आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
हवामानारुप पिकांशी संबंधित संशोधन आणि विकासावर भारताचा भर
कृषी पराशर हा ग्रंथ संपूर्ण मानवी इतिहासाचा वारसा
भारतीय विविधता जागतिक अन्नसुरक्षेसाठी आशेचा किरण
95 लाख हेक्टर शेती सूक्ष्म सिंचनाखाली
जमिनीच्या डिजिटलायझेशनसाठी सुद्धा सरकारची मोठी मोहीम
जगातील सर्वात उंच पुतळा भारतात
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीती आयोगाचे सदस्य रमेशजी, भारत आणि इतर देशांतील कृषी शास्त्रज्ञ, कृषी संशोधनाशी संलग्न विविध विद्यापीठांतील आमचे मित्र, कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक तसेच स्त्री-पुरुष सज्जनहो,
65 वर्षांनंतर ही ICAE परिषद पुन्हा भारतात होत असल्याचा मला आनंद होत आहे. जगातील विविध देशांमधून तुम्ही भारतात आला आहात. भारतातील 120 दशलक्ष शेतकऱ्यांच्या वतीने आपले स्वागत आहे. भारतातील 30 दशलक्षाहून अधिक महिला शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत आहे. देशातील 30 दशलक्ष मच्छिमारांच्या वतीने तुमचे स्वागत आहे. देशातील 80 दशलक्षाहून अधिक पशुपालकांच्या वतीने तुमचे स्वागत आहे. तुम्ही अशा देशात आहात जिथे 550 दशलक्ष प्राणी आहेत. कृषीप्रधान देश, प्राणीप्रेमी भारतात आपले स्वागत आहे, मी तुमचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारत जितका प्राचीन आहे तितकीच आमच्या शेती आणि अन्न यासंबंधीची तत्वं आणि अनुभवही प्राचीन आहेत. आणि भारतीय कृषी परंपरेत विज्ञान आणि तर्कशास्त्राला प्राधान्य दिले गेले आहे. आज जगात अन्न आणि पौष्टिकतेबाबत पोषणाबाबत खूप चिंता व्यक्त होत आहे. परंतु हजारो वर्षांपूर्वी आमच्या धर्मग्रंथात म्हटले आहे – अन्नम् हि भूतानाम ज्येष्ठम, तस्मात् सर्वौषधाम् उच्यते. म्हणजेच अन्न हे सर्व पदार्थांमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणूनच अन्नाला सर्व औषधांचे स्वरूप आणि मूळ म्हटले गेले आहे. आपले अन्न औषधी परिणामांसह वापरण्याचे ज्ञान, संपूर्ण आयुर्वेद शास्त्रात आहे. ही पारंपरिक ज्ञान प्रणाली भारताच्या सामाजिक जीवनाचा एक भाग आहे.
कृषी पराशर हा ग्रंथ संपूर्ण मानवी इतिहासाचा वारसा
मित्रांनो,
जीवन आणि अन्न याविषयीचे, हे हजारो वर्षांपूर्वीचे भारतीय ज्ञान आहे. याच ज्ञानाच्या जोरावर भारतातील शेती विकसित झाली आहे. भारतात सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी लिहिलेला कृषी पराशर नावाचा ग्रंथ संपूर्ण मानवी इतिहासाचा वारसा आहे. ही वैज्ञानिक शेतीची सर्वसमावेशक गाथा आहे आणि तिची भाषांतरीत आवृत्ती देखील आता उपलब्ध आहे. या पुस्तकात ग्रह-नक्षत्रांचा शेतीवर होणारा परिणाम… ढगांचे प्रकार… पर्जन्यमान मोजण्याची पद्धत आणि हवामानाचा अंदाज, पावसाच्या पाण्याची साठवणूक… सेंद्रिय खते… जनावरांची काळजी, बियाण्यांचे संरक्षण कसे करावे, साठवण कशी करावी… असे अनेक विषय या पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत. हा वारसा पुढे नेत, भारतात शेतीशी संबंधित शिक्षण आणि संशोधनाची एक मजबूत परिसंस्था आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्याच शंभरहून अधिक संशोधन संस्था आहेत. कृषी आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतात 500 हून अधिक महाविद्यालये आहेत. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान प्रदान करण्यात मदत करणारी, 700 हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे भारतात आहेत.
भारतीय विविधता जागतिक अन्नसुरक्षेसाठी आशेचा किरण
मित्रांनो
भारतीय शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आजही भारतात आपण सहा ऋतू डोळ्यांसमोर ठेवून सर्व काही आखतो. आमच्या कडे ,पंधरा कृषी हवामानीय प्रदेशांची (ॲग्रो क्लायमेटिक झोन) स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये आहेत. भारतात काही शंभर किलोमीटरचा प्रवास केला तर शेती बदलते. मैदानी प्रदेशातील शेती वेगळी…हिमालयातील शेती वेगळी…वाळवंटातील शेती वेगळी…कोरडे वाळवंट वेगळे…जिथे पाणी कमी आहे तिथली शेती वेगळी…आणि किनारपट्टीतील शेती वेगळी आहे. ही विविधता भारताला जागतिक अन्नसुरक्षेसाठी आशेचा किरण बनवते.
