” तत्त्वार्थ रामायण….’ एक असा अमूल्य ग्रंथ…. जो सर्व मराठी भाषिकांच्या घराघरात हवाच……! ह्या ग्रंथाला माझा हात लागावा ही रामरायाचीच कृपा म्हणावी लागेल. हा ग्रंथ समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडने प्रकाशित करायचा ठरवला. यात समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश रामदासी यांचा फार मोठा सहभाग आहे. समर्थ सेवा मंडळ आणि परमपूज्य डोंगरेमहाराज यांचा विशेष स्नेह होता. त्यांचा हा ग्रंथ मराठीत उपलब्ध नव्हता, तो समर्थ सेवा मंडळाच्या ७५ व्या वर्षी प्रकाशित होऊन आपल्या हाती येतो आहे हे भाग्यच म्हणावे लागेल.
सौ. ऊर्मी उदय निवर्गी,
पुणे, कोथरूड
परमपूज्य डोंगरेमहाराजांच्या कुटुंबियांनी ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाचा अनुवाद करून तो सिद्ध करण्यासाठी अनुमती दिली आणि सर्वतोपरी सहकार्य केले. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भाषातज्ञ विदुला टोकेकर यांनी हा भावानुवाद प्रमाणित केला. ही ईश्वरी योजनाच म्हणावी लागेल !
हा ग्रंथ मूळ गुजरातीत आणि आपल्या हातात हिंदीतून भाषांतरित करून आलेला आहे. हे काम ज्या चौघांनी पेललं, ते ग्रंथराज दासबोध अध्ययनाच्या प्रवीण अभ्यासक्रमाचे अभ्यासार्थी आहेत. सौ. प्राजक्ता डोके, सलील जामखेडकर, वीरेंद्र चित्रे व मनोहर वझे यांनी हे मराठीतून भाषांतराचे काम लिलया पेलले आहे. विशेष म्हणजे ते एकमेकांना पूर्णपणे अपरिचित होते. मुंबई, बेंगलोर, रत्नागिरी, दुबई अशा चार ठिकाणी राहणारे हे चारजण हे भाषांतराचे काम करत होते. ‘समर्थ’ हाच त्यांच्यातला समान धागा म्हणावा लागेल. हा ग्रंथ सामान्य घराघरातून जावा अशा आंतरिक इच्छेने या ग्रंथाची भाषा सर्वांनी सोपी, वाचनीय ठेवलेली आहे. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेने काम केलेले आहे. सौ. प्राजक्ता डोके यांनी या चौघांचे समन्वयक म्हणून काम केले.
भागवताचार्य परमपूज्य डोंगरेमहाराज यांचा जन्म वै. केशव गणेश डोंगरे व वै. कमलाबाई डोंगरे या सात्त्विक वृत्तीच्या मातापित्यांच्या उदरी १५ फेब्रुवारी १९२६ रोजी इंदोर येथे झाला. त्यांच्या घरी दासबोध व मनाच्या श्लोकांचे वाचन नित्यनेमाने होत असे. दासनवमी उत्सवही उत्साहात साजरा होत असे.
महाराज लहानपणापासून संन्यस्त वृत्तीने राहत असत. आयुष्यभर दोन धोतरे आणि दोन उपरणी एवढाच त्यांचा पोषाख होता. कोणत्याही ऋतुत ते अनवाणीच भ्रमण करीत. सर्व काळात महाराज भिक्षा मागूनच जीवन चालवत. त्यांनी वेदांताचा अभ्यास केला, न्यायशास्त्राचा अभ्यास करून ‘रामचंद्रशास्त्री’ ही पदवी संपादन केली. महाराज मराठीतून पुराणकथा सांगत. भागवत पुराणाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.
