- ‘हायड्रोपोनिक’ शेतीच्या आरोग्य निरीक्षण करणाऱ्या यंत्राच्या संशोधनास पेटंट
- हेल्थ मॉनिटरिंग मशीन हे कृषी तंत्रज्ञानातील एक मोठे यश
- शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून सामोरा येतो आहे. या जलाधारित शेतीच्या अनुषंगाने जगभरात सुरू असलेल्या संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही आघाडी घेतली असून हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीन या अभिनव संशोधनासाठीचे भारतीय पेटंटही त्यांना प्राप्त झाले आहे.
हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीन हे कृषी तंत्रज्ञानातील एक मोठे यश मानले जात आहे. या अभिनव संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ आणि सल्लग्नीत महाविद्यालयामधील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले.
डॉ. सुनीता जाधव (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बु.), डॉ. सुजीत जाधव (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड), डॉ. शिवराज थोरात (सहाय्यक ग्रंथपाल, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ऋतुराज जाधव (संगणक अभियंता), गजानन मोहिते (जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय, रेठरे बु.) आणि प्रा. अविनाश कणसे (भारती विद्यापीठ, पुणे) यांनी या हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीनचे डिझाईन यशस्वीरीत्या तयार केले आहे.
यासंदर्भात संशोधक चमूचे सदस्य डॉ. शिवराज थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायड्रोपोनिक म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून केलेली शेती. पारंपरिक मातीआधारित शेतीला पर्याय म्हणून ही शेती गतीने पुढे येत आहे. अशा या हायड्रोपोनिक शेतीची कार्यक्षमता, उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. प्रगत सेन्सर्स, रिअल-टाइम डेटा अॅनालिटिक्स आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालींमुळे हे यंत्र पिकांचे आरोग्य, वाढ, बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, व्यवस्थापन करते आणि हयड्रोपोनिक शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. यामध्ये वनस्पतींना आवश्यक असणारी मूलद्रव्ये पाण्यासोबत दिली जातात. या शेतीप्रकारामध्ये वापरले जाणारे पाणी, त्याचे तापमान, पीएच, मूलद्रव्ये, सभोवतालचे वातावरण यामध्ये काही बदल घडल्यास त्याची हानी पिकांना पोहचते. पिकांची हानी होऊ नये आणि पिकाची कार्यक्षमता, उत्पादकता वाढावी यासाठी या उपकरणाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे उपकरण भविष्यात अन्नधान्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या संशोधकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.