मित्रांनो
गेल्या वेळी येथे आयसीएई परिषद भरली होती, तेव्हा भारताला नुकतच स्वातंत्र्य मिळाले होते. भारताची अन्नसुरक्षा आणि भारताची शेती या संदर्भात तो एक आव्हानात्मक काळ होता. आज भारत हा अन्नधान्याचे आधिक्य बाळगणारा देश आहे. आज भारत दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
भारत हा अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस, साखर, चहा, मत्स्यशेती यांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे… एक काळ असा होता की भारताची अन्नसुरक्षा हा जगासाठी चिंतेचा विषय होता. आज अशी वेळ आली आहे जेव्हा भारत जागतिक अन्न सुरक्षा, जागतिक पोषण सुरक्षा यावर उपाय प्रदान करण्यात व्यग्र आहे. त्यामुळे अन्न व्यवस्था रुपांतरण ( ‘फूड सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ ) सारख्या विषयावर चर्चा करताना भारताचे अनुभव मोलाचे आहेत. त्याचा विशेषत: ग्लोबल साउथला मोठा फायदा होणार हे नक्की!
मित्रांनो
विश्वबंधुत्वाच्या नात्याने भारत मानव कल्याणाला सर्वोच्च मानतो. G-20 दरम्यान भारताने ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हे स्वप्न-संकल्पना मांडली होती. भारताने पर्यावरण संरक्षक जीवनशैली म्हणजेच मिशन लाईफचा मंत्रही दिला. भारताने, ‘वन अर्थ-वन हेल्थ’ म्हणजेच एक पृथ्वी-एक आरोग्य हा उपक्रम देखील सुरू केला. आपण, मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्याचा वेगवेगळा विचार करु शकत नाही. आज शाश्वत शेती आणि अन्नव्यवस्थांसमोर जी काही आव्हाने आहेत… त्यांचे निराकरण, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सर्वसमावेशक दृष्टिकोनातूनच होऊ शकते.
हवामानारुप पिकांशी संबंधित संशोधन आणि विकासावर भारताचा भर
मित्रांनो
आमच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र आहे. येथे जवळपास नव्वद टक्के कुटुंबे अशी आहेत ज्यांच्याकडे फार कमी जमीन आहे. हे अल्पभूधारक छोटे शेतकरीच भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद आहेत. आशियातील अनेक विकसनशील देशांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे भारताचा नमुना, अनेक देशांसाठी उपयुक्त ठरू शकतो. जसे एक उदाहरण आहे ते म्हणजे शाश्वत शेती! भारतात आम्ही बिगर रासायनिक नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही शाश्वत शेती आणि हवामानाला अनुकूल शेती यावर भर देण्यात आला आहे. आमच्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आम्ही एक संपूर्ण परिसंस्था विकसित करत आहोत. हवामानारुप पिकांशी संबंधित संशोधन आणि विकासावर भारताचा भर आहे.
गेल्या 10 वर्षांत, आम्ही आपल्या शेतकऱ्यांना सुमारे 1900 नवीन हवामानारुप वाण दिले आहेत. भारतीय शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे. आमच्याकडे तांदळाच्या काही जाती अशाही आहेत ज्यांना पारंपरिक वाणांच्या तुलनेत पंचवीस टक्के कमी पाणी लागते. अलिकडच्या वर्षांत, काळा तांदूळ आमच्या देशात आरोग्यसंपन्न अन्न (सुपरफूड) म्हणून उदयास आला आहे. येथे, मणिपूर, आसाम आणि मेघालयातील काळा तांदूळ त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे पसंतीस उतरत आहे. याबाबतचे आपले अनुभव भारत जागतिक समुदायाशी वाटून घेण्यासाठी तेवढाच उत्सुक आहे.
मित्रहो,
आजच्या काळात पाण्याची कमतरता आणि हवामान बदलाबरोबरच पोषण हे सुद्धा मोठे आव्हान आहे. त्यावरचा उपायसुद्धा भारताकडे आहे. भारत हा भरड धान्यांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. त्याला जग सुपरफूड म्हणते आणि आम्ही त्याला श्री अन्न अशी ओळख दिली आहे. किमान पाणी, कमाल उत्पादन या तत्त्वावर भरड धान्याचे पीक घेतले जाते. भारतातील सुपरफूड्स असणारी ही भरड धान्ये जागतिक पोषण समस्येचे निराकरण करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. भारताला आपले हे सुपरफूड अवघ्या जगासाठी खुले करायचे आहे. याचसंदर्भात भारताच्या पुढाकाराने, गेल्या वर्षी संपूर्ण जगाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले.