बडोद्यात नरहरीमहाराज भागवतकथन करत असत. डोंगरे महाराज त्यांच्या कथाश्रवणाला जात असत. पुढे दोघांचा परिचय झाला, त्यामुळे डोंगरे महाराज गुजराती भाषेतून पुराणकथांचा अभ्यास करू लागले. डोंगरे महाराजांचे सदाचरण, विद्वत्ता, धर्मशास्त्रावरील श्रद्धा बघून नरहरी महाराजांनी त्यांना कथा सांगण्याची संधी देऊन पुराणकथनास प्रवृत्त केले. तेविसाव्या वर्षी त्यांनी पहिली गुजराती भाषेतली कथा बडोद्याच्या रोकडनाथ हनुमान मंदिरात सांगितली. सुरुवातीच्या काळात देवी भागवत, रामायण, भगवद्गीता हे त्यांच्या कथेचे विषय होते.
महाराजांची भाषा सहज सोपी तरीही प्रभावी होती. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते गृहस्थाश्रमात प्रविष्ट झाले. विवाहानंतर त्यांनी पूर्व अटीनुसार एका तपाहून जास्त ब्रह्मचर्यपालन केले. श्रीसीतारामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांनी संसार केला. दोघांनाही प्रपंचात कोणतीच आसक्ती नव्हती. पावसाळ्याचे दोन महिने सोडले तर बाकीचे दहा महिने ते कथा सांगत असत. कधीही दक्षिणा मागितली नाही. मिळालेली दक्षिणा नेहमी गोशाळा, आरोग्यसेवा, महाविद्यालये, अन्नछत्रे, अनाथाश्रम आणि नैसर्गिक आपत्तीतल्या संकटग्रस्तांसाठी खर्च होई.
संतराम मंदिराचे पूज्य नारायणदासजी महाराज, डोंगरेमहाराजांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात, ‘परमपूज्य डोंगरेमहाराजांनी भागवताचा उपयोग प्रपंचासाठी कधीही केला नाही. भागवतात ज्ञान- भक्ती-वैराग्य यांचे वर्णन आहे. महाराजांच्या जीवनांत यांचा त्रिवेणी संगम आहे. ‘
अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाने हिंदीतून लिहिलेल्या ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे. तोही तितकाच सात्त्विक झालेला आहे यात काही शंकाच नाही.
” हा ग्रंथराज असा थाटामाटाने मराठीत यात असताना त्याच्या पालखीचे भोई होण्याचे महद्भाग्य श्री समर्थ सेवा मंडळाने आम्हावर विश्वास ठेवल्यानेच आम्ही चौघांनी केले. त्यांचे हे ऋण कधीही न फिटणारे आहे. प्रभू श्रीरामांची कृपा आणि श्रीसमर्थांचा आशीर्वाद यामुळेच हे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. वाचकांचेही आशीर्वाद लाभतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. “
भाषांतरकार वीरेंद्र चित्रे
“हा ग्रंथराज हे केवळ पौराणिक कथानक नसून त्यातील प्रत्येक पात्र आणि प्रसंग आपल्याला कोणती ना कोणती शिकवण, संदेश देऊन जातो. सहजच तत्त्वज्ञान सांगून जातात याचे ज्ञान आम्हाला भाषांतर करताना झाले. भगवंताची प्राप्ती हे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात काय करावे व काय करू नये याबाबत सविस्तर उपदेशही मिळाला. भाषांतर करण्याचा पुर्वानुभव आमच्यापैकी कोणालाच नव्हता. हिंदी भाषेवर प्रभुत्वही नव्हते. तरीही प्रभू श्रीरामांच्या कृपेने, त्यांनीच आमच्याकडून हे भाषांतर करवून घेतले याचाच आनंद जास्त आहे. ‘
मनोहर वझे
या प्रकल्पात संगणकीय तंत्रज्ञानाचा खूप उपयोग झाला. संतकाव्य, संस्कृत श्लोक-सुभाषिते तपासताना गीता, पुराणे, भर्तृहरीचे वैराग्यशतक, आदि शंकराचायांचे नरसी मेहतांचे वाङ्मय, रामायण प्रसंगातील काव्ये, ऋग्वेद, वाल्मिकीचे रामायण, अध्यात्म रामायण, शतकोटी रामायण चाळून झाले. ग्रंथ प्रवचनांवर आधारित असल्याने हे सर्व परमपूज्य डोंगरेमहाराजांना मुखोद्गत होते हे लक्षात आले. अशा थोर विभूतींच्या ग्रंथाची सेवा करायला मिळणे यासारखे भाग्य ते कोणते ! माझ्या अत्यल्प कष्टांना जर इतके समाधान मिळाले असेल तर ग्रंथ संपूर्ण वाचणाऱ्याला किती समाधान असेल याची कल्पना येते.
