिलकी जपणारं आहे. ‘तेथील मृत्यूला जवळून बघताना आयुष्य किती क्षणभंगूर आहे आणि आपण किती व्याप वाढवतो हे लक्षात येऊन राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया यापासून दूर राहायला मी शिकले असे त्या सांगतात.‘ तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि स्वतःवर त्याचा किती परिणाम होऊ द्यायचा हे शिकतां यायला हवं असेही त्या म्हणतात.
डॅा. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले अशा अनेक मान्यवरांसोबत ताईंनी सामाजिक व साहित्यिक प्रोजेक्ट केले आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कार साहित्य, विज्ञान, बालसाहित्य, स्त्री सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी मिळाले आहेत. सध्या ताई मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या सल्लागारपदी कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.