95 लाख हेक्टर शेती सूक्ष्म सिंचनाखाली
मित्रहो,
मागच्या दशकात आम्ही शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आज शेतकरी मृदा आरोग्य कार्डाच्या मदतीने आपल्या जमिनीत कोणते पीक घेतले पाहिजे, हे जाणून घेऊ शकतो. तो सौरऊर्जेच्या मदतीने पंप चालवतो आणि पडीक जमिनीत सौर शेतीच्या माध्यमातून सुद्धा उत्पन्न मिळवतो. ई-नाम अर्थात भारताच्या Digital Agriculture Market मंचाच्या माध्यमातून तो आपले उत्पादन विकू शकतो आणि तो किसान क्रेडिट कार्ड वापरतो. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून तो आपल्या पिकांच्या संरक्षणाची खातरजमा करतो. शेतकऱ्यांपासून ते ॲग्रीटेक स्टार्टअप्सपर्यंत, नैसर्गिक शेतीपासून ते फार्मस्टेपर्यंत आणि फार्म-टू-टेबल व्यवस्थेपर्यंत, भारतात कृषी आणि संबंधित क्षेत्रे सातत्याने अद्ययावत होत आहेत. गेल्या दहा वर्षांत आम्ही 95 लाख हेक्टर शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहे. आमच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे शेती आणि पर्यावरण या दोघांनाही फायदा होत आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या लक्ष्याच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत.
जमिनीच्या डिजिटलायझेशनसाठी सुद्धा सरकारची मोठी मोहीम
मित्रहो,
भारतात आम्ही कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आहोत. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून एका क्लिकवर 30 सेकंदात 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरीत केले जातात. आम्ही डिजिटल पीक सर्वेक्षणासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळेल आणि ते प्राप्त माहितीवर आधारित निर्णय घेऊ शकतील. आमच्या या उपक्रमाचा करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती आणखी सुधारणार आहे. जमिनीच्या डिजिटलायझेशनसाठी सुद्धा सरकार मोठी मोहीम राबवत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा डिजिटल ओळख क्रमांकही दिला जाईल. आम्ही शेतीच्या कामी ड्रोनच्या वापरालाही मोठे प्रोत्साहन देत आहोत. ड्रोनच्या साह्याने शेतीची धुरा महिलांच्या, आमच्या ड्रोन भगिनींच्या हाती दिली जात आहे. या सर्व उपक्रमांचा फायदा भारतातील शेतकऱ्यांनाच होईल, असे नाही तर त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षा देखील मजबूत होईल.
मित्रहो,
येत्या 5 दिवसात तुम्ही सर्वजण इथे मोकळेपणाने चर्चा करणार आहात. येथे महिला आणि युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहून मला जास्त आनंद झाला आहे. तुमच्या कल्पनांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. या परिषदेद्वारे आपण जगाला शाश्वत कृषी-अन्न प्रणालींशी जोडण्याचे मार्ग शोधू शकू, असा विश्वास मला वाटतो. आपण एकमेकांकडून शिकू या… आणि एकमेकांना शिकवू या.
जगातील सर्वात उंच पुतळा भारतात
मित्रहो,
तुम्ही कृषी जगताशी संबंधित आहात त्यामुळे मला तुम्हाला आणखी एक माहिती द्यावीशी वाटते. जगात कुठेही शेतकऱ्याचा पुतळा आहे की नाही हे मला माहीत नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याच्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. मात्र भारतातील स्वातंत्र्य चळवळीत शेतकऱ्यांची शक्ती जागृत करणारे आणि शेतकऱ्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणारे महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारतात आहे, हे जाणून, कृषी जगतातील माझ्या सर्व लोकांना निश्चितच आनंद होईल. या पुतळ्याची उंची स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट आहे. आणि हा पुतळा एका शेतकरी नेत्याचा आहे. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा पुतळा बनवला गेला तेव्हा भारतातील सहा लाख, सहा लाख गावांमधल्या शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते की तुम्ही शेतात जी लोखंडी अवजारे वापरता, त्या तुमच्या शेतात वापरल्या गेलेल्या अवजारांचा तुकडा आम्हाला द्या. अशा प्रकारे सहा लाख गावांमधल्या शेतांत वापरण्यात आलेली लोखंडी अवजारे आणण्यात आली, ती वितळवून जगातील सर्वात उंच शेतकरी नेत्याचा पुतळा घडविताना वापरण्यात आली. मला वाटते, या देशाच्या शेतकरीपुत्राला हा जो एवढा मोठा सन्मान मिळाला आहे, तसा कदाचित जगात कुठेही मिळाला नसेल. आज तुम्ही इथे आले आहात, तर तुम्हाला निश्चितच जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायचे आकर्षण वाटत असणार, अशी खात्री मला वाटते. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो!
धन्यवाद!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.