सलील जामखेडकर
भाषांतर करणे ही धुरा जरी भगवान श्रीरामांनी दिली तरी त्या माध्यमातून त्यांना आम्हाला अभ्यासालाच बसवायचे होते. रामकथा तशी आपल्याला नवीन नाही पण रामकथेतील रहस्ये महाराजांनी ज्या पद्धतीने समजावत सांगितली आहेत हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अशी खात्री आहे की, ज्या व्यक्तीच्या हाती श्रीरामचंद्रांचा आणि परमपूज्य श्री डोंगरे महाराजांचा प्रसाद असलेली ही अद्भुत आणि श्रीरामायणाचे दर्शन घडवणारी कथा वाचेल त्याचे जीवन उजळून निघेल.
प्राजक्ता डोके
या भाषांतर संकल्पाचे उद्गाते दासबोध अध्ययन उपक्रमाचे अध्यक्ष स. भ. सुहास क्षीरसागर यांच्यामुळे भाषांतरित ग्रंथाला शून्यवस्था ते मूर्तस्वरूप प्राप्त झाले. तसेच पुणे येथील के. जोशी प्रिंटर्सचे अनिल जोशी यांनी सुंदर, देखण्या ग्रंथ छपाईची धुरा एकहाती सांभाळली. अशा या सर्वांच्या मेहनतीने आणि श्रीरामकृपेने तयार झालेल्या ग्रंथसंपदेत नक्की काय समाविष्ट आहे हेही जाणून घ्यायला हवं !
या ग्रंथात मुख्य दहा प्रकरणे आहेत. १. श्रीरामचंद्र, २. जगज्जनी सीता, ३, श्रीरामायण दर्शन, ४. रामावताराचे हेतू, ५. बालकांडा, ६. अयोध्याकांड, ७. किष्किंधाकांड, ८. सुंदरकांड, १०. लंकाकांड. या दहा प्रकरणांचा विस्तार करत महाराजांनी ६१ उपप्रकरणे आपल्यासमोर मांडली आहेत. एकेक प्रकरण आपल्यासाठी बहुमूल्य ज्ञानगंगा ठरते याचा अनुभव सातत्याने प्रत्ययास येतो.
रामकथेची सुरुवातच डोंगरे महाराज ‘मानवी जीवनाचे उद्दिष्ट’ या लेखनाने करतात. रामायण उत्तम आहेच, जे हजारो वर्ष चालू आहे. याचीही प्रत्येकाला कल्पना आहे पण मानवी जन्माचे लक्ष्य काय हवे, हे डोंगरेमहाराज आपल्याला स्पष्टपणे विचारतात, ‘खाणे-पिणे, खेळणे, वंशवृद्धी करणे हे एवढेच मानवी जीवनाचे ध्येय आहे का ? लक्षात घ्या मानवी जीवनाचे ध्येय भगवत्प्राप्ती हेच हवे ! चित्ताला चैतन्यात विलीन करणे हेच जीवने करायला हवे. त्यासाठीच ही प्रभू रामांची सेवा करायला हवी, त्यांचे सद्गुण आपल्या जीवनात उतरवायला हवेत. असे जे करतील त्यांचे जीवनदेखील श्रीरामांसारखे होईल’ असे महाराज खात्रीने सांगतात.
सोप्या सोप्या शब्दातून महाराज आपल्याला रामरायाचे सद्गुण उलगडून सांगतात. ते ‘श्रीरामांची सेवा’ या उपप्रकरणात सहज सांगून जातात, पुरुषांचे आचरण श्रीरामांसारखे असायला हवे आणि स्त्रीचे आचरण सीतामातेसारखे हवे. जेव्हा आचरण श्रीरामांसारखे होईल तेव्हाच भक्ती सफल होईल. आचरण रावणासारखे कराल आणि मुखाने रामनाम घ्याल तर रामनामाचे फळ मिळणार नाही. स्वैराचार घातक आहे. तो अधःपतन करतो. त्यामुळे मर्यादापालन रामासारखे करावे. सदाचाराशिवाय मानवी जीवनाला सफलता नाही. हे एवढ्यासाठी लिहिलं की या ग्रंथात फक्त रामकथा नाही. थोडी कानउघाडणी पण आहे, जी आपल्याला अंतर्मुख करते.
बरं नुसतं तत्त्वज्ञान आहे का तर नाही, नुसती रामकथा आहे का तर नाही. सरळ सोप्या बोधकथाही या ग्रंथात सापडतील ज्याचं सार आपल्याला खूप काही शिकवून जाईल. श्रीरामांच्या गुणांतला एक अनुपम गुण महाराज सांगतात, तो म्हणजे ‘उदारता’! श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचं राज्य देऊ केलं जे त्यांनी जिंकलं होतं.
प्रभू राम म्हणतात, रावण मला शरण आला तर त्याला अयोध्येची गादीसुद्धा देईन. रामराया काही देत असताना कधीही असा विचार करत नाहीत की मी फार काही दिले तर माझ्याकडे काय राहील ? महाराज हे श्रीरामचंद्रांचं औदार्य प्रकरण फार खुलवून आपल्यापुढे मांडतात ज्याने आपण पुनःपुनः अंतर्मुख होत जातो, कारण श्रीरामांसारखी उदारता जगात कोठेही नाही.
पुढच्या ‘श्रीरामचंद्रांचा संयम’ या प्रकरणात महाराज रामचंद्रांची तीन व्रते सांगतात. एकवचनी राम, एकपत्नीव्रतधारी राम, एकबाणी राम. या तीनही गोष्टी आज दुर्मीळ आहेत. या प्रकरणातून आपल्याला इंद्रियदमन शिकवले आहे. उद्या राज्याभिषेक आहे ऐकल्यावर रामराया आनंदित झाले नाहीत आणि पुढच्याच क्षणी वनवासाला जा सांगितले तरी नाराजही झाले नाहीत. यासाठीही महाराज आपल्याला रोजच्या जीवनातले उदाहरण देतात.
एखाद्या व्यक्तीने जेवायला बोलावले आणि त्याच्याकडे गेल्यावर जर यजमान म्हणाले, ‘क्षमा करा. जेवण संपले आहे’ तर आपली किती चिडचिड होईल आणि क्षणाच्या फरकाने रामचंद्रांचं आयुष्य बदलून गेलं तरीही त्यांचं मानसिक संतुलन जराही ढळलं नाही. अशा छोट्या छोट्या उदाहरणांची सोबत घेऊन महाराज आपल्यासाठी रामकथा फुलवत नेतात.
श्रीरामांची निरागसता या प्रकरणात महाराज राम-रावण युद्ध वर्णन करतात. युद्ध करता करता रावण अतिशय थकला…… तर श्रीराम रावणाला म्हणाले, ‘तू माझे मुख्य वीर मारून भयानक संहार केला आहेस. पण तू थकलेला दिसतोस म्हणून मी तुला आज मारत नाही. तू घरी जाऊन आराम कर, विश्रांती घेऊन रथ आणि धनुष्य पुन्हा सज्ज करून ये. तुझ्याशी मी उद्या लढेन.’
श्रीराम अतिशय सरळमार्गी होते. छळ-कपट त्यांनी कधीही केले नाही. लगेच महाराजांचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर येते. जिथे सरळता तिथेच समता असते. मित्र मित्राची वाखाणणी करेल यात शंकाच नाही. पण शत्रू वाखाणणी करेल हे सहसा संभवत नाही. इथे रावणच रामाची स्तुती करतो आहे, तोच आपल्या सुनेला सांगतो आहे, ‘रामदरबारी अन्याय होत नाही. तू त्या श्रीरामांचे दर्शन घे. जीवन सफल होईल.’ असे अनेक प्रसंग महाराज आपल्यासमोर या ग्रंथात मांडत जातात ज्यातून आपण खरंच खूप काही शिकत जातो. त्यासाठीच हा ग्रंथ महान ठरतो. डोंगरेमहाराजांच्या कथनाचं महत्त्व पदोपदी समजून येतं. आपण सहजच त्यात हरवून जातो.
शबरी महाराणी होती. तिने संतसेवेसाठी भिल्लीणीचा जन्म घेतला. तिला मातंग ऋषींनी ‘रामनाम’ दिले. त्यात ती तल्लीन झाली. ती कित्येक वर्षे रामाची वाट पाहत होती. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन राम तिच्या आश्रमात प्रगटल. तिने राम-लक्ष्मणांना बोरे खाऊ घातली. त्या बोरांच्या बियांची द्रोणाचल पर्वतावर वनस्पती झाल्या. त्याच वनस्पतींनी युद्धात लक्ष्मणाला मूर्च्छित झालेलं असताना जीवनदान दिले. कारण त्यात शबरीचा भक्तिरस होता. शबरीची भक्ती अनन्यसाधारण होती. तिने रामाकडे काहीही मागितले नाही अशी तिची निष्ठा होती. या शबरीची कथा महाराज खूप सुंदरतेने आपल्यापुढे मांडतात. ते आपल्याला सांगतात, ‘शबरीची कथा दिव्य आहे. या कथेपासून आपल्याला ते नियमित रुपाने सेवाभक्तीची सवय लावून घ्यायला सांगतात. या भक्तीने शबरीसारखे मन शुद्ध होत भगवंताची अनुभूती यायला हवी.
इंद्रजिताचा मृत्यू झाल्यावर रावण आपली पत्नी मंदोदरीकडे आला तर मंदोदरी त्याला विचारते, ‘श्रीराम परमात्मा आहेत. आपला ज्येष्ठ पुत्र आपल्याला सोडून गेला. आतातरी युद्ध थांबवावे. ‘
रावण त्यावर म्हणतो आहे, ‘मी जाणतो आहे राम परमात्मा आहेत, पण मी एकट्याने बसून रामनाम घेतले तर फक्त माझाच उद्धार होईल आणि मला एकट्यालाच मुक्ती मिळेल पण मी रामांचा विरोध केला तर माझ्या संपूर्ण वंशाचे कल्याण होईल. हे राक्षस तामसी आहेत. हे भक्ती करण्यास योग्य नाहीत. ध्यान, तप, जप करू शकण्याच्या अधिकाराचे नाहीत. पण जर मी श्रीरामांना विरोध केला तर हे सर्व रामबाणांच्या गंगेत स्नान करून अंतकाळी रामांचे दर्शन करत प्राण सोडतील आणि अशाप्रकारे माझ्या समस्त राक्षसांना मुक्ती मिळेल. आता माझाही उद्धार होणार आहे. मंदोतरी तू चिंता करू नकोस.’
किती उदात्त विचार आहे हा….. शत्रूही श्रीरामांकडे मुक्तिदाता म्हणून पाहतो आहे. असे हे रामचरित्र अत्यंत पावन आहे, जे महाराज आपल्यासमोर सुरस कथा स्वरुपात मांडतात. रामायणातला कोणताही प्रसंग घ्या महाराजांनी तो अत्यंत प्रभावी भाषेत रंजकतेने आपल्या समोर मांडला आहे. या ग्रंथात नुसती रामकथा नाही, त्या कथेला आजच्या कथांची जोड आहे. संतकथांची जोड आहे. पौराणिक कथांचा सहभाग आहे. ऋषींच्या कथा आहेत. सर्वसमावेशक अशा या ग्रंथातील काहीच प्रसंग उदाहरणादाखल मी आपल्यापुढे मांडले……. ज्याअन्वये आपल्याला ग्रंथाची व्यापकता समजून येईल. डोंगरेमहाराज या अत्यंत सात्त्विक व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीतून साकारलेला हा ग्रंथ मूळ गुजरातीत आहे. तो हिंदीत भाषांतरित केला गेला आणि आता आपल्या मायबोली मराठीत तो हातात येतो आहे हे आपले परमभाग्यच नाही का ! महाराज जी सहज उदाहरणे देतात जी आपल्या आजूबाजूला सतत घडताना आपण पहातो. त्या प्रसंगांतून बाहेर पडण्यासाठी रामनामच हवे असे ते पुनःपुन्हा सांगतात.
या उदाहरणात आजची प्रत्येकातली आसक्ती आहे, संसाराविषयीचे अनावश्यक प्रेम आहे. असे कितीतरी मुद्दे ग्रंथात महाराज आपले डोळे उघडण्यासाठी मांडतात. कोणत्याही परिस्थितीत तरून जाण्यासाठी फक्त आणि फक्त रामचरित हाच आधार आहे असा त्यांचा ठाम निश्चय आहे. असा हा ग्रंथ भक्तिचे महत्त्व सांगतो, बंधुप्रेमाचे वर्णन करतो. संयमाचे धडे देतो. वीररसातही करुणेचे दर्शन घडवतो. असा हा ग्रंथ समाजप्रबोधनासाठी निर्माण झालेली अत्युत्कृष्ट कलाकृती आहे ती जरूर वाचून अनुभवायलाच हवी.
ग्रंथातले निवडक प्रसंग घेत ग्रंथाचे प्रभावीपण मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या ग्रंथाचे वाचन आपली बुद्धी रामरायाचरणी लीन ठेवेल. या ग्रंथाचे आपल्या घरात असणं आपल्याला दुराचारापासून परावृत्त करेल. सात्त्विक कथा, सात्त्विक भाव सात्त्विक विचार, सात्त्विक लेखणी हे एका अतिशय सात्त्विक व्यक्तीने आपल्यासमोर ठेवलेलं आहे अन् हे नुसतं पढतमूर्खासारखं सांगणं नाही तर ‘आधी केले मग सांगितले’ या जीवनतत्त्वावर आधारित आहे.
आता आपल्यावर आहे आपल्या आयुष्यात आपल्याला राम विचारांची गरज किती हे ज्याचं त्यानं ठरवायचं. ज्याला सदविचारांची जीवनात गरज वाटते, ज्याला रामकथेचं महत्त्व पटलेलं आहे त्याने हा ग्रंथ जरूर संग्रही ठेवावा. माझ्या आयुष्याचं ध्येय काय असावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं,
तरीही रामनाम हे ध्येय ठेवायचं असेल तर या ग्रंथाचं वाचन जरूर करावं असं मी नक्की सूचवेन. ग्रंथातलं कोणतंही पान उघडा आणि वाचायला लागा, नक्कीच ते बोधप्रद भासेल यात शंकाच नाही.
मी विसरायचाय ? रामनाम हवं…!
अनासक्त व्हायचंय ? रामनाम घ्यावं…! सदाचाराची साथ… फक्त रामनामाने…! भक्तिरसाची जोड…
फक्त रामनामाने!!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.